Showing posts with label DEMOCRACY WINS!. Show all posts
Showing posts with label DEMOCRACY WINS!. Show all posts

Thursday, October 31, 2024

DEMOCRACY WINS !

 


*हंस, कावळे व मानसरोवर!*

लोक व्यवहारापासून अलिप्त असलेले, गुढ व्यक्तिमत्त्वाचे, प्रतिभावान व प्रथितयश लेखक जी. ए. कुलकर्णी यांची *विदूषक* ही अंतर्मुख करणारी प्रदीर्घकथा!

मी ती अनेकदा वाचली. आता ऐकतो.  व्यस्ततेमुळे मूळ कथा वाचणे किंवा ऐकणे आपल्याला सहज शक्य होणार नाही; म्हणून या कथेतील हंस, कावळे आणि मानस सरोवर या संबंधातील विडंबनात्मक रुपक-उपकथेचा काही भाग मी येथे उद्धृत करीत आहे. मूळ कथेतील प्रतिके वापरून, पुढे मी या उपकथेचा कल्पनाविस्तार केला आहे.

'*एकदा असंख्य कावळे मानससरोवराजवळ जमले. त्या ठिकाणी शुभ्र पंखांचा, लाल चोचीचा एक हंस हंसीबरोबर जलक्रीडा करत होता. कावळ्यांनी एकदम कलकलाट केला व त्यांनी हंसास मानससरोवर सोडून जाण्यास सांगितलं, कारण त्यांच्या आगमनाच्या क्षणापासून मानससरोवरावर त्यांची सत्ता सुरु झाली होती.

"अनादिकालापासून हे सरोवर हंसांसाठीच आहे." हंस म्हणाला, "शिवाय तुम्हाला पोहता येत नाही, तर मानससरोवर हवं कशाला?"

"आम्हाला पोहता येत नसेल, पण त्याचा आणि स्वामित्वाचा काय संबंध आहे? आपल्या सत्तेची नृत्यशाला अथवा गायनशाला असेल तर आपल्याला नृत्य-गायन आलंच पाहिजे असं कुठे आहे?" कावळ्यांच्या नेत्याने राजकारणी हसून विचारले. हा नेता मोठा व्युत्पन्न होता व त्याने कृष्णद्वीपात जाऊन न्याय व राज्यशास्त्राचा प्रगाढ अभ्यास केला होता.

"आणि आत्ताच्या आत्ता तू मानससरोवर सोडून गेला नाहीस, तर आम्ही सगळे तुझ्यावर तुटून पडू व तुझा आणि तुझ्या निवासस्थानाचा पूर्ण नाश करू!" एक तरूण कावळ्याने गर्जून सांगितले.

परंतु त्याच्या या कर्कश शब्दांनी नेत्यास क्रोध आला व त्याचे संस्कारित मन फार व्यथित झाले. त्याने आपल्या उतावीळ अनुयायांस गप्प बसवले. अशा त-हेच्या आततायी उपायांची योजना आता रानवट झाली होती आणि तिला कृष्णद्वीपनीतीत स्थान नव्हते. त्याने पुन्हा सौजन्यपूर्वक हसून म्हटले, "आपलं म्हणणं मला पूर्ण मान्य आहे. मानससरोवर हंसांसाठीच आहे, ही आपली प्राचीन परंपरा मला अढळ राखायची आहे. उलट, त्या पवित्र परंपरेच्याच सामर्थ्यशाली आश्रयाने मला मातृदेशाची कीर्ती वृद्धिंगत करायची आहे. पण त्यासाठी हंस कोण हे आधी ठरलं पाहिजे. आपण हंस आहात हे कशावरून?"

हंसाला या प्रश्नाचा मोठा विस्मय वाटला. त्याने आपल्या शुभ्र पंखांकडे पहिले. त्याला जलातील प्रतिबिंबात आपली डौलदार मान, तिच्या अग्रभागी असलेली कमलदलासारखी लाल चोच दिसली. पण आपण हंसच आहोत हे सांगण्यास त्यास प्रमाण सुचेना. कावळ्यांचा नेता नम्रपणे हसला. तो म्हणाला, "तेंव्हा प्रथम आपण या प्रश्नाचा निर्णय लावू. येथे उपस्थित असलेल्या सर्वांना आपण एकेक पान आणायला सांगू. जर आपण हंस असाल तर त्यांनी लाल पान आणावं. जर त्यांना मी हंस आहे असा विश्वास असेल तर त्यांनी हिरवं पान आणावं."

" पण या ठिकाणी हंसापेक्षा कावळेच संखेने जास्त आहेत." हंसी म्हणाली.

"देवी, आपले शब्द पूर्ण सत्य आहेत, पण तो आमचा का अपराध आहे?" नेता विनयाने म्हणाला.

थोड्याच वेळात त्या ठिकाणी हिरव्या पानांचा ढीग जमला. हंसीने जाऊन कमळाची एक लाल रंगाची अस्फुट कळी आणून ठेवली.

कावळ्यांचा नेता म्हणाला, "पाहिलंत? न्यायनीतीनुसार निर्णय घेऊन मी हंस ठरलो आहे, हे इतर सारे माझेच आप्तगण असल्यामुळे अर्थात ते देखील हंसच आहेत; आणि आता आपणच मान्य केलंत की, मानससरोवर हंसांसाठीच आहे. तेंव्हा तुम्ही आता येथून जावं हे न्यायाचं होईल."

हंस खिन्न होऊन सरोवराबाहेर आला. हंसीने त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, "प्रिया, तू खिन्न का?" ती म्हणाली, "पानांच्या राशीनं का हंसत्व ठरत असतं? चल, आपण येथून जाऊ. तू ज्या जलाशयात उतरशील ते मानससरोवर होईल! जेथे तू दिसशील ते तीर्थक्षेत्र ठरेल!* "'

सरोवरात, हंसाच्या वळचणीने राहणारी बदके,  समोरच्या झाडावरील वानर,  झाडाच्या ढोलीत राहणारी खार हे हंस व कावळ्यांच्या नेत्यातील संवाद उत्कंठतेने ऐकत होते; तसेच आणलेली लाल व हिरवी पाने मोजून हंस कोण हे ठरवण्याची नाविन्यपूर्ण प्रक्रिया जवळून बघत होते. कावळ्याच्या नेत्याचे  सामर्थ्य, बुद्धीवैभव, वाक्चातुर्य, तर्कसंगत पद्धतीने त्याने केलेले विवेचन, त्याचा शांत व संयमी स्वभाव बघून ते फार प्रभावित झाले. आपणांस अनुयायी म्हणून स्वीकारावे अशी त्यांनी नेत्याकडे आजिजीने विनंती केली; ती त्याने मान्य केली. त्यानंतर घारी आणि  गिधाडांनीही कावळ्यांच्या नेत्याचे नेतृत्व स्वीकारले.

कावळ्यांच्या नेत्याने मानसरोवर बगळ्यांकडे, तर समोरचा भूप्रदेश वानराकडे सोपविला. खारीला आवश्यक त्या सुखसोयी ढोलीतच पुरवण्यात येत असून; सभोवतालच्या प्रदेशाच्या टेहळणीची  जबाबदारी तिच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

आकाशात उंच भरारी घेणारा व आपल्या तीक्ष्ण नजरेने भक्ष्याचा वेध घेऊन, वेगाने झडप घालणारा सुवर्ण गरुड परिस्थितीचे अवलोकन करीत होता. उद्या हेच कावळे पानांचे भारे गोळा करत माझ्या कांचनगौरी शिखरावर अधिकार सांगू लागतील हा विचार त्याच्या मनात येताच त्याच्या अंगावरील पिसे उसळली व डोळ्यात अंगार फुलला... 

*प्रा. महेंद्र इंगळे, जळगांव -पुणे*

(ता.क. कथेत लेखकाला अभिप्रेत असलेले हे कृष्णद्वीप म्हणजे जागतिक दर्जाचे Harward  सारखे एखादे विद्यापीठ तर नाही ना? नेत्याने तेथून MBA, Doctorate of Law, Juris Doctor या सारख्या पदव्या प्राप्त केल्या होत्या काय?  असे प्रश्न मला पडतात.)

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...