फक्त आमचे नसलेले बाबा-२
१९७२ च्या महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चांगदेव- एदलाबाद गटात झालेली जिल्हा परिषदेची पोट निवडणूक लोकांच्या उत्स्फूर्त समर्थनाने आणि सहभागाने लक्षणीय ठरली. विपन्न अवस्थेत, जगण्याच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून संघर्ष करणारे, जाती धर्माचे लोक एखाद्या व्यक्तीवर एवढे निरपेक्ष प्रेम करू शकतात हे या निवडणुकीत दिसून आले. त्याचे रोमांचक वर्णन मी मागील भागात केलेले आहे. त्यावर अनेक हितचिंतकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यामुळे मी भारावून गेलो. माझे मित्र लेखक दिलीप जोशी यांनी फेसबुक वर लिहिलेल्या पोस्ट बद्दल त्यांना धन्यवाद देऊन, प्रातिनिधिक स्वरूपात तिचे पुनर्प्रकाशन करतो.
'५० ते ७० च्या दशकात एक अत्यंत प्रगल्भ, वैचारिक, जनसेवेचा वसा घेऊन त्याची योग्य आखणी/मांडणी करणारे वडील लाभावेत या परते भाग्य ते काय असू शकते?
महाराष्ट्रातील उत्तुंग संत परंपरा आणि देशातील महान स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा यांचा सार्थ संयोग गावोगावी, खेडोपाडी बघायला मिळायचा!
त्या परंपरांचा पाईक वा एक अंश होण्याचं भाग्य तुला मिळालं, ही पूर्वपुण्याई!
शुद्ध भावावीण
जो जो केला
तो तो शीण
शुद्ध भावनेनं केलेला हा शीण त्या चैतन्याच्या झाडाच्या फळ भारातून उतराई होण्याचा, ऋण व्यक्त करण्याचा तुझा नम्र प्रयत्न खरोखरच अभिनंदनीय आहे!'
जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर, बाबा पूर्णवेळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात झपाटल्यासारखे काम करू लागले. आमच्या आजींनी शेती व लहानशा किरणा दुकानाच्या माध्यमातून कुटुंबाचा चिरतार्थ चालवण्याची जबाबदारी स्वीकारली. चांगदेव ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही त्या कार्यरत होत्या.
सकाळी उठल्यापासून ओट्यावर लोकांची गर्दी असायची. परिसरातील ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा व हायस्कूल या संस्थांचे प्रश्न, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य अशा सार्वजनिक हिताच्या प्रश्नांबरोबरच नोकरी, विवाह, घटस्फोट, वाटे हिस्से, आपसातील भांडण तंटे, पोलीस स्टेशनमधील तक्रारी अशा वैयक्तिक समस्या घेऊन लोक बाबांकडे यायचे.
चांगदेव येथे आमच्या गावी, महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. त्यानिमित्त जळगाव जिल्ह्यातून व विदर्भातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शना करता येतात. येणाऱ्या भाविकांकरिता तसेच विक्रेत्यांकरिता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोयी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम ते करायचे. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर आमच्याकडे लोकांचा राबता असे.
क्षय व कुष्ठरोग नियंत्रणा करिता शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विशेष योजनांमध्ये लोकांचा सहभाग वाढवून प्रशासनाला सहाय्य करणे, कुटुंब नियोजना करिता लोकांना प्रोत्साहित करणे ही कामे ते हिरीरीने करित. शासकीय अधिकाऱ्यांशी त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण होते. पत्रकारांचेही त्यांना मोलाचे सहकार्य लाभत असे.
एक-दोन दिवसाआड कामानिमित्ताने सकाळी सहाच्या एसटीने जळगांवला जाणे, तेथे भाड्याने सायकल घेऊन वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये जाणे, वृत्तपत्रांच्या कार्यालयास भेट देणे, प्रिंटिंग प्रेस मधून पोस्टर्स, हॅंड बिले घेणे व संध्याकाळी उशिराच्या एसटी बसने घरी परत येणे असे त्यांचे काम सुरू होते. कामाच्या व्यापात अनेकदा त्यांना जेवायला फुरसत मिळायची नाही तेव्हा, नेहरू शर्टाच्या खिशांत असलेल्या थाबड्या, बिबड्या आणि शेंगदाणे यावरच त्यांचे काम भागायचे.
भारतीय राज्यघटना, जमीन महसुला संबंधीचे पुस्तके, ग्रामपंचायत ऍक्ट, धरणग्रस्तांच्या समस्या व पुनर्वसन यासंबंधीची पुस्तके विकत घेऊन त्यांचा ते सातत्याने अभ्यास करायचे. रात्रीच्या वेळेस शतपावली करताना त्यांना अनेक कल्पना सुचवयच्या यमक साधून ते म्हणी, वाक्प्रचार व बोधवाक्य तयार करायचे. खुबीने भाषणात ते त्यांचा उपयोग करायचे. मोर्चां मधील त्यांच्या घोषणा नाविन्यपूर्ण, आकर्षक व दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या असत. पुस्तके वाचतांना टिपण काढणे, दुसऱ्या दिवशीच्या कार्याचे नियोजन करणे हे त्यांचे काम रात्री उशिरापर्यंत चालायचे. सकाळ होताच पुन्हा कामाचा धबाडका सुरू व्हायचा. प्रवासाची पुरेशी साधने उपलब्ध नसतानांही, मिळेल त्या वाहनाचा उपयोग करून, कामानिमित्त ते सतत फिरत असायचे. त्यांनी एदलाबाद तालुक्यातील डोलारखेडा, लाल गोटा, या दूर्गम परिसरात जाऊन, तेथील फासेपारधी लोकांसोबत राहून, स्थानिक शिक्षकांच्या मदतीने त्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण केली, आग्रहपूर्वक मुलांना शाळेत दाखल केले. याकरिता त्यांची फारशी फासेपारधी भाषा शिकली. त्यांच्या करिता आश्रम शाळा काढायला मदत केली. या कामी त्यांना वाघाशी यशस्वी झुंज घेतलेले रामजी चव्हाण व त्यांच्या सोबतत्यांचे सहकार्य लाभले.
पुढे आचार्य गजाननराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली बाबांनी प्रजा समाजवादी पक्षाचे काम करायला सुरुवात केली. गावातील व परिसरातील तरुणांना घेऊन ते राष्ट्रसेवा दलाचे विविध कार्यक्रम राबवायचे.
या काळात त्यांचे अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी संबंध आले. जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव पाटील, ओंकार आप्पा वाघ, जमनादास काबरा, ब्रिजलाल भाऊ पाटील, निवृत्ती पाटील, पार्थ चौधरी हे पक्षाच्या प्रचार प्रसारा करिता एदलाबाद तालुक्यात सभा घ्यायला यायचे तेव्हा आमच्याकडे मुक्कामाला असायचे.
जळगाव जिल्ह्यातील समाजवादी पक्षाचे नेते, पाडळसे येथील बापूसाहेब के. एम. पाटील उच्च शिक्षणासाठी जर्मनीत शिकायला गेले होते; तेथून ते वडिलांना नियमित पत्रे पाठवीत असत. जर्मनीहून आलेली त्यांची पत्रे बघून आम्हाला आश्चर्य वाटत असे व आनंद होत असे.
उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या, इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या, राजापूर मतदार संघाचे संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या बॅरिस्टर नाथ पै यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बाबांवर विशेष प्रभाव होता. त्यांचे भाषण ऐकण्याकरिता पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू संसदेत आवर्जून उपस्थित असतात असा उल्लेख बाबा त्यांच्या सभेतील भाषणातून करायचे.
प्रजा समाजवादी पक्षाच्या सातपाटी येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनासंबंधी जळगाव जिल्ह्यात प्रचार व प्रसार करण्याची महत्त्वाची जबाबदारी बाबांवर सोपविण्यात आलेली होती. त्याकरिता गावोगावी सभा घेणे, 'चलो सातपाटी' म्हणून भिंती रंगवणे, हॅन्ड बिल वाटणे सुरू होते. आम्ही लहान मुलेही त्यात भाग घेत असू.
आमच्याकडे 'साधना साप्ताहिक' नियमित येत असे. त्यातील राजा मंगळवेढेकरांचे लहान मुलांकरता असलेले सदर मी आवडीने वाचत असे. जुने अंक काढून पुन्हा पुन्हा वाचत असे.
समाजवादी पक्षाचे लोक एकमेकांना 'साथी' नावाने संबोधित असत. उदाहरणार्थ साथी गुलाबराव... राजकीय व सामाजिक विषयांवर प्रदीर्घ चर्चा, अफाट वाचन, सभांमधून प्रभावशाली भाषणांद्वारे सत्ताधाऱ्यांवर मर्मभेदी टीका करणे ही समाजवादी नेत्यांची वैशिष्ट्ये होती. कार्यकर्त्यांना ते वैचारिक विषयांवरील पुस्तके भेट देत असत. बाबा आढाव, बाबा आमटे, मधु लिमये, ग.प्र.प्रधान, मधु दंडवते यांनी बाबांना अनेक पुस्तके भेट दिली. त्यावर 'साथी विश्वनाथ यांस, सप्रेम भेट'असे लिहून खाली सही केलेली असायची. रशियन राज्यक्रांती संबंधी वि.स. वाळींबेंचे 'व्होल्गा जेव्हा लाल होते' व मॅक्झिम गॉर्कीचे 'आई' ही पुस्तके त्यामुळे मला वाचता आली. थॉमस मन्रो , बेंजामिन फ्रँकलिन, थोरो, वुड्रोविल्सन, रूझवेल्ट, अब्राहम लिंकन यांची चरित्रे, मधु लिमये यांचे समाजवादा विषयी विचार, ना. ग. गोरे यांचा एस. एम. जोशी यांच्याशी पत्रव्यवहार, त्यांनी आपल्या मुलीस लिहिलेली पत्रे, बाबा आमटे यांची ज्वाला आणि फुले, माती जागविल त्याला मत अशी काही पुस्तके माझ्या स्मरणात आहेत. अब्राहम लिंकन यांच्या चरित्रातील, लाकडे पेटवून चुलीवर स्वयंपाक करतांना पडलेल्या प्रकाशात ते आई शेजारी बसून अभ्यास करायचे हे चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर येते. पुढील आयुष्यात, निसर्गवादी व तत्वज्ञ, Thoreau यांचा 'If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer.' हा विचार माझ्या आवडीचा झाला.
(क्रमशः)
प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, जळगांव
(पुढील भागांत हातनूर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता काढलेले मोर्चे, केलेली आंदोलने, जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून पार पाडलेली जबाबदारी, १९७९ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील उमेदवारांकरिता, एका नामांकित कंपनीच्या सहकार्याने प्रचाराकरिता मोटार गाड्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी याविषयी लिहिणार आहे.)

