Showing posts with label एस पी सी ई ची स्पंदने: भाग २. Show all posts
Showing posts with label एस पी सी ई ची स्पंदने: भाग २. Show all posts

Wednesday, March 19, 2025

रूम नं ५७ !

 

एस पी सी ई ची स्पंदने: भाग २

रूम नं. ५७ !

VJTI चा प्रवेश रद्द करून मी अंधेरी येथील SPCE मधे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतला. ३ ऑक्टोबर, १९७९ चा तो दिवस!

कॉलेज मधे फी भरून, ओरिजिनल सर्टिफिकेटस वगैरे जमा करून, प्रवेशाची सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर मी हॉस्टेल कडे निघालो. मला रूम नंबर ५७ देण्यात आली होती!

माझ्या समोरच्या रूम मधे राहत असणारे सिनियर सबनीस, हसबनीस, वाजपेयी, वायकोस या सर्वांनी माझी विचारपूस करून सहकार्याचे आश्वासन दिले. ‘डिसेंबर मधे परिक्षा आहे, वेळ फार कमी असल्याने ताबडतोब सबमिशन पूर्ण करण्याच्या तयारीला लाग, Math III चा चांगला अभ्यास कर, बाकी विषयांची काळजी करण्याचे कारण नाही’, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. रात्री त्यांचे सोबत बच्चू भाईंच्या मेस मधे जेवायला गेलो. जेवणानंतर, हॉस्टेलमधेच वरच्या विंग मधे राहत असलेल्या, रेक्टर प्रा. भवानी प्रसाद यांच्याकडे छायागीत कार्यक्रम बघितला.

दुसऱ्या दिवशी सकाळी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधे शिकत आसलेले, पण SPCE हॉस्टेल मधे राहत असलेले, जळगांवचे चंद्रकांत नेहते, अशोक दहाड यांनी आस्थाने विचारपूस केली. जवळच असलेल्या स्वदेश या उडीपी हॉटेल मधे आम्ही चहा नाश्ता घेतला.

त्यानंतर मी कॉलेज कडे निघालो. दोन महिन्या पूर्वीच नियमित वर्ग सुरू झाले होते. अभ्यासक्रम बराच पुढे गेला होता. डिप्लोमा नंतर Direct Second Year मधील प्रवेशास बराच उशीर झाला होता. सकाळी ९.३० वाजता वर्गात पोहचलो. Math III चा वर्ग होता. Math I and II चा अभ्यास नसतांना Math III समजून घेणे फार अवघड होते.  प्रा. सौ. कणेकर मॅडम वर्गात आल्या, त्यांनी Fourier Series चे ४/५ प्रॉब्लेम भराभर सोडवून दाखविले. त्यांचा शब्द नि शब्द मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यानंतरच्या व्याख्यानांमधून त्यांनी Jacobi Series हा एक महत्त्वाचा भाग शिकविला. शांत व सौम्य स्वभावाच्या, सोज्वळ वृत्तीच्या मॅडम खूप कमी बोलायच्या, व्याख्यान संपताच त्या स्टाफ रूम कडे निघायच्या.

त्यांनतर प्रा. परेरांनी, Math मधील Statistics आणि Matrices तर प्रा. रेड्डींनी Heat and String Equations हे टॉपिक शिकविले. प्रा. परेरा अत्यंत शांतपणे शिकवायचे. ते इंग्रजी ऊत्तम बोलयाचे. मधे थांबून, बोर्ड वर सोडवलेले प्रॉब्लम उतरवुन घ्यायला वेळ द्यायाचे. प्रा. रेड्डी लहान अक्षरात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पूर्ण बोर्ड वर लिहायायचे. त्यांना क्वचितच बोर्ड साफ करावा लागायचा. दोघांचाही अध्यापनाचा सखोल अनुभव होता. अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने त्यांनी आम्हांस हा विषय शिकविला.

Math चे वर्ग सुरू असतांना मी विषय समजून घ्यायचा प्रयत्न करायचो, त्याच बरोबर उदाहरणे सोडविण्या करिता टेक्नीक कसे वापरता येईल याचा विचार करायचो. तसेच सर्व शिक्षक कशा पद्धतीने शिकवितात याचे लक्षपूर्वक निरीक्षण करायचो. रात्री हॉस्टेलवर याची चर्चा व्ह्यायची.

नोव्हेंबर अखेरीस पहिले सेमेस्टर संपले. डिसेंबर मधे परिक्षा संपल्या. ८/१० दिवसांच्या सुट्यांनंतर दुसरे सेमेस्टर सुरू झाले. यथावकाश रिझल्ट लागला. चांगले मार्क मिळाले होते. त्यामूळे आता एकदम रिलॅक्स्ड वाटत होते. सुट्यांच्या दिवशी जवळपासच्या ठिकाणी सहलीला जाणे, ट्रैकिंगला जाणे, नाटक-सिनेमा बघणे, गोरेगांव फिल्म सिटी मधे शूटिंग बघायला जाणे, संध्याकाळी जुहू बीच वर फिरायला जाणे आणि रात्री उशिरापर्यंत हॉटेल नीलकमल, मेस किंवा हॉस्टेल रूमवर गप्पांचा अड्डा जमविणे असे कार्यक्रम जोरात सुरू झाले!

हॉस्टेल मधे, सुरेश महाजन, राजन बुनगे व मी रूम पार्टनर होतो. सुरेश आणि मी एकाच गावचे, चांगदेवचे राहणार, व मित्र होतो. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सुरेशने, एक वर्ष मुंबईत नोकरी केली असल्याने, त्याला मुंबईची बरीच माहिती होती. त्याचा आम्हांस वेळोवेळी फायदा व्हायचा.

राजन सोलापूर जिल्ह्यातील माळीनगरचा. राजन, धारदार नाक, काळेभोर दाट केस,  गोरापान, पिळदार शरीरयष्टीचा, रांगड्या व्यक्तिमत्वाचा गडी होता! दररोज सकाळी रूम मधे, शंभर दीडशे सूर्य नमस्कार व तेव्हड्याच बैठका रोज काढायचा. त्यानंतर पूजाअर्चा, स्तोत्र पठण असा अर्ध्या  तासाचा कार्यक्रम असायचा. त्याच्याकडे, सुटकेस मधे, बटणाने उघडणारा, एक मोठा रामपुरी चाकु होता. चाकू कसा चालवायचा याचे प्रात्यक्षिक तो करून दाखवायचा. अनेक गुढ गोष्टी तो रंजकतेने सांगायचा. बऱ्याचदा रात्री तो प्लँचेटवर प्रयोग करायचा; थोर व्यक्तींच्या आत्म्यांना आमंत्रित करुन त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे मिळवायची कला त्याला अवगत होती!

आमच्या रुमच्या दरवाज्यावर आमची नावे लिहण्या ऐवजी ‘The Men With Guts Live Here!’ असे लिहले होते. एक दिवस किंग फिशर एयर लायन्सने प्रसिद्ध केलेल्या कॅलेंडर मधील मॉडेल्सचे फोटो वेगळे करून ते रूम मधिल भिंतींवर चिकटवले. त्या खली समर्पक अशा हिंदी सिनेमातील आणि माझ्या कवितांच्या ओळी लिहल्या. उदाहरणार्थ…तुम से अच्छा कौन है?, तुमसा नही देखा, मला बघून गाली का वृथाच तू हसते?…भिंतीवर, छताजवळ आगंतुकांकरिता वेग वेगळ्या प्रकारच्या सूचना लिहल्या. उदाहरणार्थ… यांहा भरी बंदुक लेकर बैठना मना है। येणारे मित्र, त्यांच्या आकलानुसार त्यांचे अर्थ काढायचे!

पुढील काळात, जेथे सतत काही ना काही घडामोडी घडत असतात, ती रूम नंबर ५७, हॉस्टेल व कॉलेज मधे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे केंद्र बनले!

प्रा. डॉ. महेंद्र इंगळे @ पुणे, मार्च १९, २०२५

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...