Showing posts with label ज्योतिर्लिंगाच्या कुशीतील जिंतूर. Show all posts
Showing posts with label ज्योतिर्लिंगाच्या कुशीतील जिंतूर. Show all posts

Wednesday, April 9, 2025

ज्योतिर्लिंगांच्या कुशीतील जिंतूर!


ज्योतिर्लिंगांच्या कुशीतील जिंतूर!

माझी विभाग प्रमुख उपयोजित यंत्रशास्त्र या पदावर शासकिय तंत्रनिकेतन, जिंतूर येथे पदोन्नतीने बदली झाली होती. त्याआधी पत्नीची छत्रपती संभाजी नगर येथे बदली झालेली होती. मुले जळगावला शिकायला राहणार होतीं. त्यामुळे जिंतूरला जातांना मनात एक हुर हूर होती.

माझ्या बदलीचे आदेश निघाले आहेत हे समजल्यावर, मुळचे जळगांवचे पण प्राध्यापक म्हणून जिंतूर येथे कार्यरत असलेले माझे विद्यार्थी श्री के एम ठाकूर यांना आनंद झाला व ते मला भेटायला आले. जळगांवला, एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात व नंतर शासकीय तंत्रनिकेतनात माझ्या सोबत असलेले, धार्मिक वृत्तीचे, श्री एस बी महाजन यांनी, माझी राहण्याची व्यवस्था त्यांच्या सोबत करुन ठेवली होती. नंतर गव्हर्मेंट आय टी आय चे प्राचार्य श्री पी के चौधरीही जिंतूरला असल्याचे समजलें.

६ डिसेंबर २००१ रोजी मी  या पदावर रुजू झालो. जळगांव वरून मी महालक्ष्मीचे दोन किलो पेढे नेले होते. लहान तंत्रनिकेतन असल्याने, फक्त ६५ लोक कार्यरत होते. शिल्लक राहिलेले पेढे मी कॉलनीतील मुलांना वाटले.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर हे तालुक्याचे ठिकाण. प्रत्येक जिल्ह्यात एक तंत्रनिकेतन या शासनाच्या धोरणानुसार, परभणी जिल्ह्यासाठी, १९८३ मधे, जिंतूर पासून ४ किलोमीटर अंतरावर, येलदरी रोडवर, तंत्रशिक्षण राज्यमंत्री श्री. गणेश दुधगांवकर यांच्या प्रयत्नाने शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यात आले.

हाताचा तळवा पसरून त्याकडे बघितले असता, तीन बाजूंना तीन ज्योतिर्लिंग; एका बाजूला वेरुळचे घृष्णेश्वर, दुसऱ्या बाजूला परळीचे वैजनाथ, तिसऱ्या बाजूला औंढा येथील नागनाथ व माधोमध जिंतूर वसलेले मला दिसले .

हुतात्मा स्मारकाजवळ हायस्कूल मधे शिक्षक असलेले श्री भंडारे सर यांचेकडे आम्ही राहत असू. सालस व्यक्तिमत्वाचे श्री भांडारे सर अपुलकीने आम्हाला चहा व गप्पा गोष्टींकरिता बोलवायचे.

जळगाव-जिंतूर २४० कि मी अंतर. जळगांव वरून, माझ्या उनो कारने, मी, श्री चौधरी सर व श्री किशोर ठाकूर, सकाळी लवकर निघुन सिल्लोड, भोकरदन मार्गे राजूरला येवून थांबायचो व गणपतीचे दर्शन घेऊन जिंतूरला पोहचायचो. विक एंडला जळगांवला परत येत असू. तो प्रवास अतिशय आनंदी असायचा. विषय येव्हडे असायचे की वेळ कमी पडायचा.

जिंतूरला आम्ही सर्व जण श्री पेशकार यांच्या घरगुती मेस मधे जेवायला जायचो. मराठवाडा मुक्ती संग्राम सुरू असतांना, त्यांच्या घरासमोरील दगडी चौकात, रझाकारांनी केलेल्या अनेक अत्याचाराच्या घटनां बद्दल त्यांनी सांगितले.

आमच्या विभागातील प्रयोग शाळा सहाय्यक श्री भोजने हे जिंतूर तालुका कर्मचारी संघटनेचेही अध्यक्ष होते. त्यामुळे त्यामुळे प्रशासकीय व वैक्तिक स्वरुपाची कामे सहजरित्या पार पडत. श्री सरकटे यांच्या मदतीने कम्युनिटी पॉलिटेक्निकची कमांडर जीप अतिशय कमी खर्चात दुरुस्त करून घेतली. तिचा विविध प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाभर जाण्याकरिता उपयोग व्हायचा. 

प्राचार्य आर डी विर्धे यांच्या कन्या राजश्री संस्थेत मेकॅनिकल ब्रँच मधे शिकत असल्याने, परीक्षेच्या काळात ते रजेवर होते तेंव्हा प्राचार्य व चीफ कंट्रोलर म्हणून काम करतांना सर्वांनी सहकार्य केल्यामुळे परीक्षा सुरळीतपणे पार पडली. उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गुणगौरव करून मी त्यांना प्रशस्तीपत्रके दिली.

स्थापत्य विभाग प्रमुख, श्री. प्रशांत पट्टलवार यांनी, Amway Training Prrogram मधे भेट दिले जाणारे, Tough Times Never Last, But Tough People Do ! हे बेस्ट सेलर असलेले पुस्तक मला भेट दिले. श्रद्धा, संघर्ष व प्रार्थना यांच्या बळावर  किती आश्चर्यकारक गोष्टी घडू शकतात हे धर्मगुरू Robert Shuller यांनी या पुस्तकात सांगितले आहे. या पुस्तकाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. यातील अनेक विचार व त्यावर आधारित, तयार केलेल्या अनेक प्रोत्साहनपर गोष्टी मी प्रशिक्षण कार्यक्रमात सांगत असे.

If God Is With Me, Who Is Against?

With faith, say, ‘Move!’, and the Mountain will move! 

हे त्यातील माझे आवडते विचार!

माझे एक सहकारी प्रशासकीय बाबींशी निगडित गंभीर प्रकरणाला सामोरे जात होते, त्यामुळे त्यांची येथे बदली झाली होती व चौकाशी सुरू होती. मला भेटुन त्यांनी प्रकरणाची माहिती दिली. मी संघटनेचा पदाधिकारी असल्याने, नागरी सेवा अधिनियमाचा माझा अभ्यास असल्याने तसेच प्रशाकीय अनुभव असल्याने या प्रकरणात मी त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  तसेच दर शनिवारी खुलदाबाद येथे भद्रा मारोतीच्या दर्शनाला जातो तेंव्हा माझी शनिवारची रजा मंजूर करावी अशी विनंती त्यांनी केली. उर्वरीत दिवसात कोणत्याही वेळेस, काहीही काम सांगितल्यास त्यास मी नाही म्हणार नाही हे त्यांनी सांगितले. गोपनीय अहवाल लिहायच्या वेळेस, केलेल्या ९२ कामांची यादी, त्यांनी कागद पत्रांसह माझ्याकडे दिली. कागद पत्रांची शहानिशा करून, आवश्यक ती टिपणे लिहून व वस्तुनिष्ठपणे मुल्यांकन करून मी त्यांचा गोपनिय अहवाल लिहला. त्याचा त्यांना फायदा झाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड होउन ते अधिक चांगल्या जागी रुजू झाले.

१७ जुलै २०२२ रोजी मी परत जळगांव कडे निघालो. आठ महिन्याच्या या कालावधीत, प्रा. सोनोपंत दांडेकर लिखित ज्ञानेश्वरी व तुकारामची गाथा हे ग्रंथ माझ्यासोबत होते. प्रार्थना करण्याचे तंत्र मला अवगत झाले होते.

या काळात संस्थेतील विद्यार्थ्यांनी, कर्मचारी व सहकाऱ्यांनी मला खुप प्रेम दिले. निरोपाच्या दिवशी, समारंभ सुरू असतांना, वसतिगृह व बगीच्याची देखभाल करणारे शिपाई श्री रामा भराडी आत आले. संस्थेच्या आवारातील फुलांचा लहानसा गुच्छ त्यांच्या हातात होता.पाणवलेल्या डोळ्यांनी त्यांनी तो माझ्या हातात दिला व निघून गेले. मी हात जोडून सर्वांचे आभार मानले. फुलांचा तो लहानसा गुच्छ आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे!

प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, पुणे @ एप्रिल ९, २०२५

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...