आज महाशिवरात्री!
महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
एकादशीची श्री संत मुक्ताबाईंची यात्रा संपल्यानंतर, दर वर्षी चांगदेव येथे महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते.
वटेश्वर महादेवाचे भक्त, हठ योगी चांगदेव महाराजांनी तापी पूर्णा नद्यांच्या संगमावर वसलेल्या चांगदेव या पवित्र तीर्थक्षेत्री चौदासे वर्षे तपश्चर्या केली. पुढे श्री संत मुक्ताबाईंचा गुरु म्हणून स्वीकार केल्यानंतर, त्यांच्या उपदेशानुसार, पुणतांबे येथे समाधी घेवून, ते ब्रम्ह चैतन्यात लीन झाले.
अशा पवित्र तीर्थक्षेत्री जन्म झाला हे मी महद भाग्य समजतो. चांगदेव मंदिर आणि तापी-पूर्णा हे माझ्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग आहेत. आमचे बालपण चांगदेव मंदिर परिसरात आणि तापी पूर्णेच्या वाळवंटात फुलले. मंदिरात येणाऱ्या, तेथे राहणाऱ्या संत महात्म्यांचे दर्शन, त्यांची सेवा करण्याची मिळालेली संधी, मंदिरात होणारे उत्सव, कथा कीर्तने यामुळे ते समृद्ध झाले. यात्रेकरिता दरवर्षी नित्यनेमाने येणारे नामदेव महाराज अजनसोंडेकर व उत्तमराव महाराज सळशिंगीकर यांची कीर्तने आजही स्मरणात आहेत.
चांगदेव यात्रा आम्हा सर्वांकरिता मोठी पर्वणी! महाराष्ट्रातील विविध तीर्थ क्षेत्रांवरून येणाऱ्या दिंड्या, विशेषतः शेगांव वरून, हत्ती घोड्यांसह येणारी श्री गजानन महाराजांची दिंडी बघून डोळ्यांचे पारणे फिटायचे. हरी नामाच्या उदघोषासोबत,
चला चांगादेवी जाऊ…तापी पूर्णा दर्शन घेवू…
म्हणत, टाळ मृदुंगाच्या तालावर, गात नाचत येणाऱ्या भक्त जनांच्या दर्शनाने मन आनंदाने भरून जात असे. यात्रेच्या दिवसात, आलेल्या यात्रेकरूंना सुविधा पुरविणे, त्यांची सेवा करणे यात आम्ही सर्व कुटुंबीय स्वतःला विसरून जात होतो. अफाट लोक संग्रह असलेल्या आमच्या बाबांची यात प्रमुख भूमिका असायची.
चांगदेव मंदिराचे पुजारी ह भ प वसंतराव महाराज आणि मी शालेय वर्गमित्र! मी जेंव्हा जेंव्हा दर्शनाला येतो तेंव्हा प्रसाद म्हणून श्रीफळ देण्याचा त्यांचा शिरस्ता त्यांच्या वडीलांच्या काळापासून सुरू आहे.
पनघटावर उभे राहून, बाजूचे चांगदेव मंदिर आणि समोरचे, हतनूर धरणामुळे निर्माण झालेले, तापी -पूर्णा संगम असलेले, भव्य जलाशय बघून आपण विश्व चैतन्याशी जोडले जात आहोत ही भावना माझ्या मनात निर्माण होते आणि मनाला प्रगाढ शांतता लाभते.
चैतन्याचा झरा असलेली आमची नात, मधुरा जेंव्हा चांगदेव महाराजांच्या दर्शनाला आली तेंव्हा हरकून गेली. चांगदेव महाराजांच्या भेटीला छोटी मुक्ताई आलेली आहे ही भावना माझ्या मनात निर्माण झाली!
प्रा. महेंद्र इंगळे …२६ फेब्रुवारी, २०२५

No comments:
Post a Comment