मी जळगांवला शिवराम नगर येथे राहतो. शिव...आणि...राम! माझ्या घरापासून शिवमंदिर ... ओंकारेश्वर मंदिर २०० मीटर वर आणि राम मंदिर २००० मीटर अंतरावर आहे. १९७६ मध्ये मी शासकीय तंत्रनिकेतन जळगांव येथे विद्यार्थी होतो तेव्हापासून नियमितपणे ओंकारेश्वर मंदिरात जातो.
*ओंकारेश्वर मंदिर* हे माझे श्रद्धास्थान तर मा. भंवरलालजी जैन यांच्या स्मृती प्रित्यर्थ, जळगाव महानगरपालिका व जैन उद्योग समूहाच्या सौजन्याने निर्माण केलेले *'भाऊंचे उद्यान'* हे माझे आवडते ठिकाण. सकाळी ओंकारेश्वर मंदिर व त्यानंतर भाऊच्या उद्यानात फिरायला जाणे असा माझा दैनंदिन कार्यक्रम असतो.
मा.ओंकारदासजी बळीरामजी जोशी यांच्या सुपुत्रांनी ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टला दान केलेल्या २८,४५० स्क्वेअर फुट भूमीवर ओंकारेश्वर मंदिराची निर्मिती करून ८फेब्रुवारी १९७१ रोजी ते योगेश्वर भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी अर्पण करण्यात आले.
अतिशय सुंदर असे हे मंदिर असून येथे कमालीची स्वच्छता असते. मंदिरास तीन प्रवेशद्वारे आहेत. आवारामध्ये वटवृक्ष आणि पिंपळ वृक्ष असून त्यांच्या भोवती ओटा बांधलेला आहे. विशेषतः वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाचे पूजन करण्याकरिता महिला मोठ्या संख्येने येथे येतात. वड आणि पिंपळा व्यतिरिक्त आंबा, निंब, नारळ, निलगिरी, बेल ही झाडे आहेत. मंदिरामध्ये श्री शिवशंकराची पांढऱ्याशुभ्र संगमरवराची, अर्धोन्मिलित नेत्रांनी पद्मासन घालून ध्यानावस्थेत बसलेली लोभस मूर्ती आहे. थोडा वेळ आधिक थांबलो तर ही मूर्ती आपल्याशी बोलू लागेल असे वाटते. बाहुंवर व गळ्यात खरे वाटावेत असे सर्पराज आहेत. कानांत लखलखणाऱ्या हिऱ्यांची कर्णभूषणे आहेत. जटांमधे सुवर्णाचे बेलपत्र आहे. मूर्तीवर पाच फणा असलेला, सुवर्णाने मढविलेला व हिऱ्याचा मणी धारण केलेल्या सर्पराजाचे छत्र आहे. गळ्यामध्ये मोत्याच्या व फुलांच्या माळा, अंगावर भरजरी रेशमी वस्त्र आहे. मूर्तीच्या मागे भिंतीवर, विविध देखाव्यांचे, दर आठवड्याला बदलणारे सुंदर पडदे असतात. समोर शंकराची पिंड आहे. श्री शिवशंकराचे साकार आणि निराकार रूप येथे बघायला मिळते.
२५ फेब्रुवारी २०२४ रोजी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून पूर्व दिशेला सिंहद्वाराची निर्मिती करण्यात आली. सिंहद्वार म्हणजे मोक्षद्वार. जगात सद्गुणांची वृद्धी व्हावी याकरिता सिंह हा परमेश्वराचा विशिष्ट अवतार कार्यरत असतो. सिंहद्वाराच्या निर्मितीमुळे मंदिराचे धार्मिक महत्त्व वाढले आहे.
पुरी येथील जगन्नाथ मंदिरास चार प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेला सिंहद्वार म्हणजे मोक्षद्वार. पश्चिमेला इच्छेचे प्रतीक व्याघ्रद्वार. संत आणि विशिष्ट भक्त या दारातून प्रवेश करतात. उत्तरेला ऐश्वर्याचे प्रतीक गजद्वार. ऋषी आणि विशिष्ट भक्त या द्वारातून प्रवेश करतात. दक्षिणेला वीरतेचे प्रतीक अश्वद्वार. युद्धात विजय मिळावा याकरिता आशीर्वाद प्राप्त व्हावेत म्हणून योद्धे व वीर पुरुष या द्वारातून प्रवेश करतात.
मंदिरामध्ये आरती, पूजा पाठ, जप, अभिषेक हे दैनंदिन कार्यक्रम सुरू असतात. गुरुपौर्णिमा, दिवाळीत पाडवा पहाट, महाशिवरात्री, मंदिराचा वर्धापन दिन या दिवशी मंदिरावर नेत्र दीपक रोषणाई असते व दिवसभर कार्यक्रम कार्यक्रम सुरू असतात. उत्तर भारतीय व मराठी श्रावण महिन्यात दररोज अभिषेकाचे कार्यक्रम सुरू असतात.
या परिसरात कॉलेजचे विद्यार्थी राहत असल्याने संध्याकाळच्या वेळेस अनेक विद्यार्थी मंदिरात येत असतात. परिसरातील भाविक स्वेच्छेने मंदिरात आपली सेवा देत असतात.
आता मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्याकरिता राजस्थानातील मकराना येथून कारागीर आलेले आहेत. मंदिरामध्ये शुभ्र संगमरवरी टाइल्स बसविण्यात आल्या आहेत. गुलाबी छटा असलेल्या दगडांनी (मकराना मार्बल) मंदिराच्या तिन्ही दरवाज्यां समोरील दर्शनी भाग, पायऱ्या व खांब सजविण्यात आले आहेत. मंदिराच्या आवारात रंगीत टाईल्स व ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत. मंदिराच्या आवारात विविध कार्यक्रमांच्या आयोजना करिता भव्य सभामंडप निर्माण करण्यात आला आहे. मंदिराच्या आवारात स्थानिक व बाहेरून आलेल्या पुजाऱ्यांना, तसेच पाहुण्यांना राहण्याकरिता सर्व सुविधांनी युक्त अशा दोन मजली इमारतीचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. मंदिराच्या आवारातील सँडस्टोनच्या कमानींवर ब्रिटिश कालीन दिवे बसविण्यात आले आहेत. मंदिराच्या दर्शनी भागात एका बाजूला कारंज्याची निर्मिती करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस कारंज्यावर रंगीत प्रकाश सोडला जातो तेव्हा नयनरम्य दृश्य दिसते. मंदिराच्या आवारात व कारंज्या समोर बसण्याकरिता सॅण्ड स्टोनची बाके आहेत. थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मंदिराच्या तीनही बाजूला काँक्रीट रस्ते झालेले असून मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही अतिशय स्वच्छ आहे.
मा. जुगल किशोर जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आलेले मंदिर सुशोभीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
*प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, जळगांव*
