*Fish Pond - SPACE 82!*
सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, अंधेरी, मुंबई या संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेकडून दर वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या शनिवार/रविवारी मेळावा आयोजित करण्यात येतो. संस्थेत शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, शिकून ज्यांना २५ वर्षे पूर्ण झालीत अशा माजी विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच आपआपल्या क्षेत्रातील विशेष नैपुण्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार दिले जातात व भविष्यात राबवित येणाऱ्या प्रकल्पांविषयी संकल्पना मांडण्यात येतात.
या वर्षीच्या ४ जानेवारीच्या कार्यक्रमाला ईच्छा असूनही मी उपस्थित राहू शकलो नाही. ५ जानेवारीला प्रा. डॉ. उमेश उमाळे यांच्याशी बोलणे झाले तेंव्हा कार्यक्रमात माझी आठवण झाली हे त्यांच्याकडून ऐकून आनंद झाला.
कमनिमित्त, काल मुंबईला गेलो होतो; तेंव्हा सुरेश महाजन यांनी गोवा येथील Mechanical-1982 गेट टुगेदर च्या आठवणी शेयर केल्या. त्यांच्या कडे असलेल्या कॉलेज मॅगेझिन मधील एक फोटो बघून आठवणींची एक दृश्य मालिका माझ्या समोरून सरकू लागली. मी त्या फोटोचा फोटो काढला! या संबंधी लिहिण्याची उर्मी दाटून आली.
*वर्ष १९८२!*
विद्यार्थीप्रिय तरुण व उत्साही, प्रा.नातू, प्रा.राऊळ यांच्या सोबत विद्यार्थी प्रतिनिधींच्या झालेल्या बैठकीत या वर्षी गॅदरिंग अगदी जोरात व नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरे करायचे असे सर्वानुमते ठरले. त्यानुसार विविध समित्यांचे गठण झाले व सर्वजण उत्साहाने कामास लागले. आम्ही काही मित्रांनी IIT पवई चा Mood Indigo महोत्सव बघितला होता. आपल्या कॉलेजच्या शॉर्ट फॉर्म नावा मधे कलात्मक रित्या A व त्यापुढे सध्याचे वर्ष 82 लिहून बनणारे ‘SPACE 82’ असे नाव महोत्सवाला द्यायचे आम्ही ठरविले.
प्रा. सौ. गोगटे मॅडम यांचे अध्यक्षतेखाली फिश पाँड समिती गठीत करण्यात आली. फिश पाँड करिता नॉमिनल फी ठेवावी, प्रत्येक फिशपॉंड ला नंबर द्यावा, तीन उत्कृष्ट फिशपॉंडना बक्षिस देण्यात यावे, वैक्तिक व्यंगावर फिश पाँड असू नये ,मॅडम यांची सही असलेलेच सेलेक्टेड फिशपॉंड वाचण्यात यावे असे सर्वानुमते ठरले.
फिश पाँड हा सगळ्यांचा आवडीचा कार्यक्रम !
SPCE चा ओपन ऑडिटोरियम खच्चून भरला होता. मी फिश पाँड वाचायला सुरवात केली. नाव उच्चारल्यावर प्रत्येक जण स्टेज वर यायचा, मी त्यांना सन्मानपूर्वक उभे राहण्यास जागा करून द्यायचो, त्यांच्याकडे मिश्किल नजरेने बघून, माझ्या अंदाजानुसार ज्यांनी फिश पॉंड लिहला असावा त्या ग्रुपकडेही बघायचो. त्यानंतर विशिष्ट शब्दावर जोर देवून, आवश्यकता असेल तर पॉज़ घेऊन, यमक असल्यास गेयतेने फिशपॉंड वाचन सुरू करायचो. सिव्हिल ब्रँचच्या विद्यार्थ्यांवर फिश पाँड असायचा तेंव्हा मी सिव्हिल या शब्दाचा ‘शिऽविल’ असा उच्चार करायचो, तेंव्हा एकच जल्लोष व्हायचा. अनेक फिश पाँड्सना वन्स मोर मिळायचे.
कार्यकर्माच्या खूप आधी, सर्व फिश पाँड्स, मी एव्हड्या काळजी पूर्वक व पुन्हा पुन्हा वाचले होते कि, ते जवळ जवळ पाठ झाले होते. आमच्या कोअर ग्रुप मेंबर्स समोर फिश पाँड रिडिंगची मी रिहर्सल केली होती.
असाच माझ्यासह सर्व मित्रांच्या आजही स्मरणात राहिलेला हा एक फिश पाँड!
आमच्या एका मैत्रिणीचे F E चे काही विषय राहिले होते व तिला ATKT म्हणून S E मधे प्रवेश मिळाला होता.
*’गेली तर T E पर्यंत गाडी…*
*नाही तर हातात बाबा गाडी…’*
असा फिश पाँड तिला मिळाला. तो तिने अगदी खिलाडू वृत्तीने स्वीकारला.
बऱ्याच दिवसांनी, मित्र मैत्रिणींच्या सहज गप्पांमधे, ‘खरे सांगशिल. सदर फिशपॉंड, तू , गोगटे मॅडम यांना न दाखवताच वाचला होतास ना?’ असे तिने विचारले, तेंव्हा मॅडम यांची सही असलेली फिश पाँड स्लिप मी तिला दाखविली होती.
पुढे, तिची T E पर्यंतच नाही, तर सातासमुद्रापार गाडी गेली. ती अमेरिकेची नागरिक असून तेथे सुखेनैवपणे आनंदी जीवन जगत असावी!.
महेंद्र इंगळे, पुणे
जानेवारी, २०२५
*टिपा:*
F E - First Year of Engineering
T E - Third year of Engineering
२८ फेब्रुवारी १९८२ च्या फोटोत रणजित नाईकनवरे फिशपॉंड स्वीकारतांना दिसत आहेत. नाईकनवरे डेव्हलपर्सचे संचालक असलेले आमचे मित्र President, CREDAI Pune Metro हे सन्मानाचे पद भूषवित आहेत.
४ जानेवारी २०२५ च्या कार्यक्रमातील फोटोत प्राचार्य डॉ .एम.एम. मुरुडी व प्रा. डॉ. उमेश उमाळे दिसत आहेत.
नेहमी प्रमाणे आपला फीडबैक द्यावा म्हणजे त्याप्रमाणे बदल करता येतील.

 
 
 
