Sunday, March 16, 2025

Changadev Get-together

 


स्नेहीजनांचा मेळावा!

जळगांव जिल्ह्यातील, तापी-पूर्णा नद्यांच्या संगमावर, चांगदेव मंदिराभोवती वसलेले चांगदेव हे गाव ! १९८० मधे,तापी नदीवर हतनूर धरण बांधले जात असल्याने, गावाचे पुनर्वसन झाले. गावातील अनेक जण नोकरी व व्यवसाय निमित्ताने वेगवेळ्या शहरात गेले व तिथे स्थायिक झाले. त्यांची मुले आणखी पुढे गेली. काही जण परदेशात शिक्षणाकरिता गेले,नोकरीला लागले व तेथे स्थायिक झाले. नोकरी व व्यवसायानिमित्त पुण्यात राहत असलेल्या स्नेहीजनांचा मेळावा भोसरी येथील श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई मंदिरात आयोजित करण्यात आलेला होता.

आज ३०० पेक्षा अधिक लोक या मेळाव्या करिता उपस्थित होते ही आपल्या सर्वांकरिता अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बाब आहे.

गेल्या दोन वर्षापासून विद्याधर महाजन आणि त्याचे सहकारी मित्र त्याकरिता प्रयत्नशील होते. विद्याधरने Changadev Get-together  नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनविला. एक एक व्यक्तिला शोधून त्यांचे काँटॅक्ट नम्बर मिळविले. त्यांच्याशी बोलला. शक्य असेल त्यांना व्यक्तिगतरित्या भेटला. जेष्ठांचे मार्गदर्शन घेतले. चांगदेव गावतील व्यक्तींशी संपर्क करून त्यांचे सहकार्य मिळविले. त्याचे हे अत्यंत जिकिरीचे व चिकटीचे काम सातत्याने सुरू होते. त्याच्या व त्याच्या सर्व सहकाऱ्यांच्या मेहनतीला आलेले फळ या मेळाव्याच्या स्वरूपात आपणास पहावयास मिळाले. मेळाव्यात तरुण मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग, त्याच बरोबर अनेक जेष्ठ व गुरूतुल्य व्यक्तींची उपस्थिती बघून खूप आनंद झाला.

ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचे, जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ, डॉ. व्ही. आर. चौधरी सर यानिमित्ताने भेटले, त्यांनी आपले अनुभव कथन करून बहुमोल मार्गदर्शन केले ही आपल्या सगळ्यांकरिता अत्यंत आनंदाची आणि प्रेरणादायी गोष्ट ठरली. विद्याधरने त्यांचा औपचारीक परीचय करून दिलेला असला तरीही पुनः त्यांच्या कार्याविषयी लिहिणे मी माझे कर्तव्य समजतो.

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL), पुणे या प्रतिष्ठित संस्थेत सरांनी शास्त्रज्ञ म्हणून कार्यास सुरवात केली. डायरेक्टर्स सायंटिस्ट या पदापर्यंत ते पोहचले.

वैज्ञानिक आणि तंत्राज्ञान क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण ठरलेल्या त्यांच्या मूलभूत संशोधनाकरिता, त्यांना १९९३ मधे ‘Vasvik Award’ देवून गौरविण्यात आले.

१८८५ मधे स्थापन झालेल्या, कॅलिफोर्निया राज्यातील स्टँडफोर्ड येथे ८००० एकर परिसरात विविध शाखांचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या, नोबेल पारितोषिक प्राप्त झालेले अनेक जेष्ठ प्राध्यापक जेथे कार्यरत आहेत अशा जागतिक दर्जाच्या व प्रतिष्ठित Standford University  ने अत्यंत कठीण निकष वापरून, प्रभावशाली असलेल्या, जगातील शास्त्रज्ञांची जी क्रमवारी ठरविली, -‘World’s Top 2% Scientists’ -त्यात डॉ. व्ही. आर. चौधरी यांचे नांव बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहे हे बघून अनेकांना आश्चर्याचा धक्क बसला!

USA मधील Fayetteville आणि जपान मधील Hokaido या प्रतिष्ठित विद्यापीठांत ते Visiting Research Professor म्हणून काही काळ कार्यरत होते.

प्रसिद्धी पासून लांब राहून, वयाच्या ८४ व्या वर्षीही ते  कार्यमग्न असतात. आपल्या क्षेत्रातील संशोधन पुढे नेवू इच्छिणाऱ्या त्यांच्या विद्यार्थ्यांना कर्तव्य भावनेने ते मार्गदर्शन करीत असतात. त्यांना निरामय दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कार्यास शुभेच्छा चिंतितो!

आळंदी मार्गावरील, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई मंदिरात  आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात उपस्थित राहतांना, श्री. चांगदेव महाराज वाघावर स्वार होऊन आपल्या शिष्यगणांसमवेत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांना भेटायला आळंदीला निघाले असता, त्यांच्या स्वागताकरिता ही भावंडे भिंतीवर बसून सामोरी गेलीत, पुढे चांगदेवांनी आदिशक्ती मुक्ताबाईचे शिष्यत्व पत्करले या प्रसंगांची मला आठवण होत आहे.

एकमेकांचा परिचय व्हावा, अडीअडचणींच्या वेळी एकमेकांना मदत व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याने त्यापेक्षा कितितरी अधीक उद्दिष्टे साध्य केलेली आहेत हे स्पष्टपणे जाणवत आहे. त्याकरिता मी विद्याधर, सुधीर लोखंडे, दिपक चौधरी, दिपक लढे, विश्वास पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो!

आपण सर्वांनी आमचे अगत्यपूर्वक स्वागत केले त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.

प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, पुणे, मार्च १६, २०२५

ता. क. विद्याधर १९८५-८६ बॅचचा गिरणांजनी तंत्रनिकेतन, एरोंडोलचा विद्यार्थी. तेथे मी प्राचार्य होतो.

No comments:

Post a Comment

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...