१९७० ते ८० च्या दशकात महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक, व आर्थिक परिस्थिती कशी होती याचे उत्तम चित्रण अरुण साधू यांनी आपल्या 'मुंबई दिनांक' व 'सिंहासन' या कादंबऱ्यांतून केलेले आहे. त्यांवर जब्बार पटेलांनी 'सिंहासन' नावाचा सिनेमा काढला. अरुण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा खूप गाजला. आजही तो आपल्याला खिळवून ठेवतो.
आर्थिक विषमता, वाढती महागाई, कामगारांचे संप, शेती व शेतमजुरांचे प्रश्न ,दुष्काळी परिस्थिती यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या; त्यांचा मुकाबला करणे हे एक आव्हान होते. मूलभूत गरजा भागविण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर बाबांनी सामाजिक व राजकीय कार्यात स्वतःला झोकून दिले होते.
हतनुर धरण प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाले होते. तापी ही मध्यप्रदेशातील बैतूल येथे उगम पाऊन, सातपुड्याच्या दक्षिणेकडून वाहणारी पश्चिम वाहिनी नदी; तिला चांगदेव येथे पूर्णा नदी येऊन मिळते. चांगदेव पासून पश्चिमेला आठ किलोमीटर अंतरावर हातनूर येथे, तापी नदीवर, १३.८ टीएमसी (१३,८०० दशलक्ष घनफूट) जलसाठा करू शकणारा, हतनुर प्रकल्प हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा प्रकल्प होता. सिंचन, पाणीपुरवठा व वीजनिर्मिती ही प्रकल्पाची उद्दिष्टे होती.
धरणामुळे जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध होणार, आपला भाग सुजलाम सुफलाम होणार, समृद्धी येणार असे सांगितले जात होते. परंतु आपण राहतो ती घरे सोडून जावे लागणार. शेत जमिनी पाण्याखाली जाणार. चरितार्थाचे साधन नष्ट होणार ही भीती असल्याने गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. या संबंधात गावातील व परिसरातील लोकांमध्ये चर्चा व्हायच्या, बैठका व्हायच्या परंतु निश्चित स्वरूपाची माहिती मिळत नव्हती, नेमके काय करायला पाहिजे या संबंधात निर्णय होत नव्हता. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांच्या समस्या सुटाव्यात याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने व मोर्चे सुरू होते म्हणून बाबा आढावां कडून मार्गदर्शन घ्यावे असे ठरले. त्याप्रमाणे बाबा त्यांना भेटले. त्यांच्याकडून धरणग्रस्तांच्या समस्यां संबंधी शासनाकडे दिलेली निवेदने, केलेला पाठपुरावा, प्रकल्पग्रस्तां विषयीचे शासन निर्णय, वृत्तपत्रातील लेख, पुस्तके मिळविली. त्याचा सखोल अभ्यास केला. कोयना धरण परिसरात जाऊन तेथील लोकांकडून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, शेतीला मिळालेला मोबदला, प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेचा लाभ याविषयी वस्तुनिष्ठ माहिती घेतली. त्या वेळेस बाबांच्या असे लक्षात आले की महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांचे अजूनही पूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. भूसंपादित केलेल्या जमिनीचा पूर्णपणे मोबदला मिळालेला नाही. अनेक प्रकरणात न्यायालयात दावे प्रलंबित आहेत. पुनर्वसन झालेल्या गावांमध्ये पुरेशा सोयी उपलब्ध नाहीत.
या पार्श्वभूमीवर हातनुर धरणग्रस्तांचे योग्य रीतीने पुनर्वसन व्हावे याकरिता बाबांनी, श्रीरामकाका चौधरी, युवराजकाका पाटील, देवरामभाऊ पाटील, विश्वनाथजी बोदडे या सहकाऱ्यांसोबत काम करायला सुरुवात केली. पुनर्वसनाचे काम अतिशय जिकरीचे असून त्याकरिता शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींच्या भक्कम पाठिंब्याशिवाय हे शक्य होणार नाही याची जाणीव सर्वांना व्हायला लागली. श्रीमती प्रतिभाताई पाटील विधानसभेत एदलाबाद तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत होत्या व महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होत्या. चांगदेवचे त्र्यंबक भाऊ चौधरी एदलाबाद तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते. तेव्हा सर्वांनी विचारविनिमय करून बाबांनी प्रतिभाताईंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश करून, काम करावे असे ठरले.
आता बाबांनी हतनुर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित केले. सर्वात महत्त्वाचे पहिले काम म्हणजे त्यांनी गावातील लोकांना खाते फोड करायला सांगितले व त्यात त्यांना मदत केली, जेणेकरून कुटुंबातील सदस्यांना स्वतंत्ररित्या प्लॉट मिळतील. जुन्या चांगदेव गावात लहान लहान घरे होती. काही वाडे होते. वाड्यांना बुरुज व तटबंदी होती. गावातील घरांचे मूल्यांकनाचे काम इंजिनिअर भामरे साहेबांकडे होते. तटबंदी व बुरुजांना वाड्याचा भाग समजून, त्याप्रमाणे त्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे हे त्यांना पटवून सांगितले. पुनर्वसनात सगळ्यांना मोठे प्लॉट कसे मिळतील ते पाहिले. रस्ते, गटारी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु दवाखाना, ग्रामपंचायत, वि का सोसायटी, समाज मंदिरे यांच्या करिता प्रशस्त जागा मंजूर करून घेतल्या. पुनर्वसन आराखडा मंजुरीचे काम जळगांव येथील टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटकडे होते. त्यात इंजिनियर असलेल्या लता जगताप यांची या कामात मदत झाली. पुढे माझे त्यांच्याशी लग्न झाले, हा योगायोग.
बाबांचे कार्य बघून त्यांची जिल्हा काँग्रेस समितीच्या सरचिटणीस पदावर नेमणूक करण्यात आली. त्यामुळे त्यांना अधिक मोठे कार्यक्षेत्र उपलब्ध झाले. ते जळगाव येथील काँग्रेस भवनच्या वरच्या मजल्यावर राहायचे. बाहेर गांवावरून आलेल्या कार्यकर्त्यांकरिता चहापाण्याची व्यवस्था होती. जेवण ते स्वतः बनवायचे. पत्रकारांचे त्यांना नेहमी सहकार्य मिळायचे. महाराष्ट्र टाईम्सचे मुरलीधर ढमाले, टाइम्स ऑफ इंडियाचे श्रीकांत जळूकर, बातमीदारचे शरद नेहते, जनशक्तीचे ब्रिजलालभाऊ पाटील, साप्ताहिक मधुविचारचे स्वामी रेणापूरकर, प्रेस फोटोग्राफर सिताराम साळी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राजकीय व सामाजिक जीवनातले अनेक बारकावे त्यातून त्यांना समजायचे.
या काळात आमच्या कुटुंबाच्या, विशेषत: माझ्या बाबतीत एक महत्त्वाची घटना घडली. १९७६ मध्ये मी दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आदल्या दिवशी, वृत्तपत्रांमध्ये बोर्डाचे मानकरी या सदरात,
'महेंद्रनाथ विश्वनाथ इंगळे
एदलाबाद तालुक्यात प्रथम
मानसिंगराव जगताप पारितोषिक रुपये २५१ प्राप्त', अशी बातमी छापून आली. जळगाव आयटीआय मधे शिकणाऱ्या चांगदेवच्या विद्यार्थ्यांनी बाबांना ही वृत्तपत्रे संध्याकाळी एसटी स्टँड वर आणून दिली व त्यांचे अभिनंदन केले. रात्री साधारणत: साडेआठ वाजता बाबा घरी परतल्यानंतर, त्या दिवशी वीज नसल्याने, कंदीलाच्या प्रकाशात वाड्यातील सर्वांनी ही बातमी पुन्हा पुन्हा वाचली. प्रतिकूल परिस्थितीत मी ही परीक्षा दिली होती. चांगदेव येथे परीक्षेचे केंद्र नव्हते. ते जे ई स्कूल, एदलाबाद येथे होते. आम्ही सात आठ मुले मुली ट्रॅक्टरमध्ये बसून रोज परीक्षेला जात असू. जे ई स्कूल व्यतिरिक्त कोणी विद्यार्थी यापूर्वी तालुक्यातून प्रथम आलेला नव्हता. त्यामुळे माझे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणे ही एस बी चौधरी हायस्कूल, चांगदेव व गावातील सर्वांकरता अभिमानाची गोष्ट ठरली. या घटनेचा माझ्यावर मोठा परिणाम झाला. आपण वेगळे आहोत ही भावना माझ्यात निर्माण झाली. वाचलेल्या पुस्तकांमधील चरित्र नायकांप्रमाणे, आपण एक दिवस मोठे व्यक्ती होऊ असा विचार माझ्या मनात येऊ लागला.
(क्रमशः)
प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, जळगांव

No comments:
Post a Comment