फक्त आमचेच नसलेले बाबा...
काही व्यक्तींचा जन्मच हा मुळात लोकांच्या सेवेसाठी, कल्याणासाठी झालेला असतो हे त्यांच्या आयुष्यभराच्या साचलेल्या सेवाभावाच्या गंगाजळीतून दिसून येते. असेच एक व्यक्तीमत्व म्हणजे आमचे बाबा विश्वनाथभाऊ इंगळे! समाजासाठी नि:स्वार्थपणे अहोरात्र झटणारे आमचे बाबा बघून आम्हाला आपसूकच वाटायचे की हे फक्त आमचेच बाबा नाहीत...
त्यांच्या पुण्यस्मरणा निमित्त कृतज्ञताभावाने व कर्तव्यनिष्ठेने मी त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांवर नैमित्तिकपणे लिहायचे ठरविले आहे.
बाबांचा जन्म १० मे १९३८ ला तापी- पूर्णा नद्यांच्या संगमावर वसलेल्या एदलाबाद तालुक्यातील चांगदेव येथे झाला. वडिलांचे अकाली निधन झाल्यामुळे अभ्यासात हुशार असूनही ते सातवी नंतर पुढे शिकू शकले नाहीत. आजीला शेती कामात मदत करित असतांनाच त्यांनी गावातील तरुणांना एकत्रित करून विविध सामाजिक कामांना सुरुवात केली. राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणे, दरवर्षी महाशिवरात्रीला भरणाऱ्या चांगदेव महाराजांच्या यात्रेत भाविकांना सुविधा पुरविणे, शोष खड्डे खोदणे, श्रमदानाची कामे, लहान मुलांकरता संस्कार शिबिरांचे आयोजन यात ते हिरीरीने भाग घेत. १९६९ मधे तापी नदीला आलेल्या महापूराने गावकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. आपल्या तरुण सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी मदत कार्यात सहभाग घेऊन लोकांना दिलासा दिला. त्यांनी *नवयुवक नाट्य मंडळा* ची स्थापना केली. सख्खे भाऊ पक्के वैरी, पंतांची सून, जुलूम, कथा रंगली पाषाणाची, लग्नाची बेडी अशी सामाजिक नाटके बसवून एदलाबाद व रावेर परिसरातील गावांत नाटकांचे प्रयोग केले. मराठी भाषेवर प्रभुत्व, शुद्ध व स्पष्ट उच्चार, पहाडी आवाज ही त्यांना लाभलेली दैवी देणगी होती. कुशाग्र बुद्धी व विलक्षण स्मरणशक्ती त्यांना लाभली होती. त्यांची भाषणे उत्स्फूर्त व प्रभावी असत. तरुण वयातच त्यांना ग्रामपंचायत सदस्य होण्याची संधी मिळाली. ग्रामपंचायत ॲक्ट त्यांचा तोंडपाठ होता.
१९७२ मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. लोकांच्या हाताला काम नव्हते. खायला अन्न नव्हते. प्यायला पाणी नव्हते. माणसं व बाया खणती खणायला, गिट्टी फोडायला जायचे, पण ते ही काम पुरेसे नव्हते. एलो मेलो लाल ज्वारी करिता रेशन दुकानांवर रांगा लागायच्या, पण ती ही पुरेशी मिळत नव्हती. दुष्काळग्रस्तांना काम मिळावे व शासनाने त्यांना मदत करावी याकरिता बाबांनी गावकरी व परिसरातील लोकांचा प्रचंड मोठा मोर्चा काढला.*असे ना का येलो मेलो..पण द्या महिन्याला सहा किलो!* अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यांना अटक करायला पोलीस आले तेव्हा मोर्चेकरी जीपच्या समोर आडवे झोपले.
१९७२ मधे पंचायत समितीचे तेव्हाचे सभापती व जिल्हा परिषदेचे सदस्य केशवराव दुट्टे यांचे अकाली निधन झाल्याने जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक जाहीर झाली. बाबा सर्व समाजासाठी नि:स्वार्थपणे व तळमळीने काम करित होते; ते पाहून लोकांनी पुढाकार घेऊन त्यांना चांगदेव- एदलाबाद( मुक्ताईनगर ) गटातून जिल्हा परिषदे करिता अपक्ष उभे करायचे ठरविले. त्याकाळी काँग्रेस शिवाय दुसरा प्रभावी पक्ष नव्हता. कुठलेही आर्थिक पाठबळ नसतांना व घरात कोणी कर्ता पुरुष नसतांना निवडणुकीत उभे राहणे हे मोठे धैर्याचे काम होते. ते ही अपक्ष!
मा. प्रतिभाताई पाटील (माजी राष्ट्रपती) एदलाबाद विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होत्या व महाराष्ट्र राज्याच्या मंत्री होत्या. काँग्रेसचे उमेदवार रामराव संपत पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माधवराव गोटू पाटील, सरचिटणीस मुरलीधर अण्णा पवार व जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते एदलाबाद येथे डाक बंगल्यावर तळ ठोकून होते.
निवडणूकाचा दिवस जसा जवळ यायला लागला तशी चुरस वाढायला लागली. मोठमोठ्या सभा होत होत्या. नेत्यांची भाषणे होत होती. दिवसभर प्रवास, खाण्यापिण्याची आबाळ, धुळीचे रस्ते, रात्री उशिरापर्यंत भाषणे यामुळे बाबांच्या घशाला सूज आली. बोलायला त्रास होत होता. त्यांची अवस्था बघून बाया माणसांच्या डोळ्यात अश्रू येत होते. लोक कांदा, चटणी व भाकरी बांधून, रुखी सुखी खायेंगे.. विश्वनाथभाऊ को लायेंगे! अशा घोषणा देत प्रचार करित होते.
निवडणूक झाली. सर्वजण प्रचंड थकलेले होते तरीसुद्धा रात्रभर अंगणात बसून होते. दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर झाला. बाबा प्रचंड मतांनी निवडून आले. गावातून त्यांची मोठी मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. घरोघरी त्यांना ओवाळले जात होते. सर्वांचे आभार मानतांना बाबांचा कंठ दाटून आला. घरी जाऊन विश्रांती घ्यावी अशी त्यांनी सगळ्यांना विनंती केली.
त्यावेळेस मी अकरा वर्षाचा होतो व घोषणा देण्यामध्ये अग्रेसर होतो. या प्रसंगाची आठवण झाल्यानंतर आजही मी रोमांचित होतो.
(क्रमशः)
प्रा .डॉ. महेंद्र इंगळे, जळगांव

