*शैलेंद्र इंगळे यांच्या सेवापूर्ती निमित्ताने...*
शैलेंद्र इंगळे हे ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ जानेवारी २०२४ रोजी Hitachi (पूर्वी ची KBX) कंपनीतून सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या विषयीच्या माझ्या भावना येथे व्यक्त करीत आहे.
१९८३ मधे शैलेंद्र जळगाव येथे नव्यानेच सुरू झालेल्या कल्याणी ब्रेक्स कंपनीत रूजू झालेत. १९८७ मधे कंपनीत त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली अंतर्गत संघटना- *कल्याणी ब्रेक्स कामगार संघटना*- स्थापन करण्यात आली. तेव्हा पासून आजपर्यंत संघटने मार्फत कामगार हिताचे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम सातत्याने राबविण्यात आलेत. त्यातील कल्याणी ब्रेक्स हौसिंग सोसायटी, कल्याणी ब्रेक्स पतपेढी, कल्याणी ब्रेक्स मित्र मंडळ, एज्युकेशन कमिटी हे काही महत्त्वाचे प्रकल्प.
कर्मचारी व कुटुंबीयांकरिता विविध सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन, विविध ठिकाणी सहली, विमान व बोटींमधून प्रवास, गुणवत्तेत आलेल्या पाल्यांचा गुणगौरव असे विविध उपक्रम राबविल्याने कर्मचाऱ्यांमधे कुटुंबत्वाची भावना निर्माण होऊन कंपनी मधे कार्य संस्कृतीचे निर्माण करण्यात संघटनेला यश आले. कर्मचाऱ्यांच्या सुख दुःखाच्या प्रसंगात संघटना त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. कंपनी व कामगार यांच्या मधे सामंजस्य असल्याने कंपनीची प्रगती झाली व त्याचा फायदा कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना झाला व त्यांचे जीवनमान उंचावले. KBX कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा लोकांचा एक वेगळा दृष्टिकोन आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना *गुणवंत कामगार* पुरस्कार देऊन सन्मानित केले. कंपनीने पाचगणी येथील Asia Plateau (M R A Centre) या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेण्याची संधी त्यांना प्राप्त करुन दिली.
दर तीन वर्षांनी कंपनी व्यवस्थापना सोबत पगार वाढी संबंधात करार (Agreement) होतात. असे दहा करार त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात सामंजस्याने झाले. या बाबीचा कामगार क्षेत्रात गौरवाने उल्लेख केला जातो. त्यांच्या अथक प्रयत्नाने कामगारांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरुन ६० करण्याचा मोठा निर्णय झाला.
बाबा महाराज सातारकरांची प्रवचने, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आत्मकथन, उमेश कणकवलीकरांचे *मी विजेता होणारच* हे कार्यक्रम, योग प्रशिक्षण शिबिरे, डॉ. रणजीत चव्हाणांची महिलांकरिता आरोग्यविषयक शिबिरे, महिला दिनानिमित्त तीनशे महिलांचा जैन उद्योग समूहाचे प्रमुख मा. भवरलालजी जैन यांच्या हस्ते *ती व मी* हे आत्मचरित्रपर पुस्तक देऊन सन्मान, युवक व महिलांकरता शासकीय तंत्रनिकेतन जळगावच्या कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम( CDP) अंतर्गत स्वयंरोजगार प्रशिक्षणांचे आयोजन असे विविध प्रकल्प आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी राबविले.
बिहारमधील भीषण महापूराने उध्वस्त झालेल्या भागात रोगराई पसरली असतांना आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन तेथे कुजलेल्या अवस्थेतील प्रेतांची विल्हेवाट लावण्याचे अवघड काम केले. किल्लारी भूकंपात तेथे राहून भूकंपग्रस्तांना औषधे व जेवण पुरविण्याचे काम केले. कंपनीतील व परिसरातील अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांना वेळीच औषध उपचार व हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देऊन त्यातून त्यांना बाहेर काढले. मराठा उद्योजक विकास मंडळ, जळगांवचे जेष्ठ समन्वयक या नात्याने समाजातील शेतकरी व शेतमजुर यांच्या मुलामुलींकरिता सामुहिक विवाह सोहळ्यांच्या आयोजनात मोलाची कामगिरी पार पाडली. धुळे येथील मराठा मंडळाकडून माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते *समाज भूषण* पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
सौ. ज्योतीताई इंगळे जळगाव महानगरपालिकेत दहा वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत असताना विशेषतः प्रभाग सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती, स्थायी समिती सभापती अशा विविध पदांवर कार्यरत असताना अनेक संवेदनशील व महत्वाचे निर्णय घेण्यात सौ.ज्योतीताईंना त्यांची मदत झाली. यात प्रशासनाने सेवेतून निलंबित केलेल्या ३४ जणांना पुन्हा सेवेत घेणे, आव्हाणे येथे प्रस्तावित कत्तलखाना दुसरीकडे हलविणे, जळगाव शहराकरिता पाणीपुरवठ्याच्या अमृत योजनेस मंजुरी देणे असे महत्वाचे निर्णय आहेत. हे सर्व त्यांनी कंपनीचे काम सांभाळून केले.
शांत व संयमी स्वभाव, सहकाऱ्यांना सोबत घेऊन व त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकून त्यांच्या मदतीने प्रकल्प राबविणे, शिस्तप्रियता व काटेकोरपणा ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये.
त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासात समर्पित भावनेने काम करणारे श्री. के एम बापू पाटील यांच्या सारखे जीवा भावाचे सहकारी त्यांना लाभले. पत्नी सौ.ज्योतीताई, भावना व प्रतिक ही मुले तसेच सर्व कुटुंबियांची खंबीर साथ त्यांना लाभली. श्री. बाबासाहेब कल्याणी, कंपनीचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी श्री. सतीश शेखरी व सध्याचे श्री. अनिल खांडेकर साहेब, आंतरराष्ट्रीय कामगार संघटने (I L O) सोबत काम करणारे श्री. श्रुती साहेब यांचे विविध प्रकल्प राबविण्याच्या कामी त्यांना मार्गदर्शन लाभले.
कामगार बांधवांनी विश्वास दाखवून त्यांना भक्कम साथ दिली त्याबद्दल त्यांचे मी आमच्या कुटुंबिंयांच्या वतीने मन:पूर्वक आभार मानतो.
शैलेंद्र कंपनीच्या सेवेतून निवृत्त होत आहेत परंतु सार्वजनिक जीवनातून त्यांना लोक निवृत्त होऊन देणार नाहीत. आमचे बाबा विश्वनाथभाऊ इंगळे यांचे कडून त्यांना जनसेवेचा वारसा लाभला आहे. त्यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे. अनेक सामाजिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक संघटनांत ते कार्यरत आहेत. राजकीय क्षेत्रातही त्यांचे काम आहे. आमच्या चांगदेव गावातील श्री. एस.बी.चौधरी हायस्कूलचे ते माजी विद्यार्थी असून आता ते संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
या पुढेही त्यांच्या कडून अशीच जनसेवा घडत राहो या करिता त्यांना भरभरून शुभेच्छा व अनेक आशिर्वाद!
*प्राचार्य डॉ. महेंद्र इंगळे*
