निःशब्द !
काल सिटी प्राइड येथे छावा चित्रपट बघितला. सध्या महाराष्ट्रात आणि देशभरात हा चित्रपट गाजत आहे. या निमित्त टीव्ही चॅनल्स व सोशल मीडियावर चर्चा आयोजित केल्या जात आहेत.
परवा, सातारा येथील अजिंक्य सैनिक स्कूलच्या विद्यार्थी राहिलेल्या, आमचे मित्र सुनील कोल्हे आणि सतिश केरकळ यांच्या बॅचने मंगला चित्रपटगृहात हा चित्रपट बघितला. विविध संस्थांकडून, महाराष्ट्रातील शाळेतील मुलांना हा चित्रपट दाखविला जात आहे.
लोकांपर्यंत पोहचण्याचे चित्रपट हे प्रभावी माध्यम!चित्रपट हिंदीत असल्याने अधिकाधिक लोकांपर्यंत छत्रपती सांभाजी महाराजांचे कार्य पोहचते आहे ही आनंदाची व समाधानाची बाब आहे.
शिवाजी सावंतांच्या ‘छावा’ कादंबरीवर आधारित श्री. लक्ष्मण उतेकरांची ही भव्य-दिव्य कलाकृती!
विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका भावोत्कृष्टरित्या साकारली आहे. रश्मिका मंधानाने येसूबाईची भूमिका समर्थपणे पेलली आहे. चित्रपट जस जसा पुढे सरकत जातो तस तसा मेकअपच्या सहाय्याने बदलत जाणारा औरंगबजेब प्रभावीपणे दाखविण्यात आलेला आहे . शांत डोक्याच्या, थंड रक्ताच्या, क्रूरकर्मा औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्नाने उत्तमरित्या साकारली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनात अनेक नाट्यमय प्रसंग घडलेत. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडत गेले. आजोबा शहाजीराजे महाराज यांचे कडून विद्वत्ता आणि वडिल छत्रपती शिवाजी महाराजांकडून शौर्याचा वारसा त्यांना मिळाला होता. छत्रपती संभाजी महाराज महापराक्रमी, कुशल राजनीतिज्ञ, मुत्सद्दी, विविध भाषा जाणणारे विद्वान, संवेदनशील मनाचे कवि आणि लेखक आसतांनाही मध्यंतरीच्या काळात त्यांचे विषयी हेतूतः गैरसमज पसरवून प्रवाद निर्माण करण्यात आले होते.
राष्ट्राचा मानबिंदू असलेल्या या पराक्रमी वीरा बद्दल लिहितांना अनेकांना भान राहिले नाही. परंतु पराक्रमी पुरुषांचा इतिहास गाडून टाकता येत नाही. तो कधी ना कधी उफाळून वर येतो आणि दैदीप्यमान होऊन आपल्या समोर प्रगटतो. उलटपक्षी विपर्यास करून लिहिलेली इतिहासाची पाने कालांतराने विदीर्ण होतात, पाला पचोळ्या सारखी उडून जातात, गळून पडतात हे आपण बघत आहोत.
वा. सी. बेंद्रे, डॉ. जयसिंगराव पवार यांच्या सारख्या थोर इतिहासकारांनी, अस्सल पुरव्यांनीशी, संभाजी महाराजांचे जीवन चरित्र रेखाटले परंतु, ते इतिहासाच्या अभ्यासकांपर्यंत सिमित राहिले.
मा. शिवाजी सावंतानी १९७९ मधे जेंव्हा ‘छावा’ कादंबरी लिहिली, यशवंतराव चव्हाणांनी तिचे पूजन करून प्रकाशन केले, आचार्य अत्र्यांनी मराठा मधे अग्रलेख लिहला, मराठा मंदिरामध्ये भव्य कार्यक्रम घडविला, साहित्य संस्कृती मंडळाने पुरस्कार देवून कादंबरीचे हिंदीत भाषांतर केले… तेंव्हा पासून खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचे खरे चरित्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचायला सुरवात झाली.
त्यानंतर सानदी अधिकारी असलेल्या मा. विश्वास पाटलांनी २००५ मधे अभ्यासपूर्णरीत्या, अस्सल पुरावे मांडून संभाजी महाराजांच्या जीवनावर ‘संभाजी’ हा चरित्रपर ग्रंथ लिहला .
मा. शिवाजी सावंत व मा. विश्वास पाटील हे दोघेही लोकप्रिय लेखक असल्याने छत्रपती संभाजी महाराज जनसामान्यांपर्यंत अधिक वेगाने पोहचण्यास मदत झाली.
दृष्ट लागावी असे राजबिंडे व्यक्तिमत्व लाभलेले, तेजस्वी, शूर वीर, छत्रपती संभाजी महाराज, वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी, स्वराज्य रक्षणासाठी, ज्या धीरोदात्तपणे, जगदंब …जगदंब…मंत्रोच्चार करीत मृत्युस सामोरे गेले तसे उदाहरण मानवजातीच्या इतिहासात दुसरे नाही!
विद्यार्थी दशेत असतांना, ‘छावा’ आणि ‘संभाजी’ हे ग्रंथ मी जेंव्हा प्रथम वाचले तेंव्हा भावनातिरेकाने, त्यातील काही प्रसंग मी पूर्णतः वाचू शकलो नाही.
आजही मी निःशब्द आहे!
प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, पुणे …मार्च, २०२५
 
 
 
