मला आवडलेल्या धुळे शहराकरिता…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून, अधिव्याख्याता, उपयोजित यंत्रशास्त्र पदावर निवड झाल्यानंतर, मी ८ ऑक्टोबर १९८९ रोजी शासकिय तंत्रनिकेत, धुळे येथे रुजू झालो.
त्यापूर्वी मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवलनगर (धुळे) येथे व पत्नी सहाय्यक नगर रचनाकार म्हणून धुळ्यालाच कार्यरत होतो. धुळ्याला आम्ही नवरंग कॉलोनी मधे राहत होतो. आमच्या मुलाचा जन्म धुळ्याचा. तो यूएसए मधे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. थोर अभियंता, भारत रत्न पुरस्काराने सन्मानित सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचे कार्यस्थळ असलेले, मुख्य रस्त्याला काटकोनात असलेल्या सहा गल्ल्यांचे; गणेश उत्सव, नवरात्री व भंडारा, रंगपंचमी व त्यांतरचे सहभोजन असे उत्सव उत्साहने साजरे करणाऱ्या साध्या सरळ माणसांचे धुळे शहर मला आवडले होते. घर बांधण्याकरिता मी येथे प्लाटही घेतले होते. त्यामुळे जळगांव येथे नियुक्ती मिळण्याची संधी असतांनाही मी धुळ्याला प्राधान्य दिले.
ज्या उपयोजित यंत्र शास्त्र विभागात मी कार्यरत होतो तेथील इमारत वैशिष्ट्य पूर्ण होती. पुर्णतः सागवानी लाकडात बांधकाम असलेली ही दोन मजली इमारत! उंचच उंच एकसंघ सागवानी खांब, आडवे बीम व त्यावर लाकडी फळ्यांचे मजबूत छत असलेल्या या इमारतीत तळ मजल्यावर अप्लाइड मैकेनिक्स, काँक्रेट टेक्नोलॉजी, सॉइल मैकेनिक्स यांच्या प्रयोग शाळा, काही मेकॅनिकल इंजीनियरिंगच्या मशीन्स होत्या. वरच्या मजल्यावर मोठे सभागृह होते.
प्रवेशद्वारा जवळ आमचे लॅब असिस्टंट श्री. पुजारी व त्यांच्या समोर शिपाई श्री खरात व पाटील बसायचे. भिंतीला लागून खिडक्यांच्या खाली, गोदरेज कपाटांच्या पार्टिशनने तयार झालेल्या केबिन्स मधे, श्री एम एम पाटील, श्री के पी नारखेडे व मी बसायचो. मोकळ्या वेळी येथे गप्पांचे फड जमायचे. त्यात श्री एस टी महाजन, श्री के डी पाटील, श्री वाणी सर, श्रीमती पी आर पाटील, श्रीमती सुनंदा वैद्य मॅडम यांचा उत्साहाने सहभाग असायचा. निजामच्या कँटीन मधुन चहा मागविला जायचा. अनेकदा सहभोजनाचे कार्यक्रम व्हायचे.
या इमारतीत पूर्वी दादासाहेब रावळांचा कारखाना होता, तो बंद करून, त्यांनी १९५३ मधे, येथे खाजगी तंत्रनिकेतन सुरू केले. सुरवातीला सिविल इंजीनियरिंग कोर्स सुरू करण्यात आला होता, त्यामुळे हे कॉलेज डी सी कॉलेज म्हणून ओळखले जात होते. काही काळानंतर मेकॅनिकल हा कोर्स सुरू करण्यात आला. पुढे त्यांनी ही संस्था, इमारत व जागेसह महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्त केली.
त्यानंतर महाराष्ट्र शासनाने, १९६०-६७ या कालावधीत अधिकची जागा संपादित करून, ५२ एकर परिसरात विस्तारलेल्या शासकिय तंत्रनिकेत, धुळे या संस्थे करिता नविन प्रशासकिय व शैक्षणिक इमारत, प्रयोग शाळा, वर्कशॉप, वसतिगृह, कुलमंत्री व प्राचार्य निवास आदी इमारतींचे बांधकाम केले.
२०१७-१८ मधे शासकिय तंत्रनिकेतन, धुळे या संस्थेचे ‘शिक्षण महर्षी दादासाहेब रावळ शासकिय तंत्रनिकेतन, धुळे’ असे नामकरण करण्यात आले.
१९९१ मधे लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतनात करता येईल का याची पहाणी करण्या करिता जिल्हापरिषद, धुळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले श्री. मनुकुमार श्रीवास्तव संस्थेत आले. त्यांचे समवेत पोलिस उप अधिक्षक श्री. किरण शेलार होते. प्राचार्य गु. ना. आढाऊ यांनी मला बोलावून संस्थेचा परिसर तसेच उपयोजित यंत्र शास्त्र विभाग दाखविण्याच्या सूचना दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी परिसराची पाहणी करून, मत मोजणीस आवश्यक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पांझरा नदीच्या बाजुने जास्तीच्या बॅरिकेडस उभ्या केल्या. अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती तसेच परिसराची साफसफाई करून घेतली. मत मोजणी व्यवस्थित पार पडली. श्री. बापू हरी चौरे खासदार म्हणून निवडून आल्याचे जाहीर होताच, ते माझ्यासह सर्व मतमोजणी करणाऱ्या सहकाऱ्यांना आत्यानंदाने भेटले. निवडणुक जाहीर झाल्यापासून निवडणुकीचे निकाल घोषित होई पर्यंत मी सामन्वयक म्हणुन काम करीत होतो.
पुढे, मा. मनुकुमार श्रीवास्तव महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव झाले. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव होते तेंव्हा पुणे येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे नगर विकास खात्याच्या स्नेह संमेलनात त्यांनी हिंदी सिनेमातील अनेक गाणी अतिशय उत्कृष्टपणे गायली. तेंव्हा त्यांचा हा वेगळाच पैलू बघायला मिळाला. अनेकदा महत्वाच्या विषयावर निर्णय घेतांना रात्री उशिरा पर्यंत टेबलवर नकाशे पसरवून ते सविस्तर चर्चा करायचे. रात्रीच्या जागरणाचा सकाळी त्यांच्या चेहऱ्यावर लवलेशही दिसत नसे. असे त्यांच्या बद्दलचे अनुभव वारिष्ठ अधिकाऱ्यांनी मला सांगितले होते. प्रशासकीय कामा निमित्ताने व संघटनेचा पदाधिकारी म्हणून माझे अनेक प्रशाकीय अधिकाऱ्यांशी संबंध आले त्यात अभ्यासू, प्रामाणिक व कर्तव्य दक्ष आधिकारी म्हणून मी मा. मनुकुमार श्रीवास्तव यांचा आवर्जुन उल्लेख करतो.
काही दिवसांपूर्वी संस्थेत गेलो तेंव्हा, उपयोजित यंत्र शास्त्र विभागाची ही इमारत आता वापरण्यास अयोग्य म्हणून घोषित करण्यात आल्याचे समजले. नविन इमारत बांधकामाचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
२०१५-१६ मधे, मी प्राचार्य म्हणून कार्यरत असतांना, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. दादा भुसे यांचेमार्फत तंत्रनिकेतनच्या नव्या इमारतीच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा केला होता. ते संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत.
प्रा. डॉ. महेंद्र इंगळे @ पुणे, एप्रिल ८, २०२५

No comments:
Post a Comment