बैठी बैठक !
काल, मनाने तरुण असलेल्या, ७६-७९ या कालावधीतील वर्गमित्रांची ‘बैठी बैठक’ वारजे येथील हॉटेल मिस्टिक फ्लेवर्स मधे पार पडली!
राम त्रिव्र तर शाम मध्यम स्वरुपात आजारी, सुरेश जग जिंकायला युरोप दौऱ्यावर, ‘काम कवडीचे नाही पण, रिकामपण घडीचे नाही’ ही रमेशची स्थिती… या अवस्थेतील आमचे काही मित्र प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाही परंतु अत्याधुनिक गॅजेट्सच्या सहाय्याने ते संपर्कात होते ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब!
बैठक म्हणजे चार चौघांनी एकत्र येवुन, एका ठिकाणी बसून, काही महत्वाच्या विषयांवर विचारविनिमय करणे. बैठकीला इंग्रजीत मीटिंग (Meeting) म्हणतात. पण ते भाषांतर योग्य वाटत नाही. कारण मीटिंग म्हणजे एकत्र येणे येव्हढेच त्या शब्दातून समजते. मिटिंग मधे लोक प्रत्यक्षात बसतात किंवा उभे राहतात हे समजत नाही. बैठकीत मात्र बसणे या क्रियेला प्राथमिकता दिली गेलेली आहे. Standing Meeting, Gate Meeting या सारख्या मिटिंगच्या प्रकारात लोक उभे असतात. Board Meeting, Online Meeting या प्रकारात लोक बसलेले असतात. Meeting या शब्दामागे मागे लागलेल्या विशेषणामुळे बैठकीच्या उद्दिष्टांचा बोध होतो.
बैठकीचे अनेक प्रकार आहेत.जस जसे तंत्रज्ञान विकसित होत गेले तस तसे बैठकीचे अनेक प्रकार विकसित होत गेले. अलीकडचा सर्वात आधुनिक व सुलभ असा प्रकार म्हणजे ऑनलाइन मीटिंग!
मंत्री मंडळाची बैठक, लग्न ठरविण्या बाबत बैठक, गणेश मंडळाची बैठक असे बैठकीचे अनेक प्रकार आहेत. बैठकीचे विविध प्रकार असल्याने, बैठकीचा हेतू स्पष्टपणे समजावा म्हणून बैठकी मागे बैठी हे विशेषण लावून ‘बैठी बैठक’ हा शब्दप्रयोग मी येथे केला आहे.
‘बैठी बैठक’ ही मित्र अथवा स्नेहीजनांची असते. या बैठकीचा कुठलाही अजेंडा किंवा प्रोटोकॉल नसतो. आनंद निर्मिती हा बैठकीचा मुख्य उद्देश्य असतो. या बैठकीत बहुतेक सर्वजण लिमका, थम्प्स अप यासारखी उत्साहवर्धक पेये घेतात! पूर्वी अनेकदा चर्चा केलेल्या विषयांवर तेव्हड्याच उत्साहाने पुन्हा चर्चा करतात. हास्य विनोद होत असतात. काही कालावधी नंतर कोण कोणाशी, कोणत्या विषयावर बोलतो आहे हे समजणे अवघड होते.
बैठ्या बैठकी करिता सर्व मित्र व स्नेहीजांना हार्दिक शुभेच्छा!
महेंद्र इंगळे, पुणे …फेब्रुवारी, २०२५






