एस पी सी ई ची स्पंदने: भाग ३ - मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना
दुसरे सत्र जानेवारीत सुरू झाले. डिप्लोमाच्या काळात सर्व्हे आणि स्ट्रेन्थ ऑफ मटेरियलसारख्या विषयांचा सखोल अभ्यास केला असल्याने, या सत्रात ते विषय खूप सोपे वाटत होते. त्यामुळे, मी माझ्या आवडीच्या उपक्रमांमध्ये रस घेण्यास सुरुवात केली, जसे की मराठी नाटक पाहणे, कवी संमेलनांना हजेरी लावणे, कविता करणे इत्यादी. माझ्या काही कविता साप्ताहिक ‘लोकप्रभा’मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.
एसपीसीई वसतिगृहात राहतांना, स्थानिकांशी तसेच नीलकमल आणि बोबिनोसारख्या हॉटेलच्या मालकांशी माझे चांगले संबंध प्रस्थापित झाले होते. तसेच हॉस्टेल स्टाफशीही माझे चांगले संबंध जुळले होते. मी त्यांना अनेक उपक्रमात मदत करीत असे. महत्वाच्या घटनांचे केंद्रबिंदू असलेल्या, रूम नंबर ५७ मधे अनेक विद्यार्थी येत व हास्य विनोदा बरोबरच अनेक गंभीर विषयांवरही चर्चा करीत. वसतिगृह प्रशासनाच्या मदतीने आम्ही आवरातून अनधिकृतरितीने जाणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीयरीत्या कमी केली.
एका संध्याकाळी, मेसमध्ये जेवत असतांना, कोणीतरी "फुली आणि गोळा" या मुंबई दूरदर्शनवरील एका प्रश्नमंजूषा कार्यक्रमाची माहिती दिली; कॉलेजचा चमू या कार्यक्रमात सहभागी होणार होता. आम्ही प्रा. भवानी प्रसादांच्या निवासस्थानी तो कार्यक्रम पाहायला गेलो. कार्यक्रम पाहिल्यानंतर मी माझ्या मित्रांना विचारले, "या विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजचे प्रतिनिधित्व करण्याकरिता कोणी पाठविले ?" कारण त्यांची कामगिरी खूपच निराशाजनक होती - त्यांना मराठी व्यवस्थित बोलता आले नाही आणि प्रश्नही समजले नाहीत. जेष्ठ विद्यार्थी देखील तेथे उपस्थित होते, पण कोणीच उत्तर देऊ शकले नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता, वर्ग सुरू होण्यापूर्वी आम्ही कॉलेजच्या बागेत एकत्र आलो आणि आदल्या दिवसाच्या टीव्ही कार्यक्रमावर चर्चा केली. चर्चेत अनेक विद्यार्थी सहभागी झाले. या चर्चेतून आम्हाला समजले की दूरदर्शनने कॉलेजकडे निमंत्रण पाठवले होते, जे विद्यार्थी प्रतिनिधींना दिले गेले. त्यांनी ते सर्व विद्यार्थ्यांना कळविण्याऐवजी स्वतःकडेच ठेवले. ऐनवेळी, कुठल्याही प्रकारची तयारी नसतांना दोघे जण थेट दूरदर्शन केंद्रात गेले. विद्यार्थी प्रतिनिधींनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही आणि त्यांची कामगिरी लज्जास्पद होती हे वस्तुनिष्ठपणे मी सर्वांसमोर मांडले. आम्ही, त्यांना बागेत बोलवून, त्यांनी अशी कृती पुन्हा न करण्याचे आश्वासन मागायचे ठरवले. परंतु, त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही, उलटपक्षी विद्यार्थ्यांशी ते उद्धटपणे बोलले.
हे ऐकून, मी कॉलेजच्या प्रवेशद्वारा समोरील चौथऱ्यावर उभे राहून, विद्यार्थी प्रतिनिधींनी माफी मागेपर्यंत, धरणे धरून आंदोलन सुरू करण्याचे सर्वांना आवाहन केले केले. आंदोलनादरम्यान, आम्ही इतर समस्या देखील चर्चेत आणल्या, जसे की जिमखाना उपक्रम, युवा महोत्सवात सहभाग, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन इत्यादी, आणि मागण्यांची यादी तयार केली. आता जवळ जवळ सर्वच विद्यार्थी प्रवेश द्वारावर जमले होते.
जेवणाच्या सुटीत, प्रा. नातू आणि प्रा. राऊळे आमच्याकडे आले. त्यांनी आमच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी आत गेले. अर्ध्या तासानंतर, विद्यार्थी प्रतिनिधी, उपप्राचार्य पी. पी.वैद्य आणि प्रा. गोगटे मॅडम यांच्यासह प्रवेशद्वारावर आले. त्यांनी हात जोडून दिलगिरी व्यक्त केली. मी पुढे जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि प्राध्यापकांचे आभार मानले. त्यानंतर मी विद्यार्थ्यांना शांततेत वर्गात परत जाण्याचे आवाहन केले.
त्यापूर्वी, वर्ग संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना जिमखाना हॉलमध्ये जमण्याचे आवाहन केले. मराठी वाङ्मय मंडळ स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तेथे चर्चा करण्यात येईल हे सांगितले.
त्या संध्याकाळी, सर्व विद्यार्थी जिमखाना हॉलमध्ये एकत्र आले. या बैठकीत, माझी मराठी वाङ्मय मंडळाचा अध्यक्ष म्हणून आणि नितीन गडकरी (मंत्री नाही!) यांची सचिवपदावर निवड झाली. ही खूप उत्साहजनक घटना होती; मराठी संस्कृती आणि साहित्य संवर्धना करिता एका नवीन अध्यायाची सुरुवात!
प्रा. डॉ. महेंद्र इंगळे @ पुणे, मार्च २१, २०२५

 
 
 
