ऊर्जेचा प्रपात…!
मागील आठवड्यात शासकिय तंत्रनिकेतन, जळगांव द्वारा उमाळे येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात *सक्षम युवा- समर्थ भारत* या विषयावरील भाषण व त्यांनतर शिबिरार्थींशी संवाद साधला.
त्यातील ही तीन संबोधने …
१.
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
तंत्रनिकेतना समोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात होतो. बघ्यांची गर्दी जमते. गर्दीतून मार्ग काढत एक युवक अपघातग्रस्तांजवळ पोहचतो. रस्त्यावरून जाणारी रिक्षा थांबवतो. आपल्या मित्रांच्या मदतीने, अपघातग्रस्तांना रिक्षा मधे बसवतो. स्वतः बसतो. रिक्षा सिव्हील हॉस्पिटल मधे घेण्यास सांगतो. मित्रांना, अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना कळविण्याच्या सूचना देतो…
या विद्यार्थ्याकडे नेतृत्व येते…त्याचे विद्यार्थी मित्र त्याचे नेतृत्व स्वीकारतात…
तो संवेदनशील आहे. पुढे येवून त्याने स्वतः जबाबदारी स्वीकारली. मित्रांना सोबत घेतले. प्राप्त परिस्थित, उपलब्ध साधनांचा उपयोग करून प्रश्न सोडविण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न केले. नेतृत्व असे निर्माण होते.
नेतृत्वाची व्याख्या मी अशी करतो…
‘A Leader is a person, who is sensitive to the environment, who shoulders responsibility, and who puts in earnest efforts to solve the problems’.
२.
प्रिय मित्रांनो,
युवकांच्या कल्पनाशक्तीला कुठली ही मर्यादा असू शकत नाही. तुम्ही कुठल्या उंचीवर जाऊन पोहचणार आहात या विषयी कोणीही भाष्य करू शकत नाही. तुम्ही स्वतः विषयी जे स्वप्न पहिले, त्यापेक्षाही अधिक उंचीवर तुम्ही पोहचू शकता. प्रयत्न करा आणि प्रार्थना करा!
३.
माझ्या प्रिय मित्रांनो,
Human potential has no bound!
एखाद्या व्यक्ती कडे किती पराकोटीची क्षमता असू शकते हे मी तुम्हाला, अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असतांना, ऑलिंपिक मधे, १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत, सुवर्ण पदक मिळवणाऱ्या, कार्ल लुईस या धावपटूच्या रोमांचकारी गोष्टीतून सांगतो….
(ही गोष्ट मी नाट्यमयरितीने सादर करतो. ती जशीच्या तशी लिहता येणे शक्य नाही; तिच्या बद्दल थोडे फार लिहू शकतो.)
———————————————————
कल्पना आणि वास्तविकता यांच्या मिश्रणातून तयार केलेली कार्ल लुईस बद्दलची ही गोष्ट! मागील २५ वर्षात ही गोष्ट मी अनेकदा सांगितली. प्रत्येक वेळेस नव्याने सांगितली. गोष्ट सांगतांना माझ्यात अंतर्बाह्य बदल होत आहेत याची मला जाणीव होते. ही गोष्ट सांगत असतांना ऊर्जेचा एक प्रचंड प्रपात निर्माण होतो आहे आणि त्यात माझ्यासह सर्व सभागृह न्हावून निघत आहे अशी भावना माझ्या मनात निर्माण होते .
प्रा.डॉ. महेंद्र इंगळे
फेब्रुवारी, २०२५

No comments:
Post a Comment