Tuesday, May 13, 2025

अभियांत्रिकीचे पहिले पाऊल

 स्पंदन ८ वे

अभियांत्रिकीचे पहिले पाऊल

या काळात आमच्या कुटुंबाच्या, विशेषत: माझ्या बाबतीत एक महत्त्वाची घटना घडली. १९७६ मध्ये मी दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आदल्या दिवशी, वृत्तपत्रांमध्ये बोर्डाचे मानकरी या सदरात,

महेंद्र विश्वनाथ इंगळे, एदलाबाद तालुक्यात प्रथम, मानसिंगराव जगताप पारितोषिक रुपये २५१ प्राप्त

अशी बातमी छापून आली. जळगाव येथे शिकणाऱ्या चांगदेवच्या विद्यार्थ्यांनी बाबांना ही वृत्तपत्रे संध्याकाळी एसटी स्टँड वर आणून दिली. रात्री साधारणत: साडेआठ वाजता बाबा घरी परतल्यानंतर, त्या दिवशी वीज नसल्याने, कंदीलाच्या प्रकाशात वाड्यातील सर्वांनी ही बातमी पुन्हा पुन्हा वाचली. प्रतिकूल परिस्थितीत मी ही परीक्षा दिली होती. चांगदेव येथे परीक्षेचे केंद्र नव्हते. ते जे ई स्कूल, एदलाबाद येथे होते. आम्ही सात आठ जण ट्रॅक्टरमध्ये बसून रोज परीक्षेला जात असू. जे ई स्कूल व्यतिरिक्त कोणी विद्यार्थी यापूर्वी तालुक्यातून प्रथम आलेला नव्हता. त्यामुळे माझे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणे ही श्री एस बी चौधरी हायस्कूल, चांगदेव व गावातील सर्वांकरता अभिमानाची गोष्ट ठरली. या घटनेचा माझ्यावर मोठा परिणाम झाला. आपण वेगळे आहोत ही भावना माझ्यात निर्माण झाली. 

डिप्लोमा झालेल्या व्यक्तीस जिल्हा परिषद मधे इंजीनियर म्हणून ताबडतोब नोकरी मिळायची. त्यांना रावसाहेब म्हणून मोठा मान मिळायचा. हतनूर धरणाचे काम सुरू झाले होते. तेथे कंस्ट्रक्शन साठी वापरल्या जाणाऱ्या मोठ मोठ्या मशीनरी बघायला मिळाल्या. चांगदेव गावाच्या पुनर्वसनाचे काम सुरू असल्याने गावात डेप्यूटी इंजिनिअर मा. भामरे साहेब आमच्या कडे यायचे. त्यांच्या सरखे आपण सिव्हिल इंजीनियर बनावे ही भावना मनात निर्माण झाली.

दहावीत चांगले मार्क्स मिळाले असल्याने शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथे प्रवेश मिळाला. द्वितीय वर्षात स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची निवड केली.

१९६० मधे स्थापन झलेली, ६० एकर परिसर असलेली संस्था, संस्थेची प्रशस्त दगडी इमारत, त्या समोरिल बाग, परिसरातील मोठ मोठे वृक्ष, प्राचार्य व कुलमंत्र्यांचे कौलारू बंगले, वसतिगृह, मेस, मोठ मोठे ड्राइंग हॉल, ५०० फुट लांबीचा भव्य पोर्च हे सर्व बघून मी भारावून गेलो होतों.

माझ्या सोबत काही जुन्या ११ वीचे, प्रि डिग्री केलले, काही बी एस्सी झलेले ही विद्यार्थी होते. वर्गातील सर्वच जण हुशार होते. बहुतेक सर्व जण आप आपल्या शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झलेले होते.

पॉलिटेक्निक मधे प्रवेश घेतल्यावर ड्रॉइंग बोर्ड, T-स्क्वेर, सेट्स स्क्वेर, इंट्रुमेंटेशन बॉक्स, लॉग टेबल, स्लाइड रूल, वर्कशॉप ड्रेस या आवश्यक साहित्याची खरेदी केली.

मॅथेमॅटिकल सब्जेक्ट मधे कॅलक्युलेशन करण्याकरिता स्लाईड रूलचा वापर करावा लागायचा. ते एक कौशल्याचे काम होते. कॅलक्युलेटरचा शोध लागलेला होता, ते बाजारात उपलब्ध झाले होते, परंतु ते वापरण्यास परवानगी नव्हती. कॅलक्युलेटर वापरण्यास परवानगी मिळावी ही ४२ दिवसांच्या संपातील एक प्रमुख मागणी होती. ती मान्य झाली.

आमचे काही मित्र, लॉग टेबल विकत घ्यायचे आहें म्हणून या महिन्यात जास्त पैसे पाठवावेत असे पत्र, ग्रामीण भागात राहणाऱ्या आपल्या पालकांना पाठवायचे. प्रत्यक्षात ते एक कॅलक्युलेशन करण्याकरिता वापरायचे लहानसे पुस्तक होते.

येथे शिस्तीला फार महत्व होते. दिवसभर पीरियड, प्रॅक्टिकल, वर्कशॉप असायचे. क्वचितच एखादा पिरियड ऑफ मिळायचा.

वर्क शॉप मधे टर्निंग, फिटिंग,व स्मिथी असे चार सेक्शन होते. वर्कशॉप ड्रेस घालून वर्क शॉप मधे जायचे. वर्कशॉप मधे ड्रॉइंग दिले जायचे, ते वर्कशॉप डायरी मधे काढून, मटेरियल घेवून,  त्यानुसार तंतोतंत पणे जॉब बनवावा लागायचा. 

फिटिंगचे जॉब करतांना फाइलने घासून जॉब साईझ मधे आणण्याकरिता व स्मूथ बनविण्या करिता खूप वेळ घासावे लागायचे तेंव्हा हाताला फोड यायचे. हे सर्व खूप काळजीपूर्वक करावे लागे. खाच मोठी झाल्यास व त्यातून प्रकाश आरपार दिसत असल्यास जॉब रिपीट मिळवायचा.

स्मिथीचे जॉब मोठ्या पकड मधे पकडून, भट्टीतून काढून एका हाताने ऐनव्हील वर ठेवून, दुसऱ्या हाताने हातोड्याने ठोके मारावे लागायचे.

वेल्डिंगचा जॉब करतांना गॉगल किंव शील्ड वापरावे लागायचे. सवय नसल्याने त्यातून अस्पष्ट दिसायचे. काही वेळेस शिल्ड चुकून बाजुला झाले व वेल्डिंग चा त्रिव्र प्रकाश डोळ्यात गेल्यास डोळे सुजयाचे व अंगात कस कस जाणवायची.

ड्रॉइंग हॉल मधे इंजीनियरिंग ड्रॉइंगचे प्रैक्टिकल असायचे. ड्रॉइंग शीट्स येथेच पूर्ण करावे लागायचे. प्रत्येक प्रॅक्टिकल नंतर ड्रॉइंग शीट्स लॉकर मधे ठेवावे लागायचे.

‘This Term Work has been completed within four walls of the Drawing Wall’ असे प्रमाणपत्र प्रथम पृष्ठावर लावले जायचे व त्यावर संबंधित शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या असायच्या.

मी हॉस्टेल वर राहायचो व मेस वर जेवायला जायचो. माझ्याकडे वायर ब्रेक असलेली ‘स्पीड किंग’ सायकल होती. ती वजनाने अतिशय हलकी होती. तिला मी एका हाताने उचलुन आमच्या विंग मधे नेत असे. तिचे नाव मी सारंगी ठेवले होते.

संध्याकाळी सायकली वरून गावात फिरायला जाणे, सायकलीवरून अजिंठा, पद्मालय व जवळपासच्या ठिकाणी सहलीला जाणे, सुटीच्या दिवशी सिनेमा बघणे, मेस मधे फिस्टच्या दिवशी पैज लावून गुलाब जाम खाणे असे कार्यक्रम चालायचे. यात माझे मित्र श्री एल बी चौधरी, ( निवृत्त चीफ इंजीनियर), श्री एम डी महाजन (अमेरिका निवासी) व मी अग्रभागी असायचो. सबमिशन व परीक्षेच्या दिवसात आम्ही रात्रभर जागत असू. अभ्यासात पहिला दुसरा क्रमांक मिळायचा.

येथें मला खुप चंगले शिक्षक मिळाले. एम टेक असलेले, गोल्ड मेडलिस्ट, प्रा पी आय भंगाळे सर हातात कोणतेही पुस्तक किंवा नोट्स न घेता डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर हा विषय शिकवायचे. ते स्वतः प्रॉब्लेम तयार करून तो सोडवायचे. याचा माझ्यावर फार प्रभाव पडला होता. त्या विषयाची आवड निर्माण झाली होती. शेवटच्या सेमेस्टर मधे या विषयात मला बोर्डात सगळ्यात जास्त म्हणजे १०० पैकी ९३ मार्क्स मिळाले. पुढे त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांनी अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे स्ट्रक्चरल डिझाईन दिले आणि कन्सल्टंट म्हणून काम केले.

प्रा व्ही टी पाटील सर यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबद्दल फार आपुलकी व जिव्हाळ होता. दांडगा लोकसंपर्क व स्वतः शेतकारी कुटुंबातील असल्याने त्यांना या विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची तसेच आजूबाजूच्या परीसराची पूर्ण माहिती असायची. सर्व विद्यार्थ्यांना ते त्यांच्या रोल नंबर ने हाक मारायचे. पुढे पाली भाषेचा अभ्यास करून त्यांनी महानुभाव पन्थाविषयी संशोधनपर ग्रंथ लिहले. ते कवयित्री बहिणाबाई विश्वविद्यालयाने प्रकाशित केले.

प्रा व्ही एस वैद्य सर आमचे प्राचार्य होते. सहृदयी, रुबाबदार व्यक्तिमत्वाचे वैद्य सर रणजी क्रिकेट खेळले होते. पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या एप्टीट्यूड संबंधात त्यांनी, ते जळगांव ला असताना पीएचडी चे काम सुरू केले होते. त्या संबंधातील प्रश्नावल्या भरल्याचे माझ्या स्मरणात आहे. पुढे ते National Institute of Technical Teachers’ Training and Research, Bhopal येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. बाबा मला भेटायला यायचे तेंव्हा त्यांच्या सोबत मी प्राचार्य वैद्य सर, रेक्टर प्रा. भांडारकर सर यांना बंगल्यावर भेटयाला जायचो.

या सर्व घटना माझ्या मनात खोलवर रुजल्या. माझ्या व्यक्तिमत्वावर त्यांचा प्रभाव पडला. पुढे Entrepreneur Training Program (उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम) मधे जेंव्हा मी  Need for Achievement (nAch) हा विषय उदाहरणांसह स्पष्टीकरण देवून, समजवून सांगायचो तेंव्हा या घटनांचा अन्वयार्थ मला अधिक चांगल्या रितीने समजला. Need for Achievement हा अंगभूत गुण (Trait) नसून ती एक मानसिकता आहे. मन संस्कारक्षम असते, त्या बाल्यावस्थेत, प्रोत्साहनपर गोष्टी ऐकल्या किंवा वाचल्या, थोर व्यक्तींचा सहवास लाभला व त्यांचा प्रभाव पडला तर अशा मुलांमध्ये यशस्वी व्यक्ती बनण्याची त्रिव्र महत्वाकांक्षा निर्माण होते. अशी मुले पुढे आपले ध्येय निश्चित करून, त्याच्या पूर्तीकरिता जीवाचे रान करतात अशा प्रकारची मांडणी मानस शास्त्रज्ञ असलेल्या David MacClelland (१९१७-१९९८) यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...