परवा शिशिर जैन भेटला. शिशिर श्रमसाधना ट्रस्ट द्वारा संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअर अँड टेक्नॉलॉजी, जळगांव या संस्थेचा १९८३ च्या पहिल्या बॅचचा माझा विद्यार्थी. आता मानस कन्स्ट्रक्शन या नावाने जळगांवात बांधकाम व्यवसायात आहे. सर, तुम्ही ॲप्लाईड मेकॅनिक्स तर उत्कृष्टरित्या शिकवित होताच; पण तुमच्या शिस्त आणि वर्तणूकी बद्दलच्या आग्रहाचा आम्हाला खूप फायदा झाला असे त्याने सांगितले.
........पुणे विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट असलेले माझे मित्र प्रा. एल. पी. पाटील व मी वेगवेगळ्या डिव्हिजन्सला ॲप्लाइड मेकॅनिक्स हा विषय अत्यंत आवडीने शिकवायचो. त्याकरिता प्रचंड मेहनत घ्यायचो. Beer and Johnston यांनी लिहिलेली व जगभरात वापरली जाणारी मॅक्ग्रा हिल पब्लिकेशनची Engineering Mechanics ची Statics आणि Dynamics ही दोन पुस्तके आम्ही वापरायचो. अत्यंत नेटकेपणाने आणि काळजीपूर्वक छापलेल्या या पुस्तकांत कोणतीही प्रिंटिंग मिस्टेक नाही तसेच सर्व अनसॉल्व्हड प्रॉब्लेम्सची शेवटी दिलेली उत्तरे तंतोतंत बरोबर आहेत. या पुस्तकांतील जवळजवळ सर्व प्रॉब्लेम्स आम्ही सोडविले होते. डायनामिक्स या भागातील काही प्रॉब्लेम्स आम्हाला सोडविता येत नव्हते तेव्हा पुणे येथे जाऊन प्रा. बर्वे यांचे मार्गदर्शन घेतले होते.
पंचवीस वर्षानंतर माझी मुलगी पौर्णिमा हिने Vishwakarma Institute of Technology, Pune या संस्थेत शिकत असतांना माझ्याकडे असलेले हेच पुस्तक वापरले. या विषयात ती प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्यानंतर तिचे शिक्षक प्रा. तारापोरवाला यांनी तिला बोलवून तुला कोणाचे मार्गदर्शन लाभले याची विचारणा केली होती. आजही ही पुस्तके माझ्याकडे आहेत.
पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अतिशय कठीण असलेला अप्लाईड मेकॅनिक्स हा विषय शिकवितांना मला व्यक्तिशः त्याचा खूप फायदा झाला. माझ्यातील अभ्यासू वृत्ती वृद्धिंगत झाली. या विषयाने मला ऐश्वर्य संपन्न केले. विद्यार्थ्यांमध्ये व सहकाऱ्यांमधे माझ्याविषयी आदर निर्माण केला.
........ अप्लाईड मेकॅनिक्स या विषयाचे सत्र कर्म (Term Work) वेळेत पूर्ण न केल्यामुळे, प्राचार्य एम.जी. पाटील यांचा त्यास विरोध असतांनाही, मी चतुर्वेदी नावाच्या एका विद्यार्थ्याला डिटेंड (परीक्षेला बसण्याची परवानगी नसणे) केले. चतुर्वेदी हा दिल्ली येथील केंद्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुलगा होता. जळगांव येथील एक उद्योजक त्याचे स्थानीय पालक होते.
सदर प्रकरणाची मा. प्रतिभाताई पाटील यांनी फोन करून माहिती घेतली. चतुर्वेदी हा बेशिस्त विद्यार्थी आहे, त्याला वारंवार संधी देऊनही त्याने सत्र कर्म पूर्ण केले नाही. संस्थेच्या दीर्घकालीन हिताचा विचार करता व शिस्त टिकून राहावी याकरिता त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे असे मी त्यांना सांगितले. त्यावर ठीक आहे, योग्य तो निर्णय घ्या असे त्यांनी सांगितले होते. विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयात सत्र कर्म पूर्ण न केल्यामुळे डिटेंड झालेला हा बहुदा पहिलाच विद्यार्थ्या असावा.
..........१९८२ मधे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, मुंबई येथून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी प्राप्त केल्यानंतर मी काही काळ उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होतो.
महाराष्ट्र शासनाच्या एका क्रांतिकारी निर्णयाद्वारे, १९८३ मधे महाराष्ट्रात अनेक संस्थांना विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी मिळाली. श्रमसाधना ट्रस्ट या संस्थेस जळगांव येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू सुरू करण्याची परवानगी मिळाली. महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण खात्याच्या मंत्री असलेल्या मा. प्रतिभाताई पाटील या संस्थेच्या अध्यक्ष होत्या.
प्राचार्य एम जी पाटील व अधिव्याख्याते..... लीलाधर पाटील, मनोज बेंद्रे, सुनील बढे, राजीव चौबे, प्रमोद बोरोले, सतीश महाजन, बोरसे, खंडेलवाल, श्रीमती वारके व मी असे सर्वजण आम्ही ८ऑगस्ट १९८३ रोजी एम जे कॉलेजच्या आवारात दाखल झालो. एम जे कॉलेजचे प्राचार्य डी एस नेमाडे यांचे कडून कॅन्टीन जवळ असलेल्या स्टुडन्ट रूमची चावी घेतली. स्टुडन्ट रूम मधे प्राचार्य व प्राध्यापक कक्ष, नंतर मिळालेल्या तिच्या शेजारच्या रूम मधे कार्यालय, एम जे कॉलेजच्या टाईम टेबल स्लॉटमध्ये रिकामी असतील ते क्लासरूम, प्रात्यक्षिके शासकीय तंत्रनिकेतन जळगांव येथे या पद्धतीने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ची सुरुवात झाली.
कॉलेज कामानिमित्त मुंबईला गेल्यावर आम्ही मा. प्रतिभाताई यांना मिळालेल्या सेवा सदन बंगल्यात राहायचो. तिथे जळगाव जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते व अधिकारी भेटायचे. मी मुंबई येथील युनियन व आयडियल बुक डेपो मधून मोठा डिस्काउंट घेऊन लायब्ररी करिता पुस्तके आणली. सुनील बढे यांनी अकबर अली स्ट्रीट वरून वर्कशॉप व इतरत्र लागणारऱ्या टूल्सची खरेदी केली, राजीव चौबे यांनी फिजिक्स, केमिस्ट्री या विषयांकरता लागणारे प्रयोगशाळा साहित्य तर खंडेलवाल यांनी लुधियानावरून वर्कशॉप करिता लागणारी मशिनरी खरेदी केली. लीलाधर पाटील यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आवश्यक फर्निचर, स्टेशनरी खरेदी केली.
कॉलेज कामकाजा संबंधीच्या आमच्या बैठका मा. प्रतिभाताईंच्या अध्यक्षतेखाली अजिंठा गेस्ट हाऊस, जळगांव येथे व्हायच्या. मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य असलेले ॲड. आबासाहेब डी एन पाटील, खासदार भाईसाहेब वाय एस महाजन, खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जी डी बेंडाळे, पत्रकार शंभू फडणविस, अंधशाळा सांभाळणारे मामा वरियानी आवर्जून उपस्थित राहायचे. आम्ही प्राध्यापक मंडळी या बैठकांमध्ये नवीन नवीन कल्पना उत्साहाने मांडत असू. बऱ्याचदा बैठकांत वेगवेगळी मते मांडली जायची. मा. प्रतिभाताई ते सर्व शांतपणे ऐकून घेत असत.
पहिल्या सत्राचा रिझल्ट लागला. तो अतिशय कमी होता. रिझल्ट कमी लागल्यावर तातडीची बैठक बोलविण्यात आली. बैठकीत रिजल्ट कमी लागल्याबद्दलची कारणमीमांसा सुरू होती व याकरिता प्राध्यापकांना जबाबदार धरण्यात येत होते. चर्चा सुरू असतांना एक सन्माननीय सदस्य We want result by hook or crook असे म्हटले. तेव्हा त्यांच्या या म्हणण्याला मी स्पष्टपणे विरोध केला. पुणे विद्यापीठातील सर्वच विनाअनुदानित कॉलेजचा रिझल्ट कमी लागलेला आहे. आपल्याकडे कमी मेरिटचे विद्यार्थी आहेत. आम्ही प्राध्यापक मंडळी खूप मेहनत घेत आहोत व पुढेही घेऊ. कॉलेजच्या दीर्घकाळ हिताच्या दृष्टीने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्या आम्ही जरूर करू असे सांगितले. प्राध्यापकांचे शिकविणे आणि विद्यार्थ्यांचा रिझल्ट यांचा संबंध लावणे योग्य नाही हेही मी सांगितले.
....आता कॉलेज करिता जागा घेऊन, स्वतःची इमारत बांधण्याचे ठरविण्यात आले. त्याकरिता मुंबई येथील नामांकित आर्किटेक ची नेमणूक करण्यात आली. जळगावला लागून असलेल्या परिसरातील साधारणत: २० ते ३० एकर शासकीय जागा शोधण्याची जबाबदारी मी, प्रा. एल. पी.पाटील व जिल्हा परिषदचे डेप्युटी इंजिनिअर चौधरी साहेब यांच्यावर सोपविण्यात आली. त्याप्रमाणे आम्ही तीन जागा शोधल्या. एक नशिराबादच्या अलीकडे असलेली, दुसरी कुसुंब्या जवळ व तिसरी बांभोरी जवळ. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असलेले अख्तर अली काझी हे नशिराबाद जवळील त्यांच्या मतदारसंघास लागून असलेल्या जागेबद्दल आग्रही होते. परंतु आम्ही, भविष्याच्या दृष्टीने बांभोरी येथील जागा योग्य राहील असे आमचे मत मांडले. त्यानुसार बांभोरी येथील जागा घेण्याचे निश्चित झाले. जागा ताब्यात घेण्यासाठी एप्रिल मे महिन्याच्या कडक उन्हात मी, एल पी पाटील व चौधरी साहेब यांनी मिळून प्लेन टेबल सर्वे केला. जागेची बॉण्ड्री निश्चित करून खुणा गाडल्या. कंटूर सर्वे करून नकाशे तयार केले व आर्किटेक्ट कडे सोपविले.
जागा ताब्यात घेण्याचे सर्व सोपस्कार पार पडल्यावर व ती ताब्यात घेतल्यावर भूमिपूजन करून त्वरित बांधकाम करण्याचे ठरले. त्यानुसार साईटवर भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रखरखीत उन्हात, बांभोरी जवळील, एकही झुडूप नसलेल्या या टेकडीवर एक मंडप टाकण्यात आला. विधानसभेचे उपसभापती असलेले दाजीबा पर्वत पाटील या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मा. प्रतिभाताई पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष होत्या. भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मी केले. त्यावेळेस, आजच्या या ओसाड टेकडीवर उद्या नंदनवन फुलणार आहे ही सदिच्छा व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला.
आज रोजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेचे मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरुन दिसणारे भव्य प्रवेशद्वार, त्यातील मुख्य इमारतीस लागून असलेल्या विविध विभागांच्या प्रशस्त इमारती, लायब्ररी, प्रयोगशाळा, वस्तीगृहे, मेस, कर्मचारी निवासस्थाने, अंतर्गत रस्ते, क्रीडांगण, झाडे, बगीचा, कारंजे हे सर्व बघितल्यानंतर येथे खरोखरीच नंदनवन फुललेले आहे आणि माझे शब्द खरे ठरले आहे याचा आनंद आहे.


 
 
 
