*जागतिक दर्जाची पुणे मेट्रो....*
मी पुण्याला पिंपळे सौदागर भागात राहतो. राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी जवळ असल्याने बरेचसे आयटी इंजिनियर्स या भागात राहतात. गेल्या वीस वर्षात मुळा नदीच्या पश्चिमेला, वेस्ट पुणे वेगाने विकसित झालं; त्यातील अतिवेगाने विकसित झालेला एक भाग म्हणजे पिंपळे सौदागर!आधुनिक जीवनशैलीस आवश्यक असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर व इतर सुविधा या भागात बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहेत.
आता नव्यानेच पुण्यामध्ये मेट्रो आलेली आहे,परंतु वेस्ट पुण्याचा सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, रहाटणी हा भाग प्रत्यक्षरीत्या मेट्रो लाईन्सला जोडलेला नाही. पिंपळ सौदागरच्या रहिवाशांकरिता जेआरडी टाटा डबल डेकर ब्रिजच्या जवळ, नाशिक फाट्यावरील भोसरी मेट्रो स्टेशन हे त्यातले त्यात जवळचे स्टेशन. परंतु या मेट्रो स्टेशन पर्यंत पुरेशी कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे पिंपळे सौदागर भागातील मोजकेच प्रवासी मेट्रोचा लाभ घेतांना दिसतात.
पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रोच्या लाईन नंबर-१ (पर्पल लाईन)चे काम, इंटर जंक्शन असलेल्या सिविल कोर्ट स्टेशन पर्यंत पूर्ण झालेले असून तिथपर्यंत मेट्रो सेवा नियमितपणे सुरू आहे. अंडरग्राउंड असणाऱ्या सिव्हिल लाईन ते स्वारगेट या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.
वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या लाईन नंबर-२ (एक्वा लाईन) चे काम पूर्ण झालेले असून, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट २०२३ रोजी त्याचे उद्घाटन झाले. या मार्गावर मेट्रो सेवा नियमितपणे सुरू आहे.
लाईन नंबर-१, पीसीएमसी पासून रेंज हिल पर्यंत इलेव्हेटेड मेट्रो आहे. तेथून नंतर हळूहळू ती भूमीगत होत जाते. सिविल कोर्ट स्टेशनला पोहोचते तेव्हा ती जमिनीच्या १०६ फूट खाली असते. सिविल कोर्ट हे इंटर जंक्शन स्टेशन भारतातील सगळ्यात जास्त खोलीवर असलेलं मेट्रो स्टेशन आहे. याच लायनीवरील शिवाजीनगर मेट्रो स्टेशन हे दुसरे वैशिष्ट्यपूर्ण स्टेशन. याचा बाह्य भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्याच्या दृश्याचा आहे तर आतील भाग पेशवेकालीन दृश्यांचा आहे. ऐतिहासिक पेंटिंग्ज व म्युरल्सनी अंतर्गत भागाची शोभा वाढविलेली आहे. या मेट्रो स्टेशन्सवर विमानतळावर असतात तसे सेक्युरिटी चेकिंग, एस्केलेटर्स, लिफ्ट, टॉयलेट ब्लॉक्स, स्वच्छ पिण्याचे पाणी, बोगदा व्हेंटिलेशन सिस्टीम, ऑटोमॅटेड तिकीट विक्री, संपर्क व्यवस्था अशा सुविधा आहेत. फायर सेफ्टी, भरपूर उजेड, स्वच्छता याकडे पुरेसे लक्ष देण्यात आलेले आहे. अगदी जागतिक दर्जाचे म्हणता येईल अशा प्रकारची ही स्टेशन्स आहेत. सिविल कोर्ट स्टेशनवर पोचल्यानंतर आपण एस्क्युलेटर्सने किंवा लिफ्टने जमीन पातळीवर येऊन स्टेशनच्या बाहेर पडू शकतो किंवा रामवाडी अथवा वनाज कडे जाऊ शकतो. येथे पुन्हा तिकीट काढण्याची आवश्यकता नाही.
मेट्रोने प्रवास करतांना मेट्रो लाईनचे मॅप बघितले असल्यास प्रवास सुलभ होण्यास मदत होते. त्याकरिता हे मॅप मेट्रोमध्ये, स्टेशनवर आणि जागोजागी लावलेले आहेत. 9420101990 या व्हाट्सअप नंबर वर Hi केल्यानंतर तिकीट खरेदी संदर्भात सूचना मिळतात, त्यानुसार फोन पे किंवा गुगल पे ने पेमेंट केल्यावर आपल्याला मोबाईल वर क्यूआर कोडसह मेट्रोचे तिकीट येते. मेट्रो स्टेशन वर ॲटोमेटेड मशिनवरही तिकीट खरेदी करता येते. मोबाईलवरील किंवा हार्ड कॉपीवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर फलाटावरचे बॅरियर्स आपोआप बाजूला होतात. मेट्रो ट्रेन स्टेशनवर आल्यानंतर स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतात व सुरू होण्यापूर्वी आपोआप बंद होतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतलेली आहे. एक तिकीट घेतल्यानंतर ते कुठल्याही लाईनला चालू शकते. साधारणतः ३५ रुपयांचे तिकीट घेऊन दोन टोकाच्या स्टेशन दरम्यान आपण मेट्रोने प्रवास करू शकतो. काही अडचण आल्यास मेट्रोचे कर्मचारी आणि सहप्रवासी आपल्याला मदत करतात.
मेट्रोमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. लॅपटॉप व मोबाईल चार्जिंग करिता सुविधा उपलब्ध आहेत. इमर्जन्सी मध्ये ड्रायव्हर (पायलट)शी बोलण्याकरिता प्रत्येक डब्यामध्ये दरवाज्या जवळ स्पीकर फोनची सुविधा आहे. आपण प्रवासात कुठे आहोत हे डिस्प्ले बोर्डवर बघता येते. तीन डब्यांच्या मेट्रोला फायबर ग्लासच्या मोठ्या खिडक्या असल्याने बाहेरचे विहंगम दृश्य बघायला मिळते आणि मेट्रोचा प्रवास अल्हाददायक होतो.
दाट लोक वस्ती, परिसरात असलेल्या जुन्या इमारती, हेवी ट्रॅफिक अशा परिस्थितीत पुण्यामध्ये मेट्रोचे काम करणे आव्हानात्मक होते. जिओ टेक्निकल सर्वे करणे, उंच पिलर्स बांधून त्यावर ट्रेनच्या सहाय्याने प्रिकास्ट काँक्रीट गर्डर्स अथवा स्टील गर्डर्स चढविणे हे तर आव्हानात्मक होतेच पण त्याहीपेक्षा अंडरग्राउंड मेट्रोचे काम जास्त आव्हानात्मक होते. अंडरग्राउंड मेट्रो कन्स्ट्रक्शन करिता सगळ्यात आधुनिक पण महाग असलेल्या TBM (टनेल बोरिंग मशीन) पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टनेल बोरिंग मशीन हे एक वीस फूट व्यासाचे, साडेचारशे फूट लांबीचे महाकाय मशीन. जेथून अंडरग्राउंड मेट्रो सुरू होते त्या ठिकाणी शंभर ते दीडशे मीटर खोल मोठा खड्डा तयार करण्यात येतो. आजूबाजूला रिटेनिंग वॉल व तळाला काँक्रीट राफ्ट तयार करण्यात येतो. त्यावर या मशीनचे पार्ट क्रेनच्या साह्याने पोहोचविले जातात व त्यांना असेंबल केले जाते. मशीन असेम्बल करणे एक मोठे जिकरीचे काम असते. त्याला बराच वेळ लागतो. एकदाचे मशीन तयार झाले की नंतर पुढचे काम फार सोपे असते. सर्व प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने होतात. मशीनच्या पुढील व्हीलवर हार्ड स्टीलचे कटर हेड असतात. व्हील हळूहळू फिरत, जमिनीचा भाग कोरत पुढे जाते. खोदकामातून निर्माण झालेली माती व गिट्टी कन्व्हेअर बेल्टच्या सहाय्याने प्रोसेसिंग प्लांट जवळ पोहोचविली जाते. जमिनीखालून मशीन हळूहळू भूभागाचे कटिंग करत पुढे सरकते तेव्हा जमिनीवरील इमारतींना हादरे बसतात. माझी मुलगी पौर्णिमा स्वारगेट स्टेशनच्या परिसरात राहते. तिच्याकडे जायचो तेव्हा हे आम्ही अनुभवले आहे. रहिवाशांमध्ये भीती निर्माण होऊ नये व आणीबाणीच्या प्रसंगी त्वरित उपाययोजना करता याव्यात म्हणून सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले होते. मशीन पुढे जाते तसतसे मागच्या भागात हायड्रोलिक जॅक्सचा वापर करून प्रिकास्ट काँक्रीटच्या भिंती तयार केल्या जातात. कंट्रोल केबिनमधील इंजिनियर कामावर देखरेख ठेवतात.
एका TBM मशीन ची किंमत साधारणतः ७० ते ८० कोटी रुपयांपर्यंत असू शकते.
लाईन नंबर-१ च्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या सेगमेंटचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. एका बाजूने सिव्हिल कोर्ट बाजूने, जमिनी खालून, दोन मशीन एकाच वेळेस खोदकाम करित बुधवार पेठला पोहोचल्या आहेत. दुसऱ्या बाजूने स्वारगेट वरून, जमिनी खालून दुसऱ्या दोन मशीन्सही बुधवार पेठला पोहचत आहेत. या मशीन्स रिव्हर्स डायरेक्शन मध्ये जाऊ शकत नाहीत. त्यांना डिसअसेंबल्ड करून वर काढावे लागते.
पुणे मेट्रो प्रकल्पा संदर्भात, इलेव्हेटेड व अंडर ग्राउंड कन्स्ट्रक्शनचे, TBMचे अनेक व्हिडिओ युट्युब वर उपलब्ध आहेत. त्यातून खूप रंजक व ज्ञानवर्धक माहिती मिळते. सध्या फारशी गर्दी नसल्यामुळे आपल्याला निवांतपणे प्रवास करता येतो. फायबर ग्लासच्या मोठ्या खिडक्यांमधून बाहेरचे विहंगम दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्याद्वारे टिपता येते.
सिविल कोर्ट ते हिंजवडीतील मेगापोलिस सर्कल पर्यंत असलेल्या लाईन नंबर-३चे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबर २०२५ च्या आत पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. त्यास मनःपूर्वक शुभेच्छा!
*प्रा. डॉ. महेंद्र इंगळे*
पुणे, २ ऑगस्ट २०२३
