*शिक्षक दिनानिमित्ताने...*
५ सप्टेंबर हा भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. तो आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.
घरची गरिबीची परिस्थिती असतांनाही डॉ. राधाकृष्णन यांनी एम ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. तत्त्वज्ञान या विषयावर त्यांनी अनेक संशोधन पर लेख व पुस्तके लिहिली. एक तत्त्वज्ञ म्हणून त्यांची झालेली ख्याती बघून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांची तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली.
डॉ. राधाकृष्णन यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. आंध्र, कलकत्ता व बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून कार्यरत असतांना त्यांनी तेथे आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटविला. युनोस्को मधे भारताचे प्रतिनिधी, रशियात भारताचे राजदूत, प्रथम उपराष्ट्रपती आणि त्यानंतर राष्ट्रपती म्हणून झालेली निवड हा त्यांच्या कार्याचा गौरव होता. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे थोर विचारवंत, तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ञ होते. भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानाची पाश्चिमात्त्य जगाला ओळख करून देण्यामधे त्यांचा मोलाचा वाटा आहे.
कठीण परिस्थितीत, संघर्ष करून मार्ग काढणारा सृजनात्मक व्यक्ती निर्माण करणे हा शिक्षणाचा उद्देश असायला हवा. शिक्षक हे देशातील सर्वोत्तम बुद्धिमंत असावेत. शिक्षणाद्वारेच मानवाच्या बुद्धीचा सदुपयोग होऊ शकतो. संपूर्ण विश्व एक समजून, मानवाच्या उन्नती करिता शिक्षण पद्धती विकसित व्हावी असे त्यांचे मौलिक विचार होते.
डॉ. राधाकृष्णन हाडाचे शिक्षक होते. तत्त्वज्ञानासारखा गंभीर विषय ते अगदी सहज सोप्या पद्धतीने शिकवित असत. त्यामुळे विद्यार्थ्यांची त्यात आवड निर्माण होत असे. आपल्या नर्म विनोद बुद्धीने ते वर्गातील वातावरण हलकेफुलके करीत असत.
म्हैसूर विद्यापीठातील त्यांच्या निरोप समारंभा प्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांची विद्यापीठापासून रेल्वे स्थानकापर्यंत भव्य मिरवणूक काढली. सजवलेली बग्गी विद्यार्थ्यांनी स्वतः ओढत नेली. ही शोभायात्रा बघायला म्हैसूर शहरातील नागरिक रस्त्यावर दुतर्फा उभे होते.
आजच्या या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे स्मरण करून, उच्च नैतिक मूल्यांचे आचरण करून एक चांगले जीवन जगण्याची प्रेरणा आपण त्यांच्या चरित्रातून घ्यावी. आपल्या शिक्षकांचा सन्मान करावा. त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगावी.
आजच्या या दिवशी मीही माझ्या गुरुजनांचे स्मरण करून त्यांचे विषयी कृतज्ञताभाव व्यक्त करतो. सुदैवाने मला खूप चांगले शिक्षक मिळाले. चांगदेव येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा, श्री. एस. बी. चौधरी हायस्कूल, शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, मुंबई येथील माझ्या शिक्षकांनी मला भरभरून प्रेम दिले, वेळोवेळी कौतुक केले. माझे आयुष्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.
माझ्या सर्व सहकारी शिक्षक मित्रांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या उज्वल भवितव्याकरिता सुयश चिंतितो.
धन्यवाद!
*प्रा. डॉ. महेंद्र इंगळे*
जळगाव, सप्टेंबर २०१७
(शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथील विद्युत विभागाने आयोजित केलेल्या शिक्षक दिन समारंभा प्रसंगी केलेले भाषण: संकलित)
