पुस्तक प्रकाशित झाले !
परवा पांडुरंगाच्या दर्शन घडले.
दर्शन घेवून मंदिराबाहेर आलो आणि पुन्हा एकदा कळसा कडे बघून हात जोडले गेले.
तर्जनीने 'पब्लिश' टॅब ला स्पर्श केला आणि 'अभियांत्रिकी स्पंदने' प्रकाशित झाले.
या स्पंदनांचे आता सार्वत्रिक लयीत रुपांतर झाले असून जगातील काना कोपऱ्यात ती पोहचते आहे .
मूठभर बिया हातात याव्यात आणि निळ्याशार हिरव्या डोंगरावर उभे राहून, आषाढातील भरलेल्या आभाळाकडे हात जोडत पाहून, त्या आसमंतात उधळून द्याव्यात. परमेश्वराची कृपा झाल्यावर, बियांमधील चैतन्याचे वटवृक्षात रुपांतर होते. हा विचार पुस्तक प्रकाशनाच्या वेळी माझ्या मनात आला. शब्दांच्याही पलीकडे, लिहणाऱ्यालाही अभिप्रेत नसतील अशा अनेक गोष्टी वाचक अनुभवू शकतात असा ही विचार, माझ्या मनात या प्रसंगी येत आहे.
तापी-पूर्णा सांगमावरील चांगदेव मंदिरापासून निघालेली ही दिंडी, प्रिय स्नेहीजनहो, तुमच्या सहवासात इथपर्यंत पोहचली. या प्रवासात पुन्हा एकदा तुमच्या सोबत चालत आलो, तुमच्या प्रेमळ साथीत हे आनंददायी क्षण पुन्हा अनुभवले. तुमच्या सहकार्याने हा प्रवास अधिक समृद्ध झाला. तुमचे मनःपूर्वक आभार!
तुम्ही आठवणी जागवल्या, संवेदनांना स्पर्श करून स्पंदने निर्माण केली, प्रिय विद्यार्थी मित्रहो, तुमच्या जिज्ञासेने आणि प्रतिसादाने मला नवी ऊर्जा मिळाली; तुमचे मनःपूर्वक आभार !
वेळोवेळी दिलेल्या अमूल्य सूचना, प्रेम आणि आपुलकीने दिलेला प्रतिसाद, कौतुकाचे शब्द आणि प्रोत्साहानाने वाढवलेला उत्साह या मुळे माझा प्रवास आनंददायी झाला म्हणून प्रिय मित्रहो तुमचे मनःपूर्वक आभार !
हे विश्व निर्मात्या परमेश्वरा, तू जग सुंदर बनविले आहेसच, पण त्याकडे पाहण्याची दृष्टी दिलीस, अंतःकरणात नव नवीन संकल्पना उमटविल्या, विचारांना दिशा दिलीस. तुझे मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment