उद्योजकता विकास शिबिर...
शासकीय तंत्रनिकेतन जळगांव येथे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) च्या अंतर्गत आंत्रप्रिन्युअरशिप मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट (EMD) सेल कार्यरत असतांना संस्थेतील व जिल्ह्यातील इतर संस्थांमध्ये तीन दिवसांचे उद्योजकता जागरूकता शिबिर आयोजित करण्यात येत असे.
तीन दिवसाच्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांकरिता चहा, नाश्ता, जेवण, प्रशिक्षण किट याची व्यवस्था केलेली असायची. सकाळी साडेनऊ पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विविध प्रकारची सेशन्स तज्ञ व्यक्तींकडून कंडक्ट केली जात असत. त्यात व्याख्यानासोबतच, प्रात्यक्षिके म्हणजे एक्सरसाइझेस, गेम्स, प्रश्नावली भरून घेणे अशा स्वरूपाचे कार्यक्रम असत. अशाप्रकारे प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असे. कार्यक्रमात विद्यार्थी पूर्ण तल्लीन होऊन जात असत.
प्रशिक्षणाचा कार्यक्रम आम्ही स्वतः विकसित केलेला होता. दीड तासाच्या सेशनची सुरुवात विषयाशी संबंधित एका लहानशा गोष्टीने व्हायची. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विषयाबद्दल आवड व जिज्ञासा निर्माण होत असे.
दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांना विषयाची ओळख करून देऊन त्याचे सखोल ज्ञान देण्यात येत असे. तिसऱ्या भागात विद्यार्थ्यांबरोबर विषयाशी संबंधित चर्चा करण्यात येत असे व त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येत असे. शेवटी एक प्रेरणादायी गोष्ट सांगून सेशनची समाप्ती होत असे.
उदाहरणार्थ वुमन एम्पॉवरमेंट(स्री सशक्तीकरण)हे सेशन असेल तर विद्यार्थ्यांना आम्ही एक कोडे (पझल) घालतो. ते असे:
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर वडील व मुलगा मोटारीतून प्रवास करीत असतांना भीषण अपघात होतो. अपघातात वडील जागच्या जागी मृत्युमुखी पडतात. गंभीरित्या जखमी झालेल्या मुलाला शहरातील प्रथितयश सर्जन कडे उपचाराकरिता नेण्यात येते तेव्हा, 'मी हे ऑपरेशन करू शकत नाही कारण हा माझा मुलगा आहे. मेडिकल इथिक नुसार डॉक्टर आपल्या रक्ताच्या नातेवाईकांचे ऑपरेशन करू शकत नाही.' असे सांगतात.
असे घडू शकते का?
असे विचारले असता विद्यार्थ्यांकडून गमतीची उत्तरे ऐकायला मिळतात.
प्रथितयश सर्जन मुलाच्या आई होत्या.
एक स्री प्रथितयश सर्जन असू शकते ही अजूनही अनेकांच्या कल्पने पलीकडची गोष्ट आहे. यावरून समाजाचा स्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन समजण्यास मदत होते.
बॅरिअर्स इन कम्युनिकेशन (संवादातील अडथळे) बद्दल माहिती देतांना एक मजेशीर खेळ खेळतो.
पहिल्या रांगेत बसलेल्या विद्यार्थ्याला कागदावर लिहिलेला एक संदेश वाचून लक्षात ठेवायला सांगतो.
तो संदेश असा असतो: 'राजस्थान की राजधानी जोधपुर मे सोना बिकता है पचास रुपये किलो.'
विद्यार्थ्याने हा संदेश त्याच्या शेजारच्या विद्यार्थ्याला कानात हळूच सांगायचा. असे प्रत्येक विद्यार्थ्याने करायचे. रांगेतला शेवटचा विद्यार्थी व्यासपीठावर येऊन त्याने काय ऐकले ते सांगतो. शेवटी कागदावर लिहिलेला खरा संदेश पहिला विद्यार्थी व्यासपीठावर येऊन वाचून दाखवतो. पहिल्या आणि शेवटच्या विद्यार्थ्यांच्या संदेशात खूप मोठी तफावत आढळते.
राजस्थानची राजधानी म्हटल्याबरोबर जयपूर हा शब्द आपल्या अंतर्मनातून आपोआप बाहेर येतो. सोन्याचा भाव ५० रुपये किलो एवढा कमी असेल हे अंतर्मन स्वीकारत नाही. ऐकण्यात आपली काहीतरी चूक होत आहे असे त्याला वाटते.
सांगणारा काही वेगळं सांगतो ऐकणारा मात्र वेगळंच ऐकतो.याला कम्युनिकेशन बॅरिअर्स म्हणजे संवादातील अडथळे असे म्हणतात. हा एक महत्त्वाचा विषय आहे. याच्यामुळे आपल्या मित्रांमध्ये किंवा घरामध्ये भांडणे होऊ शकतात. मिलिटरी ऑर्गनायझेशन मध्ये तर अशा प्रकारचे चुकीचे संदेशवहन झाल्यामुळे फार मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून कोणी बोलत असेल तेव्हा नीटपणे लक्ष देऊन आणि कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता ऐकणे गरजेचे आहे.
कठोर परिश्रम करण्याची तयारी, जिद्द, चिकाटी, नाविन्याचा हव्यास ही काही महत्त्वाची उद्योजकांची गुणवैशिष्ट्ये (Traits) आहेत.
ज्या लोकांमध्ये नीड फॉर अचीव्हमेंट (यशस्वी होण्याची तीव्र इच्छा) लहानपणापासून निर्माण होते ते लोक मोठेपणी यशस्वी व्यक्ती बनतात असा सिद्धांत David McClelland याने आपल्या ' The Achieving Society 'या पुस्तकातून मांडलेला आहे. लहानपणी ज्या मुलांना आई-वडीलांनी जवळ घेऊन थोर पुरुषांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या ती मुले मोठेपणी कर्तबगार आणि यशस्वी झालीत हे सिद्ध झालेले आहे.
विद्यार्थ्यामध्ये उद्योजक बनण्याची तीव्र इच्छाशक्ती आहे का? उद्योजक बनण्यास आवश्यक असणारे कोण कोणते गुण त्याच्यात आहेत याचे मोजमापही आम्ही करतो.
त्याकरिता Who am I?(मी कोण?) टेस्ट आम्ही कंडक्ट करतो. एका शांत वातावरणात विद्यार्थ्याला एक प्रश्नावली दिली जाते. ती तो एक चित्त होऊन भरून देतो. त्याने लिहिलेल्या उत्तरांवरून आम्हाला विद्यार्थ्याचे स्वतःविषयीचे आकलन काय आहे, इतरांनी त्याचे आकलन कसे करावे अशी त्याची अपेक्षा आहे याची माहिती आम्हास मिळते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये प्रशिक्षणाद्वारे उद्योजकता गुण विकसित केले जाऊ शकतात. महाराष्ट्र शासनाच्या Maharashtra Centre for Entrepreneurship Development, Aurangabad व जिल्हा उद्योग केंद्रा (DIC) द्वारे/ मदतीने हे प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबविले जातात.
अशा प्रकारचे एक उद्योजकता जागरूकता शिबीर (Entrepreneurship Awareness Camp) सन २००३ मधे आयोजित करण्यात आले होते. मा. मंत्री सुरेशदादा जैन हे कार्यक्रमाचे उद्घाटक होते.
प्रा. एम.बी. सानप, प्रा. आर.एम.नाफडे, मी स्वतः, जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर शैलेश राजपूत, MCED चे प्रा. मोकाशी आयटीआयचे प्राचार्य डी.ए. दळवी (नंतर संचालक), रोटरी क्लबचे गनी मेमन, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा. सीमा जोशी, आय एम आर च्या प्रा. शिल्पा बेंडाळे, प्रा. कुलकर्णी अशा सर्व जणांनी प्रशिक्षण कार्यक्रम राबविला.
शेवटच्या दिवशी दुपारच्या सत्रात पॅनल डिस्कशन हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात मधुलिका इंडस्ट्रीजचे अरुण बोरोले, श्रद्धा इंडस्ट्रीचे अनिल बोरोले, सुहांस केमिकलचे संदीप काबरा, प्लास्टिक इंडस्ट्रीतील विनोद बियाणी, आशिष इलेक्ट्रिकलचे संजय इंगळे अशा अनेक यशस्वी उद्योजकांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले व उद्योजक बनण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाचे संचलन प्रा.अविनाश झोपे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या केले. आजही अनेक जण मला भेटतात तेव्हा या कार्यक्रमाचा आवर्जून उल्लेख करतात.
प्रा. डॉ. महेंद्र इंगळे

No comments:
Post a Comment