*NITTR, Bhopal शी ऋणानुबंध...*
महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण विभागात World Bank Assisted Project राबविला जात असतांना त्या प्रकल्पांतर्गत माझी HRD Ministry अंतर्गत येत असलेल्या Technical Teachers' Training Institute, Bhopal या नामांकित संस्थेत Barkatullah University संलग्न Master of Technical Education या पदव्युत्तर अभ्यासक्रमा करिता निवड झाली. याकरिता प्राचार्य एम.एस. महाजनसर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. माझ्यासोबत महाराष्ट्रातील प्रा. जी .एम. केचकर व प्रा. पी.पी. पवार हे आणखी दोघे सहकारी होते.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व मध्य प्रदेशची राजधानी असलेले भोपाळ एक सुंदर शहर. येथे पाच सुंदर जलाशये असल्यामुळे या शहराला 'सिटी ऑफ लेक्स' असेही म्हणतात. भोपाळ शहरातील सर्वात सुंदर अशा शामला हिल्स परिसरात आमची TTTI ही संस्था होती. शेजारीच मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांची निवासस्थाने होती. त्याला लागून नाट्य, संगीत, पारंपारिक कला, संस्कृती यांच्या उन्नती करता स्थापन करण्यात आलेली केंद्र शासनाची भारत भवन ही संस्था. येथून खाली जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला वनविहार राष्ट्रीय उद्यान तर दुसऱ्या बाजूला बडा तालाब.
प्रा. आर. के. मणी हे संस्थेचे डायरेक्टर होते. त्यांच्या अनेक जवळचे मित्र राज्य व केंद्र शासनात सचिव पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यात एक आत्मविश्वास व मोकळेपणा जाणवायचा. अनेक महत्त्वाचे प्रकल्प मिळवण्याच्या कामी त्यांचा संस्थेला फायदा झाला. कुठल्याही कार्यक्रमात त्यांची उपस्थिती चैतन्यदायी असायची. मॅनेजमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. मंजूल सक्सेना, प्रा.आर.बी. शिवगुंडे व प्रा. बी.एल. गुप्ता हे मॅनेजमेंट विषय शिकवत असतांना त्यातील मॉडेल्स अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगत असत. व्यवहारात त्याचा प्रत्यक्षात कसा उपयोग होतो ते सोदाहरण स्पष्ट करून सांगायचे.
अमेरिकेत स्थायिक झालेले संस्थेचे माजी प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर हे आम्हाला Leadership Development हा विषय शिकवण्याकरिता अमेरिकेवरून आले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत तीन दिवस त्यांनी आम्हास हा विषय शिकवला. अक्षरशः कानात प्राण आणून आम्ही त्यांचे बोलणे ऐकत असू. आमच्यासोबत अनेक फॅकल्टी मेंबर्सनी त्यांचे सेशन्स अटेंड केले.
मराठी वाचनाची मला आवड होतीच पण इथे आल्यावर मला अनेक चांगली इंग्रजी पुस्तके वाचायला मिळाली. त्यामुळे इंग्रजी वाचनाची माझी आवड वाढली. येथील भव्य लायब्ररीत (Learning Resources Centre) मध्ये सर्व प्रकारच्या पुस्तकांबरोबरच विविध प्रकारचे Magazines, International Journals, Audio Video Cassettes उपलब्ध होते. Harvard Business Review मधील केस स्टडीजचा मला Assignment लिहितांना खूप उपयोग व्हायचा. नव्याने चर्चेत आलेले Peter Segne चे Learning Organisation Model मला इथे अभ्यासायला मिळाले. Peter Drucker ची मॅनेजमेंट या विषयावरील, Stephen Covey ची लीडरशिप या विषयावरील, Sigmand Fried, Thomas Anthony, Abrahm Maslow यांची मानसशास्त्र विषयावरील... अशी पुस्तके मी अभ्यासा करिता वापरली.
Power of Positive Thinking, Tough Times Do Not Last But Tough People Do, An Autobiography of a Yogi ही बेस्ट सेलर असलेली पुस्तके वारंवार वाचत असतो.
भारत भवन मध्ये नवीन नाटक यायचे तेव्हा ते आम्ही आवर्जून बघायला जायचो. येथे आम्ही घाशीराम कोतवाल, चरणदास चोर, दो कवडी का खेल यासारखी अनेक हिंदी नाटके बघितली. नाटकाच्या तिकिटा सोबत नाटकाचं रसग्रहण केलेली व सुंदर फोटोग्राफ्स असलेली एक पुस्तिका प्रत्येकाला मिळायची त्यामुळे नाटकाविषयी व त्यातील कलाकारांविषयी सखोल माहिती मिळण्यास मदत व्हायची. बऱ्याचदा संध्याकाळी आम्ही भारत भवन वर फिरायला जायचो त्यावेळेस प्रसिद्ध नाटककार हबीब तन्वीर कॅन्टीनमध्ये किंवा शिल्प, चित्र, हस्तकला यांच्या वर्कशॉप्स मध्ये हातात चिरूट घेऊन आरामात बसलेले किंवा गप्पागोष्टी करीत असलेले दिसायचे. बऱ्याचदा त्यांच्याशी जुजबी बोलणे व्हायचे.
मुलांना दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यावर आम्ही सहकुटुंब तिथे राहत असू. ट्रेनी हॉस्टेलमध्ये प्रत्येकाकरिता सिंगल रूम व मेस व्यतिरिक्त कॉमन कीचन ची व्यवस्था होती.
भोपाळ येथील माझे १९९६ ते १९९८ या कालावधीतील वास्तव्य अतिशय आनंददायी व संस्मरणीय ठरले. या कालावधीत माझ्या व्यक्तिमत्वात मोठा बदल घडून आला.
यापूर्वी १९८९ मध्ये व ९० मधे इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम फेज-१ व फेज-२ करिता TTTI (NITTR) येथे आलो होतो, परंतु तेव्हा बराच वेळ हा ओल्ड मार्केट आणि न्यू मार्केट मध्ये फिरण्यात जायचा. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी पंचमढी, भीम भेटका सांची स्तूप, वनविहार, बडा तालाब, छोटा तालाब अशा जवळपासच्या ठिकाणी फिरण्यात जायचा. प्रा. राजेश खंबायत जळगावचे असल्यामुळे आपण घरीच आहोत असे वाटायचे. तेही दिवस आनंदादायी होते.
त्यानंतर बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांत भोपाळ येथे आलो. २००८ मधे मी नॅशनल फेडरेशन ऑफ पॉलीटेक्निक टीचर्स असोसिएशनचा अध्यक्ष असतांना येथे दोन दिवसांची नॅशनल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली होती. अध्यक्षस्थानी राजीव गांधी टेक्नॉलॉजी यूनिवर्सिटीचे कुलगुरू डॉ. पी. व्ही. शर्मा, सचिव श्री आशिष डोंगरे उपस्थित होते.
असा माझा NITTR शी ऋणानुबंध आहे.
*प्रा. डॉ. महेंद्र इंगळे*
