मानव तस्करी विरुद्ध लढणाऱ्या सुनीता…
आज ‘पुणे इंटरनेशनल सेंटर’ येथे ‘Meet A Real Life Hero’ या कार्यक्रमात उपस्थित होतो. सिंबायोसिस, MIT, आणि इतर कॉलेजचे विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, फिल्म डॉक्युमेंट्री निर्माते, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, परदेशी नागरिक यांच्या उपस्थितीने सभागृह पूर्णतः भरलेले होते. श्री. सुशील बोर्डे हे कार्यक्रमाचे निमंत्रक होते.
वयाच्या १५ व्या वर्षी सामुहिक बलत्काराच्या शिकार झालेल्या, त्यानंतरचा आयुष्याचा प्रत्येक क्षण अशा अत्याचारांना बळी पडलेल्या मुलींच्या पुनर्वसनाकरिता उपयोगात आणेल असा दृढ निर्धार केलेल्या, श्रीमती सुनिता कृष्णन, आपल्या ३७ वर्षाच्या संघर्षमय प्रवासाचा पट मांडत होत्या, तेंव्हा संपर्ण प्रेक्षागृह दिग्मूढ होऊन ऐकत होते!
१५० मिलियन डॉलरची उलाढाल असलेल्या, ह्यूमन ट्रॅफिकिंगच्या व्यवसायात अडसर ठरू पाहणाऱ्या, सुनिता यांचेवर १७ जीवघेणे हल्ले झाले, त्यात त्यांचा उजवा कान निकामी झाला, शरीराची अनेक हाडे मोडली, बॉडी पोश्चर बदलले पण, त्या हरल्या नाहीत. अधिक निर्धाराने त्यांनी आपला संघर्ष सुरू ठेवला आहे.
आधुनिक तंत्र ज्ञानाचा उपयोग करून, समर्प्रीत भावनेने काम करणाऱ्या आपल्या २०० सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी आपले ‘Strategic War against human traffiking’ चे हे युद्ध सुरू ठेवले आहे.
श्रीमती सुनीता यांनी हैदराबाद येथे ‘प्रज्वला’ फाउंडेशनची स्थापना केली. तेलंगणा राज्यातील महेश्वरम मंडल येथे पुनर्वसन केंद्राची निर्मिती केली. ३०,००० पेक्षा अधिक पिडीत मुलींची सुटका करून त्यांचे पुनर्वसन केले.
त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
I Am What I Am: A Memoir या पुस्तकातून त्यांच्या संघर्षमय जीवनाचा परिचय होतो.
श्री सुशील बोर्डे यांना, आपले आजोबा स्वातंत्र सैनिक मा. रामराव बोर्डे यांचेकडून देशसेवेचा आणि वडिल मा. प्रतापराव बोर्डे यांचेकडून सामाज सेवेचा वारसा लाभलेला आहे. या ज्वलंत विषया संबंधी जनजागृती करण्यात महत्त्वाचे कार्य त्यांनी केले आहे, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
पद्मश्री सुनीता कृष्णन यांच्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रा. डॉ. महेंद्र इंगळे @ पुणे, मार्च २६, २०२५

 
 
 
