बालकवी ठोंबरे यांच्या जयंती निमित्ताने...
रोज सकाळी उठून फिरायला जातांना, घरापासून जवळच असलेल्या ओंकारेश्वर मंदिरातील ओंकारेश्वरांचे दर्शन घेणे, तेथून काव्यरत्नावली चौकात जैन उद्योग समूहाच्या सौजन्याने दिनविशेष निमित्ताने लावण्यात आलेल्या फलकांचे अवलोकन करणे व नंतर भाऊच्या उद्यानात फिरणे असा माझा दिनक्रम असतो.
महाबळ चौकावरून नेहरू पुतळ्याकडे जाणारा व गिरणा पंपिंग स्टेशन कडून मेहरूण तलावाकडे जाणारा असे हे दोन रस्ते ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांच्या संकल्पनेतून जळगाव महानगरपालिके द्वारे शहराचे वैशिष्ट्य ठरावे अशा काव्यरत्नावली चौकाची कल्पकतापूर्वक निर्मिती करण्यात आलेली आहे.
चौकातील सर्कल, त्यात दिनविशेष निमित्ताने प्रकाश व्यवस्थेसह लावण्यात येणारे फ्लेक्स बोर्ड, प्रत्येक कोपऱ्यात संगमरवरी पायऱ्यांवर बसण्याची व्यवस्था, त्यामागे एरिका पामचे सुंदर बॅकग्राऊंड, समोर हिरवळ, प्रकाश व्यवस्थेसह कारंजे अशा पद्धतीने प्रत्येक कोपरा सुशोभित करण्यात आलेला आहे.
काव्यरत्नावली चौकात साने गुरुजींची खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे...बहिणाबाईंची काया काया शेतामंधी घाम जिरव जिरव ही *धरीत्रीले दंडवत* कविता... बालकवींची पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर ही *औदुंबर* कविता..... दुर्गाप्रसाद तिवारींची त्यांचेच उभारा पुतळे, जे स्वातंत्र्यास्तव लढले...अशा चार कविता चार कोपऱ्यांमधे नाविन्यपूर्ण पद्धतीने लावण्यात आलेल्या आहेत.
बालकवींची आज जयंती. बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. १३ ऑगस्ट १८९० मध्ये जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे त्यांचा जन्म झाला. १९०७ मधे जळगांव येथे भरलेल्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांना बालकवी ही उपाधी मिळाली. बालकवींना निसर्गाबद्दल कमालीचे प्रेम होते. हळव्या मनाचे आणि बालसुलभ निरागसता लाभलेले बालकवी निसर्गाचे वर्णन करतांना त्याचेशी एकरूप होऊन त्यात हरवून जात. त्यांच्या निसर्ग कविता दृश्यरुपी असल्याने ते दृश्य आपण प्रत्यक्ष बघत आहोत... अनुभव आहोत असा भास होतो.
त्यांची औदुंबर कविता मात्र वेगळ्या प्रकारची आहे. ही केवळ निसर्ग कविता नसावी. त्यातून अनेक अर्थ ध्वनीत होतात असे अनेकांनी कवितेचे रसग्रहण करतांना सांगितलेले आहे.
फक्त २८ वर्षांचे आयुष्य बालकवींना लाभले. भादली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडत असतांना त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
शालेय अभ्यासक्रमात असल्याने तोंडपाठ केलेल्या, श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे... आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे... अशा सहज सुंदर निसर्ग कविता आजही मनाला तेवढाच आनंद देतात.
ज्या बालकवींनी आपल्या कवितांनी लहानपणीच आमचे भावविश्व समृद्ध केले, जीवन आनंददायी केले, निसर्गातील सौंदर्य शोधण्याची प्रेरणा दिली, त्या बालकवींचे स्मरण करून, त्यांच्या विषयी कृतज्ञता भाव व्यक्त करून विनम्रपणे त्यांना आदरांजली अर्पण करतो.
प्रा. महेंद्र इंगळे, जळगांव
ऑगस्ट १३, २०२४

No comments:
Post a Comment