सदिच्छा संवाद!
सकाळी फिरत असतांना, ज्यांचे विषयी माझ्या मनात विचार येतो त्यांना मी फ़ोन करतो. नेहमी ज्यांच्याशी बोलतो त्या व्यतिरिक्त हे माझे स्नेही, मित्र, सहकारी असतात, ज्यांच्याशी माझे कित्येक वर्षात प्रत्यक्ष बोलणे नसते. याला मी ‘सदिच्छा संवाद’ (Courtesy Call) म्हणतो. सेवेत असतांना शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी मी असे करायचो. आता केंव्हाही करतो. असे केल्याने मला अनेक गोष्टींची माहिती मिळते, नव नविन कल्पना सुचतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ऊर्जा प्राप्त होते. ‘हा कर्टसी कॉल आहे’ हे माझे पहिलेच वाक्य उच्चारतो तेव्हा ते आश्चर्यासह आनंदित होतात.
संवाद किंवा सुसंवाद (Communication Skill), परस्पर संवाद (Interpersonal Skills) करण्याची ही माझी शैली आहे. बोलण्यातील मोकळेपणा आणि पारदर्शीपणा (Openess and Transperancy) हा अशा संवादांचा पाया असतो तेव्हा त्यातून अनेक संकल्पना जन्मास येतात. त्यातील काही मूर्त स्वरूपात येतात.
आज सकाळी, प्राचार्य मधुकर सलगरे यांच्याशी बोललो. १५ वर्षांच्या कालावधीनंतर प्रत्यक्ष बोललो. कुठेही दुरावा जाणवला नाही. आम्ही नियमितपणे भेटत आणि बोलत असावेत असे वाटावे असा संवाद झाला.
शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी, विविध ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर १३ पुस्तके लिहली. वाचन मनन, चिंतन आणि संशोधन करून लिहिली. अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहाली. त्यातील काहींना पुरस्कार मिळाले. ‘हिंदुस्थानचा युगपुरुष मल्हारराव होळकर’ व ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि मराठेशाही’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाल्यावर, एक इतिहासकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
जायकवाडी प्रकल्पावरील स्थापत्य अभियंता म्हणून असलेली नोकरी सोडून ते शासकीय तंत्रनिकेतनात अधिव्याखाता म्हणून रुजू झाले. विद्यार्थ्यांकरिता समर्पित भावनेने त्यांनी काम केले. अत्यंत स्पष्ट वक्ते असल्याने त्यांना अनेकप्रसंगी संघर्ष करावा लागला.
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दांभिक आणि चुकीच्या गोष्टींवर ते सडेतोडपणे लिहितात. दर शनिवारी निघणाऱ्या ‘ठोकशाही’ या साप्ताहिकाचे ते कार्यकारी संपादक आहेत. लेखनात व्यस्त असतांनाही ते भरभरून बोलले. त्यांच्या विविध सामाजिक व शैक्षणिक प्रकल्पांविषयी माहिती दिली.
प्रथितयश ना स इनामदार यांच्यापासून त्यांनी लिखाणाची प्रेरणा घेतली हे सांगितल्यावर त्यासंबंधीची माझी एक आठवण जागृत झाली. ना स इनामदार हे माझे आवडते लेखक होते. त्यांची झुंज, झेप, मंत्रा वेगळा, शहेनशाह, राऊ, ही शाळेच्या लायब्ररीत असलेली पुस्तके, मी ९ वीत असतांना मी वाचली होती.
प्राचार्य सलगरे यांच्याशी बोलत असतांना अनेक संकल्पना जन्मास आल्या!
No comments:
Post a Comment