Thursday, October 31, 2024

DEMOCRACY WINS !

 


*हंस, कावळे व मानसरोवर!*

लोक व्यवहारापासून अलिप्त असलेले, गुढ व्यक्तिमत्त्वाचे, प्रतिभावान व प्रथितयश लेखक जी. ए. कुलकर्णी यांची *विदूषक* ही अंतर्मुख करणारी प्रदीर्घकथा!

मी ती अनेकदा वाचली. आता ऐकतो.  व्यस्ततेमुळे मूळ कथा वाचणे किंवा ऐकणे आपल्याला सहज शक्य होणार नाही; म्हणून या कथेतील हंस, कावळे आणि मानस सरोवर या संबंधातील विडंबनात्मक रुपक-उपकथेचा काही भाग मी येथे उद्धृत करीत आहे. मूळ कथेतील प्रतिके वापरून, पुढे मी या उपकथेचा कल्पनाविस्तार केला आहे.

'*एकदा असंख्य कावळे मानससरोवराजवळ जमले. त्या ठिकाणी शुभ्र पंखांचा, लाल चोचीचा एक हंस हंसीबरोबर जलक्रीडा करत होता. कावळ्यांनी एकदम कलकलाट केला व त्यांनी हंसास मानससरोवर सोडून जाण्यास सांगितलं, कारण त्यांच्या आगमनाच्या क्षणापासून मानससरोवरावर त्यांची सत्ता सुरु झाली होती.

"अनादिकालापासून हे सरोवर हंसांसाठीच आहे." हंस म्हणाला, "शिवाय तुम्हाला पोहता येत नाही, तर मानससरोवर हवं कशाला?"

"आम्हाला पोहता येत नसेल, पण त्याचा आणि स्वामित्वाचा काय संबंध आहे? आपल्या सत्तेची नृत्यशाला अथवा गायनशाला असेल तर आपल्याला नृत्य-गायन आलंच पाहिजे असं कुठे आहे?" कावळ्यांच्या नेत्याने राजकारणी हसून विचारले. हा नेता मोठा व्युत्पन्न होता व त्याने कृष्णद्वीपात जाऊन न्याय व राज्यशास्त्राचा प्रगाढ अभ्यास केला होता.

"आणि आत्ताच्या आत्ता तू मानससरोवर सोडून गेला नाहीस, तर आम्ही सगळे तुझ्यावर तुटून पडू व तुझा आणि तुझ्या निवासस्थानाचा पूर्ण नाश करू!" एक तरूण कावळ्याने गर्जून सांगितले.

परंतु त्याच्या या कर्कश शब्दांनी नेत्यास क्रोध आला व त्याचे संस्कारित मन फार व्यथित झाले. त्याने आपल्या उतावीळ अनुयायांस गप्प बसवले. अशा त-हेच्या आततायी उपायांची योजना आता रानवट झाली होती आणि तिला कृष्णद्वीपनीतीत स्थान नव्हते. त्याने पुन्हा सौजन्यपूर्वक हसून म्हटले, "आपलं म्हणणं मला पूर्ण मान्य आहे. मानससरोवर हंसांसाठीच आहे, ही आपली प्राचीन परंपरा मला अढळ राखायची आहे. उलट, त्या पवित्र परंपरेच्याच सामर्थ्यशाली आश्रयाने मला मातृदेशाची कीर्ती वृद्धिंगत करायची आहे. पण त्यासाठी हंस कोण हे आधी ठरलं पाहिजे. आपण हंस आहात हे कशावरून?"

हंसाला या प्रश्नाचा मोठा विस्मय वाटला. त्याने आपल्या शुभ्र पंखांकडे पहिले. त्याला जलातील प्रतिबिंबात आपली डौलदार मान, तिच्या अग्रभागी असलेली कमलदलासारखी लाल चोच दिसली. पण आपण हंसच आहोत हे सांगण्यास त्यास प्रमाण सुचेना. कावळ्यांचा नेता नम्रपणे हसला. तो म्हणाला, "तेंव्हा प्रथम आपण या प्रश्नाचा निर्णय लावू. येथे उपस्थित असलेल्या सर्वांना आपण एकेक पान आणायला सांगू. जर आपण हंस असाल तर त्यांनी लाल पान आणावं. जर त्यांना मी हंस आहे असा विश्वास असेल तर त्यांनी हिरवं पान आणावं."

" पण या ठिकाणी हंसापेक्षा कावळेच संखेने जास्त आहेत." हंसी म्हणाली.

"देवी, आपले शब्द पूर्ण सत्य आहेत, पण तो आमचा का अपराध आहे?" नेता विनयाने म्हणाला.

थोड्याच वेळात त्या ठिकाणी हिरव्या पानांचा ढीग जमला. हंसीने जाऊन कमळाची एक लाल रंगाची अस्फुट कळी आणून ठेवली.

कावळ्यांचा नेता म्हणाला, "पाहिलंत? न्यायनीतीनुसार निर्णय घेऊन मी हंस ठरलो आहे, हे इतर सारे माझेच आप्तगण असल्यामुळे अर्थात ते देखील हंसच आहेत; आणि आता आपणच मान्य केलंत की, मानससरोवर हंसांसाठीच आहे. तेंव्हा तुम्ही आता येथून जावं हे न्यायाचं होईल."

हंस खिन्न होऊन सरोवराबाहेर आला. हंसीने त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, "प्रिया, तू खिन्न का?" ती म्हणाली, "पानांच्या राशीनं का हंसत्व ठरत असतं? चल, आपण येथून जाऊ. तू ज्या जलाशयात उतरशील ते मानससरोवर होईल! जेथे तू दिसशील ते तीर्थक्षेत्र ठरेल!* "'

सरोवरात, हंसाच्या वळचणीने राहणारी बदके,  समोरच्या झाडावरील वानर,  झाडाच्या ढोलीत राहणारी खार हे हंस व कावळ्यांच्या नेत्यातील संवाद उत्कंठतेने ऐकत होते; तसेच आणलेली लाल व हिरवी पाने मोजून हंस कोण हे ठरवण्याची नाविन्यपूर्ण प्रक्रिया जवळून बघत होते. कावळ्याच्या नेत्याचे  सामर्थ्य, बुद्धीवैभव, वाक्चातुर्य, तर्कसंगत पद्धतीने त्याने केलेले विवेचन, त्याचा शांत व संयमी स्वभाव बघून ते फार प्रभावित झाले. आपणांस अनुयायी म्हणून स्वीकारावे अशी त्यांनी नेत्याकडे आजिजीने विनंती केली; ती त्याने मान्य केली. त्यानंतर घारी आणि  गिधाडांनीही कावळ्यांच्या नेत्याचे नेतृत्व स्वीकारले.

कावळ्यांच्या नेत्याने मानसरोवर बगळ्यांकडे, तर समोरचा भूप्रदेश वानराकडे सोपविला. खारीला आवश्यक त्या सुखसोयी ढोलीतच पुरवण्यात येत असून; सभोवतालच्या प्रदेशाच्या टेहळणीची  जबाबदारी तिच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

आकाशात उंच भरारी घेणारा व आपल्या तीक्ष्ण नजरेने भक्ष्याचा वेध घेऊन, वेगाने झडप घालणारा सुवर्ण गरुड परिस्थितीचे अवलोकन करीत होता. उद्या हेच कावळे पानांचे भारे गोळा करत माझ्या कांचनगौरी शिखरावर अधिकार सांगू लागतील हा विचार त्याच्या मनात येताच त्याच्या अंगावरील पिसे उसळली व डोळ्यात अंगार फुलला... 

*प्रा. महेंद्र इंगळे, जळगांव -पुणे*

(ता.क. कथेत लेखकाला अभिप्रेत असलेले हे कृष्णद्वीप म्हणजे जागतिक दर्जाचे Harward  सारखे एखादे विद्यापीठ तर नाही ना? नेत्याने तेथून MBA, Doctorate of Law, Juris Doctor या सारख्या पदव्या प्राप्त केल्या होत्या काय?  असे प्रश्न मला पडतात.)

Saturday, October 5, 2024

FAREWELL TO STUDENTS

 


*शासकीय तंत्रनिकेतन जळगांव येथील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभातील मनोगत....*

माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 

आज निरोपाचा दिवस. तीन वर्षापूर्वी तुम्ही या संस्थेत आला होतात. तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी या संस्थेत प्रवेश केला तेव्हा गेटवरील सिक्युरिटी, चाळीस एकरांचा वनराईने नटलेला संस्थेचा विस्तीर्ण परिसर, संस्थेची मुख्य दगडी इमारत, विविध विभागांच्या इमारती, मुलांची आणि मुलींची वसतीगृहे, कॅन्टीन, वर्कशॉप, तुमच्यासारख्याच प्रवेशा करिता आलेल्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची झालेली गर्दी बघून तुम्ही कावरे बावरे झाल होतात. मुख्य इमारतीत प्रवेश केल्यानंतर तुम्ही ड्रॉइंग हॉलमध्ये आलात तेव्हा तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रवेश समितीचे प्रमुख प्रा. के. पी. वानखेडे, प्रा. गडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन करून याच ड्रॉइंग हॉलमध्ये तुमची बसण्याची व्यवस्था केली त्यावेळेस तुम्ही थोडे निश्चिंत झालात. ज्या शिस्तबद्ध रीतीने प्रवेश प्रक्रिया पार पडत होती ते बघून तुम्ही थोडेसे आश्चर्यचकित झालात. या वेळी मी माझ्या केबिनमध्ये असलो तरीसुद्धा पूर्वानुभवाने मी या सर्व गोष्टी कल्पनेने अनुभवत होतो. 

प्रवेश प्रक्रिया संपली. तुम्हाला या संस्थेत प्रवेश मिळाला. कॉलेज सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी तुम्हा सर्वांचे आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विभाग प्रमुखांची मार्गदर्शनपर भाषणे झालीत. ती तुम्ही मनापासून ऐकलीत. पुढील काळात त्याचे अनुपालनही केले. या तीन वर्षाच्या कालावधीत तुम्ही भरपूर अभ्यास केला, विविध कार्यक्रमांत सहभाग घेतला, त्यांच्या आयोजनात हिरीरीने सहभाग घेतला, तुमच्यापैकी काहींना Dipex या राज्यस्तरीय Project Competition मधे, काहींना राज्यस्तरीय Paper Presentation, Technical Quiz Competition मधे प्रथम पारितोषिक मिळाले. त्यांचा आपण गुणगौरव केला. तुमच्या अडीअडचणी समजून घेण्याकरिता विद्यार्थी सभा व पालक मिळवावे घेतले. त्यामधून आलेल्या सूचनांची तुमच्या सहकार्याने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या मुला मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांची सुरक्षाही अत्यंत महत्त्वाची असते. विभाग प्रमुख व रेक्टर असलेले डॉ. राजेश पाध्ये व त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही सहकार्य केले. कधीही कुठला अनुचित प्रकार घडला नाही ही खरोखरच सर्वांकरिता कौतुकास्पद बाब आहे.

तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात की तुम्हाला शासकीय तंत्रनिकेतन जळगांव या नामांकित संस्थेत प्रवेश मिळाला. शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे हे आपणा सर्वांना माहित आहेच. या संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापक व सर्व कर्मचारी हे एका कुटुंब प्रमाणे आहेत याचा आपण अनुभव घेतला आहे. आता आपण येथून बाहेर पडून एका नवीन जगात प्रवेश करणार आहात. त्यात तुम्हास कदाचित एवढी सुरक्षितता लाभणार नाही, परंतु येथे मिळालेल्या बाळकडूच्या आधारावर तेथेही यशस्वी होऊन नावलौकिक मिळविणार याबाबत माझ्या मनात शंका नाही. कारण यापूर्वी तुमच्या सारखेच अनेक विद्यार्थी या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी देशात व परदेशात आपलं कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. तुमच्या पैकी काही जणांनी आपल्या मनोगतातून संस्थेविषयी, येथील प्राध्यापक व कर्मचारी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली ही खरोखरच समाधानाची बाब आहे. 

तुम्ही या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर  एक यशस्वी अभियंता म्हणून बाहेर पडणार आहातच पण एक चारित्र्यसंपन्न माणूस व्हावा याकरिता यापुढेही सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्न करीत राहा. यशस्वी अभियंता बनणे सोपे आहे. चारित्र्यसंपन्न माणूस बनणे कठीण आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत राहणे गरजेचे आहे. ती एक तपश्चर्या आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम, कृतज्ञता यासारख्या शाश्वत मूल्यांचा विसर पडू देऊ नका. आई-वडिलांविषयी कृतज्ञता बाळगा. गुरुजनांविषयी कृतज्ञता बाळगा. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला आयुष्यात मदत केली त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगा. ज्यांनी ज्यांनी आपल्या आई-वडिलांविषयी कृतज्ञता बाळगली, आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता बाळगली ते सर्वजण मोठी माणसे झालीत.

तुम्ही ऐश्वर्या संपन्न व्हा. पद, पैसा आणि प्रतिष्ठा तुम्हाला मिळणार आहेच. कदाचित त्याला थोडा वेळ लागू शकतो. पण केवळ ते मिळवण्यासाठी मूल्यांचा बळी देऊन स्वप्रतिमा मलिन होईल अशा तडजोडी करू नका. मूल्याधिष्ठित जीवन जगा. त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ समाधान मिळू शकते. सत्तास्थानी असतांना आयुष्यात अनेक मोहाचे क्षण येतील तेव्हा विवेक बुद्धीचा उपयोग करून त्यांना झिडकारा. नियमितपणे प्रार्थना करा. त्यामुळे अंतर्मनाच्या कौलानुसार  निर्भयपणे तुम्ही कठोर निर्णय घेऊ शकाल.

नाविन्याचा हव्यास धरा. प्रत्येक गोष्ट करतांना ती वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करा. त्याचे एक वेगळे समाधान तुम्हाला मिळेल. संधी मिळेल तेव्हा तुम्ही केलेल्या चांगल्या कामाविषयी नम्रपणे इतरांना सांगा. कदाचित काहीजण त्यामुळे प्रोत्साहित होऊ शकतील. चांगुलपणा प्रसारित करा. संधी मिळेल तेव्हा यशस्वी माणसांना भेटण्याचा प्रयत्न करा. यशस्वी माणसांना दुसऱ्यांना मदत करायला आवडते. त्यामुळे आत्मविश्वासपूर्वक त्यांना भेटण्याचा प्रयत्न करा व त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.चांगले मित्र जोडा. मैत्री जपा. आयुष्यात येणाऱ्या बऱ्या वाईट प्रसंगांत त्यांची साथ तुम्हाला मोलाची ठरेल.

अशा अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पण महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टी सांगण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली. त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल अशी मला खात्री आहे. अभ्यासही तेवढाच महत्त्वाचा आहे. येणाऱ्या परीक्षेत तसेच पुढील आयुष्यात तुम्हाला भरभरून यश मिळो याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा!

यशस्वी भव!! 

*प्राचार्य डॉ. महेंद्र इंगळे*

DAYS IN NITTR BHOPAL

 


*NITTR, Bhopal शी ऋणानुबंध...*

महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण विभागात World Bank  Assisted Project राबविला जात असतांना त्या प्रकल्पांतर्गत माझी  HRD Ministry अंतर्गत येत असलेल्या Technical Teachers' Training Institute,  Bhopal या नामांकित संस्थेत Barkatullah University संलग्न Master of Technical Education या पदव्युत्तर अभ्यासक्रमा करिता निवड झाली. याकरिता प्राचार्य एम.एस. महाजनसर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. माझ्यासोबत महाराष्ट्रातील प्रा. जी .एम. केचकर व प्रा. पी.पी. पवार हे आणखी दोघे सहकारी होते.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व मध्य प्रदेशची राजधानी असलेले भोपाळ एक सुंदर शहर. येथे पाच सुंदर जलाशये असल्यामुळे या शहराला 'सिटी ऑफ लेक्स' असेही म्हणतात. भोपाळ शहरातील सर्वात सुंदर अशा शामला हिल्स परिसरात आमची TTTI ही संस्था होती. शेजारीच मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांची निवासस्थाने होती. त्याला लागून नाट्य, संगीत, पारंपारिक कला,  संस्कृती यांच्या उन्नती करता स्थापन करण्यात आलेली केंद्र शासनाची भारत भवन ही संस्था. येथून खाली जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला वनविहार राष्ट्रीय उद्यान तर दुसऱ्या बाजूला बडा तालाब.

प्रा. आर. के. मणी हे संस्थेचे डायरेक्टर होते. त्यांच्या अनेक जवळचे मित्र राज्य व केंद्र शासनात सचिव पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यात एक आत्मविश्वास व मोकळेपणा जाणवायचा.‌ अनेक महत्त्वाचे प्रकल्प मिळवण्याच्या कामी त्यांचा संस्थेला फायदा झाला. कुठल्याही कार्यक्रमात त्यांची उपस्थिती चैतन्यदायी असायची. मॅनेजमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. मंजूल सक्सेना, प्रा.आर.बी. शिवगुंडे व प्रा. बी.एल. गुप्ता हे मॅनेजमेंट विषय शिकवत असतांना त्यातील मॉडेल्स अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगत असत. व्यवहारात त्याचा प्रत्यक्षात कसा उपयोग होतो ते सोदाहरण स्पष्ट करून सांगायचे.

अमेरिकेत स्थायिक झालेले संस्थेचे माजी प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर हे आम्हाला Leadership Development  हा विषय शिकवण्याकरिता अमेरिकेवरून आले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत तीन दिवस त्यांनी आम्हास हा विषय शिकवला. अक्षरशः कानात प्राण आणून आम्ही त्यांचे बोलणे ऐकत असू. आमच्यासोबत अनेक फॅकल्टी मेंबर्सनी त्यांचे सेशन्स अटेंड केले.

मराठी वाचनाची मला आवड होतीच पण इथे आल्यावर मला अनेक चांगली इंग्रजी पुस्तके वाचायला मिळाली. त्यामुळे इंग्रजी वाचनाची माझी आवड वाढली. येथील भव्य लायब्ररीत (Learning Resources Centre) मध्ये सर्व प्रकारच्या पुस्तकांबरोबरच विविध प्रकारचे Magazines, International Journals, Audio Video Cassettes उपलब्ध होते. Harvard Business Review मधील केस स्टडीजचा मला Assignment लिहितांना खूप उपयोग व्हायचा. नव्याने चर्चेत आलेले Peter Segne चे Learning Organisation Model मला इथे अभ्यासायला मिळाले. Peter Drucker ची मॅनेजमेंट या विषयावरील, Stephen Covey ची लीडरशिप या विषयावरील, Sigmand Fried, Thomas Anthony, Abrahm Maslow यांची मानसशास्त्र विषयावरील... अशी पुस्तके  मी अभ्यासा करिता वापरली.

Power of Positive Thinking, Tough Times Do Not Last But Tough People Do, An Autobiography of a Yogi ही बेस्ट सेलर असलेली पुस्तके वारंवार वाचत असतो.

भारत भवन मध्ये नवीन नाटक यायचे तेव्हा ते आम्ही आवर्जून बघायला जायचो. येथे आम्ही घाशीराम कोतवाल, चरणदास चोर, दो कवडी का खेल यासारखी अनेक हिंदी नाटके बघितली. नाटकाच्या तिकिटा सोबत नाटकाचं रसग्रहण केलेली व सुंदर फोटोग्राफ्स असलेली एक पुस्तिका प्रत्येकाला मिळायची त्यामुळे नाटकाविषयी व त्यातील कलाकारांविषयी सखोल माहिती मिळण्यास मदत व्हायची. बऱ्याचदा संध्याकाळी आम्ही भारत भवन वर फिरायला जायचो त्यावेळेस प्रसिद्ध नाटककार हबीब तन्वीर  कॅन्टीनमध्ये किंवा शिल्प, चित्र, हस्तकला यांच्या वर्कशॉप्स मध्ये हातात चिरूट घेऊन आरामात बसलेले किंवा गप्पागोष्टी करीत असलेले दिसायचे. बऱ्याचदा त्यांच्याशी जुजबी बोलणे व्हायचे.

मुलांना दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यावर आम्ही सहकुटुंब तिथे राहत असू. ट्रेनी हॉस्टेलमध्ये प्रत्येकाकरिता सिंगल रूम  व मेस व्यतिरिक्त कॉमन कीचन ची व्यवस्था होती.

भोपाळ येथील माझे १९९६ ते १९९८ या कालावधीतील वास्तव्य अतिशय आनंददायी  व संस्मरणीय ठरले. या कालावधीत माझ्या व्यक्तिमत्वात मोठा बदल घडून आला.

यापूर्वी १९८९ मध्ये व ९० मधे इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम फेज-१ व‌ फेज-२  करिता TTTI (NITTR) येथे आलो होतो, परंतु तेव्हा बराच वेळ हा ओल्ड मार्केट आणि न्यू मार्केट मध्ये फिरण्यात जायचा. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी पंचमढी,  भीम भेटका सांची स्तूप, वनविहार, बडा तालाब,  छोटा तालाब अशा जवळपासच्या ठिकाणी  फिरण्यात जायचा. प्रा. राजेश खंबायत जळगावचे असल्यामुळे आपण घरीच आहोत असे वाटायचे. तेही दिवस आनंदादायी होते. 

त्यानंतर बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांत भोपाळ येथे आलो. २००८ मधे मी नॅशनल फेडरेशन ऑफ पॉलीटेक्निक टीचर्स असोसिएशनचा अध्यक्ष असतांना येथे दोन दिवसांची नॅशनल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली होती. अध्यक्षस्थानी राजीव गांधी टेक्नॉलॉजी  यूनिवर्सिटीचे कुलगुरू डॉ. पी. व्ही. शर्मा, सचिव श्री आशिष डोंगरे उपस्थित होते.

असा माझा NITTR शी ऋणानुबंध आहे.

*प्रा. डॉ. महेंद्र इंगळे*

Friday, October 4, 2024

ENGINEER AND GIRL FRIEND

ENGINEER AND GIRL FRIEND

ENGINEER - 1

तिच्याशी मैत्री झाली.

एक दिवस तो तिला म्हणाला, "तू खूप छान दिसतेस." 

ती म्हणाली, "ते तर मला माहितीये. मला जे माहित नाही ते सांग."

मग त्याने तिला Radiation पद्धतीने Heat Transfer कसे होते हे तिला Stefan Boltzmann Equation कागदावर लिहून समजावून सांगितले.

तेव्हा पासून तो सिंगलच आहे ...!

चाकणला काही दिवस शॉप फ्लोअरवर काम केल्यानंतर, तो आता कविता करतो; त्यातील एक कविता: 

ती चालली असता तिची वाट

म्हटलं, थांब!

मूठभर राख तिच्या हातात देऊन 

म्हटलं, माझ्या अंगास फास!

ऐकून शब्द माझे ती हळहळली

गाला वरती दोन टपोरी

आसवे ओघळली

आसवांचे शब्द झाले आणि

कविता ही साकारली!


ENGINEER - 2

तिच्याशी मैत्री झाली.

एक दिवस तो तिला म्हणाला, "तू खूप छान दिसतेस." 

ती म्हणाली, "ते तर मला माहितीये. मला जे माहित नाही ते सांग."

मग त्याने तिला समुद्रातील जहाजावरून आकाशात उंच उडणाऱ्या विमानाला, Projectile Equation चा उपयोग करून, Missiles च्या साह्याने कसे उद्ध्वस्त करायचे हे आपल्याजवळील लॅपटॉप वर Simulations द्वारे समजावून सांगितले तेव्हा, त्याच्या प्रेझेंटेशन ने ती प्रभावित झाली.

तिच्या गालावर पडणाऱ्या खळी विषयी, एक दिवस तो तिला म्हटला होता,

'गालावरची खळी तुझ्या ही 

तारुण्याचे स्वप्न मनोहर !

यौवन गहिऱ्या आभाळात, 

चंद्रबिंब कि पडले सुंदर !

गालावरची खळी तुझ्या ही 

मनास टाकी माझ्या मोहून!

न्याहाळता तित रूप आपुले 

प्रश्नच जाते उत्तर होऊन !'

ऐकून शब्द त्याचे ती मोहरली

गालावरती दोन टपोरे फुले उमलली

फुलांच्या पाकळ्या झाल्या 

त्या शब्द रूपाने मांडल्या.

लग्नानंतरची अनेक वर्षे, तो सांगत होता ते ती निमुटपणे ऐकत होती!

महेंद्र इंगळे

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...