भाग ६: राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष
मुंबई येथे शिवाजी पार्क मधील सभेत १० जून १९९९ ला मा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. मा. छगन भुजबळ यांचे कडे प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. जळगांव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बाबांची निवड करण्यात आली. पक्षाला कार्यालय नसल्याने पक्षाचे कामकाज घरातून सुरू झाले. काही प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षात यावे या करिता बाबांनी त्यांच्या भेटी गाठी घेणे सुरू केले. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी सल्ला मसलत करून तालुका अध्यक्षांच्या व विविध पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. निवडणुकांची घोषणा झाली, परंतु अद्याप पक्षला चिन्ह मिळाले नव्हते. जिल्ह्यातून १२ विधान सभेचे व २ लोक सभेचे सक्षम उमेदवार निवडणे आव्हानात्मक काम होते. विधान सभेचे उमेदवार घोषित झाले. शेवटच्या क्षणी पाचोरा विधान सभेचे उमेदवार बदलण्यात आले.
त्यावेळेस लोक सभेचे एरोंडोल व जळगांव असे दोन मतदार संघ होते. एरोंडोल लोक सभा मतदारसंघातून मा. वसंतराव मोरे काका यांची उमेदवारी निश्चित झाली होती. जळगांव लोकसभा मतदार संघात सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जात होता. सुरवातीला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व एक माजी निवडणूक आयुक्त निवडणुकीकरिता ईच्छुक होते, परंतु नंतर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. तेंव्हा त्यांच्या स्थानिक नातेवाईकांशी सम्पर्क करावा अशा सूचना मा. पवार साहेबांकडून बाबांना मिळाल्या. साधारणपणे रात्री ११ ते ११.३० दरम्यान ते बाबांशी या विषयावर बोलायचे. त्या प्रमाणे प्रत्यक्ष संपर्क केला परंतू प्रतिसाद मिळाला नाही. मा. जे टी महाजन यांचेवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. मी सांगेन त्यांना उमेदावारी मिळणार असेल, विशेषतः रावेर आणि यावल विधानसभा मतदार संघात, तर मी लोक सभेची निवडणूक लढवेल अशी त्यांची भूमिका होती. शेवटी तडजोडी नंतर त्यांनी उमेदवारी स्वीकारली.
सर्व उमेदवार आप आपल्या प्रचारास लगले. सभांचे आयोजन करणे, त्याकरिता प्रशासनाकडून परवानग्या घेणे, स्वतः सभांमधून प्रचाराची भाषणे करणे, कार्यकर्त्यांशी संपर्क करून आढावा घेणे, त्याचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे देणे ही सर्व कामे बाबा एक हाती करत होते. लहान भाऊ शैलेंद्र कंपनीचे काम व कामगार संघटना अध्यक्ष पदाची जबाबदारी संभाळून मदत करीत होता. मुंबई येथील प्रदेश कार्यालयातून निधी व प्राचार साहित्य आणून ते उमेदवारांपर्यंत पोहचवण्याचे अतिशय जबादारीचे काम त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पार पाडले.
हेलीकाप्टर मधे बिघाड झाल्याने, मा. पवार साहेबांच्या शिंदाखेड्याच्या सभेला उशीर झाला. तेथून मोटरीने वरणगाव मार्गे जळगांवला यायला उशीर होणार होता. रात्री जी एस ग्राउंडवर सभा आयोजित करण्यात आली होती. आचार संहिता असल्याने रात्री १० पर्यंतच सभा घेता येत होती. परंतु राष्ट्रीय नेता असल्यास सभेला ११ वाजेपर्यंत परवानगी मिळू शकत होती, त्यानुसार जिल्हा प्रशासनाला विनंती करून सभेची वेळ वाढवुन घेतली होती.
निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. जळगांव जिल्ह्यातून निवडून आलेले एकमेव उमेदवार मा. अरुण भाई गुजराथी महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष झाले.
प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, पुणे @ मे ६, २०२५
 
 
 
