सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या अभियंता मित्रांनो,
सर्वप्रथम भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या *इंजिनिअर्स डे* या भव्य आणि दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल आमचे मित्र, अभियंता पतपेढीचे चेअरमन श्री साहेबराव पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
तसेच या निमित्ताने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या ज्या संस्थांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो.
अभियंता पतपेढी तर्फे इंजि. दीपक निकम यांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत माझे वर्गमित्र कार्यकारी अभियंता प्रमोद मोराणकर यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.
जल संपदा विभागातून अधीक्षक अभियंता म्हणून निवृत्त झालेले आमचे मित्र श्री. व्ही.डी. पाटील साहेब प्रमुख पाहुणे म्हणून येथे उपस्थित आहेत. जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. निवृत्ती नंतर माहिती आयुक्त म्हणून नागपूर येथे त्यांची नियुक्ती झाली, परंतु तेथे त्यांचे मन रमले नाही. जळगाव जिल्ह्यातील नदी खोऱ्यांचा त्यांचा तपशीलवार अभ्यास असून त्यासंबंधीच्या योजना त्यांच्या मनात सतत घोळत असतात. संधी मिळेल तेथे या योजनांना मूर्त स्वरूप यावे याकरिता ते प्रयत्न करीत असतात. त्यांनाही या निमित्ताने आपण ऐकणार आहोत.
१५ सप्टेंबर हा भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण इंजिनियर्स डे म्हणून साजरा करतो. विश्वेश्वरय्या यांनी १८८४ मधे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते मुंबई राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता म्हणून रुजू झाले. धरणांकरिता वापरण्यात येणाऱ्या स्वयंचलित गेटची त्यांनी निर्मिती केली. विश्वेश्वरय्या गेट म्हणून ते ओळखले जातात.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सृजनशील व्यक्ती होते. ते उत्कृष्ट अभियंता तर होतेच,पण एक उत्तम प्रशासक व स्टेटस्मन ही होते. अनेक प्रकल्पांची त्यांनी उभारणी केली. म्हैसूर संस्थांचे दिवाण म्हणून त्यांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारावी व औद्योगिक विकासाला चालना मिळावी याकरिता अथक परिश्रम घेतले. कावेरी नदीवरील कृष्णराज सागर डॅम व त्या शेजारील वृंदावन गार्डन त्यांच्या संकल्पनेतून साकार झाले.
सर विश्वेश्वरय्या अतिशय प्रामाणिक, शिस्तप्रिय, कर्तव्य कठोर व उच्च नैतिक मूल्य जपणारे व्यक्ती होते.
एकदा रात्रीच्या वेळेस विश्वेश्वराय्यांचे मित्र त्यांना भेटायला आले.विश्वेश्वरय्या आपल्या लहानशा डेस्क समोर बसून, मेणबत्तीच्या उजेडात कार्यालयीन कामाचा निपटारा करीत होते. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ती मेणबत्ती विझविली आणि दुसरी पेटवली. त्यांची ही कृती मित्रांस चमत्कारिक वाटली व त्या संबंधात त्यांनी विचारणा केली. तेव्हा विश्वेश्वराय्यांनी सांगितले:
'थोड्या वेळापूर्वी तुम्ही आला तेव्हा मी शासकीय काम करीत होतो. त्याकरिता शासनाने दिलेल्या साधन सामग्रीचा उपयोग करीत होतो. आता आपण व्यक्तिगत कामा करिता भेटत आहोत. तेव्हा शासनाने दिलेली मेणबत्ती मी विझवली आणि माझी स्वतःची मेणबत्ती पेटवली. हा माझ्या कर्तव्याचा भाग असून यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.'
भारत सरकारने *भारतरत्न* हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. १९६० मधे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त बंगळूरू येथे मोठा समारंभ आयोजित करण्यात आला होता. विविध वक्त्यांनी त्यांच्याविषयी गौरव पर भाषणे केल्यानंतर सर विश्वेश्वरय्यांना मार्गदर्शनपर भाषण करण्याची विनंती करण्यात आली. शांतपणे उभे राहून त्यांनी हात जोडून *"धन्यवाद!"* हा एकच शब्द उच्चारला. या एका शब्दात त्यांनी आपल्या जीवनाचा सारांश सांगितला: कमी बोला, जास्त काम करा. जगाच्या इतिहासात, समारंभातील प्रमुख व्यक्तीचे हे सर्वात लहान भाषण असावे. आपल्या जन्मशताब्दी समारंभात उपस्थित राहण्याचे भाग्य त्यांना लाभले.
लांबट चेहरा, पुढे आलेली हनुवटी, त्याच रेषेत धारदार नाक; पांढरे शुभ्र धोतर, कुर्ता, त्यावर कोट-टाय, डोईवर कर्नाटकी पद्धतीची सोनेरी काठांची पांढरी पगडी अशा व्यक्तिमत्त्वाचे, प्रेमळ व स्निग्ध नजरेने फोटो मधून आपल्याकडे बघणारे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ऋषीतुल्य वाटतात.
आजच्या दिवशी आपण त्यांचे स्मरण करतो. त्यांच्या कार्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते. ऊर्जा मिळते. अधिक जोमाने काम करण्यास आपण उद्युक्त होतो.
आपण सर्वजण आपापल्या विभागात उत्कृष्टपणे काम करीत आहात. आपल्यापैकी काहींना शासनाकडून पुरस्कारही मिळालेले आहेत.अशाच प्रकारचे कार्य पुढे सुरू राहू द्या. जे काम कराल ते उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने करा. Problem Solving व Creativity (सृजनशीलता) हे अभियंत्याच्या अंगी असलेले दोन महत्त्वाचे गुण. कुठलाही 'प्रॉब्लेम' समोर आल्यानंतर त्याला आव्हान समजा. तो सोडवत असतांना आपल्याला अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळणार आहे या दृष्टीने त्याकडे बघा. समस्या सोडविल्यानंतर जे आत्मिक समाधान मिळते त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही.
तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या कडे असलेल्या ज्ञान व कौशल्याचा उपयोग करून मानवी जीवन अधिक सुखकारक करणे तसेच तांत्रिक बाबींमुळे मानवी जीवनात निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपायोजना शोधणे हे अभियंत्याचे मुख्य कार्य आहे.
माणसाने राहण्याकरिता घर तयार केले आणि त्यानंतर तो शेती करू लागला तेव्हापासून मानवी जीवनात अभियांत्रिकीला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. त्यानंतरच्या औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात अमूलाग्र बदल झाला. उत्पादनात मशीन्सचा उपयोग करण्यात येऊ लागला. मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हायला लागले. दळणवळणांच्या साधनांची निर्मिती झाली. यात अभियंत्यांची महत्त्वाची भूमिका होती. औद्योगिक क्रांतीनंतर मृत्यू दर घटल्याने लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली. उद्योग व्यवसायांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली. नफा हेच त्यांचे उद्दिष्ट झाले. भांडवलशाहीचा उदय झाला. मूल्याधिष्ठित जीवनप्रणालीचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. सामाजिक व राजकीय क्षेत्रात याचे परिणाम दिसू लागले.
विसाव्या शतकाच्या मध्यापासून माहिती तंत्रज्ञानाचे (IT) युग अस्तित्वात आले. नवीन तंत्रज्ञान विकसित झाले. कारखान्यात उत्पादनासाठी रोबोटचा उपयोग व्हायला लागला. मोबाईल व इंटरनेट मुळे जग हे एक वैश्विक खेडे वाटायला लागले. सुखकारक जीवन जगण्या करिता कल्पनेपलीकडच्या सुखसोयींची उपलब्धता झाली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या उपयोगाद्वारे मानवी संवेदनांच्या क्षेत्रात शिरून प्रतिरुप वास्तव निर्मितीच्या जवळ माणूस पोहोचलेला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास, ग्लोबल वॉर्मिंग, सायबर सिक्युरिटी यासारख्या अनेक समस्या यातून निर्माण झालेल्या आहेत. त्यावर उपाययोजना शोधणे हे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांसमोरचे मोठे आव्हान आहे. रिन्यूएबल एनर्जीचा शोध घेणे, ग्रीन इंजिनिअरिंग प्रमोट करणे यासारख्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
यानिमित्ताने तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा धावता आढावा घेऊन त्यातील अभियंत्यांची भूमिका आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्याचा आपणांस अभियंता म्हणून कार्यरत राहतांना निश्चित उपयोग होईल.
या प्रसंगी आपणा सर्वांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपणास सुयश चिंतितो. धन्यवाद!
*प्राचार्य डॉ. महेंद्र इंगळे*
सप्टेंबर १५, २०१८
(अभियंता पतपेढी, जळगांव द्वारा जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील भाषण: संकलित)

 
 
 
