*भरतदादा अमळकर यांना डि. लीट. पदवीने सन्मानित करण्यात येत आहे त्या निमित्ताने....*
आमचे मित्र भरतदादा अमळकर यांना दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजी महामहिम राज्यपाल श्री. रमेश बैस साहेब यांच्या हस्ते डी. वाय.पाटील अजिंक्य विद्यापीठ, पुणे यांच्याकडून डि. लीट.पदवी प्रदान करण्यात येत आहे त्यानिमित्ताने मी त्यांच्या विषयी माझ्या भावना व्यक्त करीत आहे.
दादांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील रावेर या गावी झाला. आईंना वाचनाची आवड असल्यामुळे त्या लहानपणापासूनच दादांकडून विविध विषयांवरील पुस्तके वाचून घेत असत. लहानपणापासूनच त्यांना वाचनाचा छंद आहे व वक्तृत्वाची कला अवगत आहे. दादांनी आजपर्यंत विविध विषयांवर अभ्यासपूर्ण भाषणे दिलीत परंतु कुठेही पुनरावृत्ती झालेली नाही. बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत. मनात राष्ट्रप्रेम आणि समाजाविषयीची अपार सहानुभूती या दोन गोष्टींचे मूळ पहिल्यापासूनच रुजलेले होतं.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी उच्च यश संपादन करून पुढे आयआयटी किंवा तत्सम मोठ्या चांगल्या पदवीच्या आणि उच्चतंत्र शिक्षणामध्ये जावं यासाठी अंमळनेर येथील प्रताप कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या काळातच त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे बाळकडू मिळाले. विद्यार्थी संघटना, विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालक यांच्या कमासाठी झोकून दिलं. पुढे १९८० मधे शासकीय तंत्रनिकेतन जळगाव येथून स्थापत्त्य अभियांत्रिकी शाखेत पदविका प्राप्त केली. त्या नंतर त्यांनी वर्ग मित्र श्री. संजय बिर्ला यांच्यासोबत बीटा कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पुढे ते एल्. एल. बी. झाले. विद्यार्थी दशेपासूनच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम करित होते. तंत्रनिकेतनांच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मंजूर व्हाव्यात याकरिता त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी ४२ दिवसांचा संप केला. तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी मिळावी ही त्यापैकी एक मागणी होती. भरत दादांच्या मार्गदर्शना खाली जळगाव येथे १९८५ मधे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले होते.
बांधकाम व्यवसाय सुरू केल्यानंतर थोड्याच कालावधीत ते धडाडीचे व यशस्वी उद्योजक म्हणून सर्वांना परिचित झाले. सचोटीचा पारदर्शक व्यवहार, शब्दाला पक्के, गुणवत्तेत तडजोड न करता वेळेत प्रकल्प पूर्ण करणे ही त्यांच्या व्यवसायाची वैशिष्ट्ये.
जळगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (I M R) या संस्थेची इमारत त्यांनी फक्त शंभर दिवसात बांधून पूर्ण केली. सतत नाविन्यपूर्ण काम करण्याच्या आपल्या पध्दतीने व त्याद्वारे मिळालेल्या अनुभवाच्या आधारे कन्स्ट्रक्शन व्यवसायात चांगल्या प्रॅक्टिसेस कशा अवलंबता येतील या करिता गवंड्यां पासून ते डिझाईनर पर्यंत सगळ्यांना ते अमूल्य सुचना देत असतात. मोकळा वेळ असेल तेव्हा मित्रांच्या मैफिलीत अनुभव कथन करून व विनोदी किस्से सांगून खेळीमेळीचे वातावरण ठेवतात. त्यामुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटतात.
व्यवसायात प्रगती होत होती त्याच बरोबर दादांचे समाज कार्य ही सुरू होते. दादांचे धडाडीचे कार्य बघून केशव स्मृती प्रतिष्ठानचे तेव्हाचे अध्यक्ष डॉ. अविनाश आचार्य यांनी त्यांच्याकडे केशव स्मृती प्रतिष्ठानचे सचिव म्हणून जबाबदारी सोपवली. आता भरत दादा केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या समूहांतर्गत जळगाव जनता सहकारी बँक, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शाळा व हायस्कूल, वृद्धाश्रम,अनाथाश्रम, वनवासी कल्याण आश्रम यासारखे अनेक प्रकल्प राबविले जात आहेत.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळावर गव्हर्निंग कौन्सिल मेंबर म्हणून दादा कार्यरत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (N E P)च्या अंमलबजावणी करिता महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या समितीचे सदस्य म्हणून दादांचे महत्त्वाचे योगदान आहे. राष्ट्रीय शैक्षण धोरणानुसार महाराष्ट्र राज्यातील पदविका अभ्यासक्रमात अमुलाग्र बदल करून त्याची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
राज्यातील तंत्रनिकेतनांत औद्योगिक संस्थांचा सहभाग वाढावा, तंत्रनिकेतन व उद्योगधंदे यांमध्ये सामंजस्य असावे व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण मिळावे या करिता *हब अँड स्पोक मॉडेल* चा उपयोग करून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. श्री भरत दादा जळगाव जिल्हा समितीचे अध्यक्ष आहेत.
व्यवसायात जे लोक त्यांच्याकडे काम करीत होते त्यांनाच भागीदार बनवून त्यांनी व्यवसायाची धुरा पुढील पिढीकडे सोपवलेली आहे व हळूहळू ते व्यवसायातून बाजूला होत आहेत. आपला जास्तीत जास्त वेळ ते आता शैक्षणिक व सामाजिक कार्यास देत आहेत. तल्लख बुद्धिमत्ता व नेतृत्व गुण अंगी असल्याने सभोवतालच्या वातावरणाशी समरस होऊन, आपल्या सहकाऱ्यांमधील उत्तम गुण शोधून त्यांना राष्ट्रनिर्मीतीच्या कार्यात जोडून घेण्याचे महत्त्वाचे कार्य ते करीत आहेत.
भरतदादा, मी व माझ्या पत्नी सौ.लता इंगळे, आम्ही वर्ग मित्र. नंतरही अनेक प्रकल्पांत आम्ही सोबत काम केले. सार्वजनिक जीवनात सेवाभावी वृत्तीने काम करित असतांना कुठल्याही पदाची किंवा मानसन्मानाची अपेक्षा भरतदादांनी कधीच केली नाही. प्रसिद्धी पासून लांब राहून ते आपले कार्य करीत आहेत. त्यांना डी.लिट.या प्रतिष्ठित पदवीने सन्मानित करण्यात येत आहे ही आपल्या जळगाववासियांकरिता अभिमानास्पद बाब आहे.
समाजातील चांगल्या व्यक्तीमत्वांचा शोध घेऊन त्यांचा गुणगौरव केला जात आहे, त्याबद्दल डी. वाय. पाटील अजिंक्य विद्यापीठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या, पूर्वाश्रमीच्या परिषदेच्या कार्यकर्त्या सौ. हेमाताई अमळकर या खऱ्या अर्थाने भरतदादांच्या सहचारिणी आहेत. त्यांचेही याप्रसंगी हार्दिक अभिनंदन करतो.
शासकीय तंत्रनिकेतन जळगावच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मी भरत दादा यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना सुयश चिंतितो. परमेश्वराच्या कृपेने त्यांच्याकडून अशीच जनसेवा यापुढेही घडत राहो याकरिता त्यांना शुभेच्छा!
*प्राचार्य डॉ. महेंद्र इंगळे*

 
 
 
