आकलन ( Perception)
आकलन या विषयावर बोलतांना, काही दृष्टी भ्रम निर्माण करणाऱ्या चित्रांचा मी उपयोग करतो. अशाच एका चित्रात, काहींना येक म्हातारी तर, काहींना येक लहान मुलगी दिसते. त्यावरून असे प्रतिपादन करतो…
१. आपल्याला जे दिसते तेच वास्तव असते असे नाही.
२. आपल्याला जे दिसते तेच इतरांना दिसते असे नाही.
सभोवताली घडणारी घटना आपण बघतो किंवा त्याविषयी ऐकतो, त्यांनतर आपल्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या आधारावर आपल्या अपेक्षा व पूर्वग्रहा नुसार त्याचा अर्थ लावतो, त्यावर प्रतिक्रिया देण्याचा, कृती करण्याचा विचार करतो आणि त्यानुसार वागतो.
दृष्टिकोन (Attitude)
जन्मतःच मिळालेली गुणसूत्रे, बालपणी संगोपन झाले ती परिस्थिती, आजूबाजूचे वातावरण व स्वविकासा करिता व्यक्ती करित असलेले प्रयत्न यानुसार व्यक्तिमत्त्व घडत असते. या प्रक्रियेत सभोवतालच्या घटनांकडे बघण्याचा व जीवनाविषयी एक दृष्टीकोन तयार होत जातो. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे आकलन बऱ्याचअंशी आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते.
सकारात्मक दृष्टिकोन असल्यास घटनेबद्दल प्रतिक्रिया योग्य पद्धतीने दिली जाते. सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींचे अंतर्मन अधिक प्रभावशाली पद्धतीने कार्य करते. सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींना, निर्णय प्रक्रियेत, अंतर्मनाच्या शक्तीचा जास्तीत जास्त उपयोग होतो.
स्वविकासा करिता, व्यक्ती प्रयत्नशिल असल्यास, प्रशिक्षणाच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टिकोन विकसित करता येतो.
एकाच प्रकारच्या दोन घटनांचे दोन वेगवेगळ्या पद्धतीने आकलन व दृष्टिकोनांनुसार त्यावरिल दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया या संबंधीच्या दोन गोष्टी आपणास येथे सांगतो .
१.लक्षावधींच्या सभा गाजवणारा एक मोठा नेता भाषणा करिता उभा राहिला. शहराबाहेरचे प्रशस्त मैदान गर्दीने फुलून गेले होते. आजू बाजूच्या रस्त्यावरील वाहतूक थांबली होती. नजर पोहचेल तिथपर्यंत जनसमुदाय होता .
नेत्याने भाषणास सुरवात केली. श्रोत्यांची नाडी पकडली. मिनटा मिनिटाला टाळ्यांचा प्रचंड गडगडाट होत होता. भाषणा दरम्यान क्षणभर थांबून, छाती बाहेर काढून, स्वतःभोवती डावी उजवी कडे फिरून मैदान नीट न्याहाळू लागला. त्याच्या मनात विचार तरळून गेला …
केव्हढी मोठी सभा!
लाखो डोळे आपल्यावर रोखले आहेत…
लोक कानात प्राण ऐकून ऐकत आहेत…
आपल्या जीवनातील हा अत्युच्च आनंदाचा क्षण!
दोन पोलिस अधिकारी धावत व्यासपीठावर पोहचले. वायरलेस द्वारा प्राप्त झालेला संदेश त्यांनी नेत्याकडे दिला. नेत्याचा एकुलता एक मुलगा अपघातात मृत्युमुखी पडला होता.
संदेश वाचून नेता व्यासपीठावर कोसळला .
२.पंढरपूर यात्रेत गाडगे बाबांचे कीर्तन सुरू होते. बाबांचे सहकारी धावत बाबांजवळ पोहचले आणि सांगितले, “बाबा, आपला गजानन गेला.” चोखामेळा धर्मशाळेत, इलेक्ट्रिकचा शॉक लागून गजाननचा मृत्यू झाला होता.
सहकाऱ्यांचे बोलणे ऐकल्या नंतर बाबांच्या तोंडून शब्द बाहेर पडले,
“ज्याचा होता त्याने नेला…
बोला, देवकीनंदन गोपाला…”
आणि कीर्तन पुढे सुरू झाले.
१. घटनेत सुख किंवा दुःख नसते. घटनेचा आपण स्वतःवर कसा परिणाम करून घेतो यावर ते अवलंबून असते.
२. घटना घडण्यावर आपले नियंत्रण नसते पण, तिचा परिणाम आपल्यावर कसा होऊ द्यायचा हे नियंत्रित करू शकतो.
प्रा. महेंद्र इंगळे, पुणे… फेब्रुवारी, २०२५
ता. क. :शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथे Development of Work Culture (कार्य संस्कृती विकास) या प्रशिक्षण कार्यक्रमातील माझ्या प्रेजेंटेशनचा काही भाग…
 
 
 
