'कोल्हे नीती...'
इसाप नीती हा एक दंत कथांचा संग्रह आहे. प्राचीन ग्रीस मधे वास्तव्यास असणाऱ्या इसाप नावाच्या गुलामाने हा कथासंग्रह लिहिलेला आहे. रंजक आणि उद्द्बोधक असलेल्या या कथा लहान थोरांना खिळवून ठेवतात. बुद्धिमत्तेच्या विकासाबरोबरच सारासार विचार करून, विवेक पूर्ण निर्णय घेण्याची क्षमता या कथांच्या वाचनाने निर्माण होते असा समज आहे.
नुकतेच कोल्ह्यांचे एक संमेलन पार पडले. इसाप नीती मधील काही कथांमध्ये कोल्ह्याला धूर्त आणि लबाड संबोधण्यात आलेले आहे; याबाबत एका तरुण कोल्ह्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून, याचा जाब आपण इसापला विचारावा असे विचार मांडले.
त्या अनुषंगाने कोल्ह्यांची बाजू मांडणारा 'कोल्हे नीती' हा कथासंग्रह लिहिण्यात यावा. धूर्त इसाप कथा लिहिण्याची जबाबदारी तरुण कोल्ह्यावर सोपविण्यात यावी असा ठराव संमेलनात सर्वानुमते पारित करण्यात आला. घटनेमुळे कोल्ह्यांच्या जगात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.
तरुण कोल्हा आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणतो:
'भेटेन जेव्हा इसाप मला,
विचारेन मी तेव्हा त्याला
तू का धूर्त बनविले मला?
इसाप नीती लिहून तू
धूर्त कोल्हा कथा सांगितली प्रजेला
खरे तर फसविलेस प्रजेला
नीतिमत्तेचा ठेकेदार कोणी बनविले तुला?
एकमेकांचे पाय ओढण्या माणूस हा टपलेला
सत्ता लोलूप हा झालेला
आणि तरीही तू धुर्त बनविलेस मला!
कोल्हे नीती मी लिहिन जेव्हा,
आणि धूर्त इसाप कथा सांगेन प्रजेला
तेव्हा कसे वाटेल रे तुला?'
शब्दांकन: महेंद्र इंगळे
