Saturday, July 5, 2025

संकल्प!

 संकल्प !

‘अभियांत्रिकी स्पंदने’ पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून ऑर्डर प्लेस होण्याचा ओघ सुरू झाला आहे. प्रत्येक ऑर्डर डॅशबोर्डवर दिसते आणि त्यासोबत रॉयल्टीचे आकडेही. हे स्प्रेडशीट पाहताना मनात आश्चर्य, समाधान आणि अनाहत आनंद अशा संमिश्र भावना निर्माण झाल्या! आणि त्या भावनेतूनच लिहिण्याचं नवं स्फुरण मनात उमटलं.

१९८२ ते १९८९ दरम्यान मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो. त्या काळात मॅकग्रा हिल्स, मॅकमिलन, पियर्सन, धनपत राय यांसारख्या नामवंत प्रकाशन संस्थांचे प्रतिनिधी मला सतत भेटत असत. त्यांनी मला पुस्तक लिहिण्याची विनंती केली होती. मी ‘अप्लाइड मेकॅनिक्स’ हा कठीण समजला जाणारा विषय अत्यंत संयतपणे शिकवत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होतो. हेच कारण असेल की प्रकाशन संस्थांच्या सर्वेक्षणातून माझं नाव त्यांच्यापर्यंत पोहोचले.

पण मी ‘Beer and Johnston’ या लेखकद्वयींच्या Engineering Mechanics या पुस्तकाचा अत्यंत चाहता होतो. त्यांनी त्या विषयावर इतकं सुबोध, समर्पक आणि प्रगल्भ लेखन केलं होतं की त्या पातळीवर मी काही लिहू शकतो, हे मला वाटलंच नाही. म्हणून मी नम्रपणे नकार दिला.

नंतर त्यांनी मला Design of Steel Structures या विषयावर लिहिण्याचा आग्रह केला, जो विषय मला अत्यंत प्रिय होता आणि ज्यात बोर्ड परीक्षेत मी सर्वाधिक गुण मिळवले होते. तेव्हा नुकतंच IS 800 चे सुधारित (Revised) संस्करण प्रसिद्ध झालं होतं. त्या विषयावर R. S. Negi यांच्याखेरीज फार मर्यादित प्रमाणात स्रोत उपलब्ध होते. मी त्या वेळी एकाच वेळी चार अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना  हा विषय शिकवत होतो आणि त्यामुळे वेळे अभावी, इच्छा असूनही लिखाण शक्य झालं नाही.

२००५ मध्ये मुंबईच्या न्यूझीलंड हॉस्टेल, गोरेगाव येथे झालेल्या राजपत्रित महासंघ अधिवेशनात महाराष्ट्र राज्य शासकीय तंत्रनिकेतन शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मी अध्यक्ष प्रा. राजनीश पिसे यांच्या सोबत उपस्थित होतो. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात श्री. रविंद्र मोरे (जे नंतर Director of Treasuries झाले) यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि मा. ग. दि. कुलथे यांची सरचिटणीस म्हणून.

दुसऱ्या सत्रात माहिती अधिकार कायदा व बदली कायद्यावर चर्चासत्र व परिसंवाद झाला. मी त्यात या कायद्याच्या पळवाटा व त्याचा गैरवापर या विषयावर माझे मत मांडले. बदलीच्या कायद्याचे उल्लंघन करून माझी बदली करण्यात आली होती (नंतर ती रद्द झाली). 

शिक्षक संघटनेत, राजपत्रित अधिकारी संघटनेत आणि प्रशासनात काम करतांना माझ्या अनुभावर आधारित “शासकीय सेवेत सन्मानाने जागा!” हे पुस्तक मी लिहायला घेतलं. पण संघटनेच्या कार्यात आणि नंतर प्रशासनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढा गुंतून गेलो की ते लिहिणं शक्य झाले नाही. आज, ‘अभियांत्रिकी स्पंदने’च्या निमित्ताने पुन्हा एकदा त्या जुन्या स्फुरणाचा नवा जागर होत आहे. आता ठरवलं आहे – लिहीयचं!

"लोकाभिमुख शासन म्हणजे काय? ही एक संकल्पना आहे की वास्तव?"

"शासकीय नोकरी ही ‘सेवा’ आहे का?"

"सन्मान म्हणजे नक्की काय ? तो कोणी कोणाचा करायचा असतो ?"

"जगणं म्हणजे नेमकं काय? जिवंत राहणे आणि जगणे यातील मुलभूत फरक काय आहे?"

या मूलभूत प्रश्नांच्या बाबतीत मी चिंतन करीत आहे. विचारांमध्ये अधिक स्पष्टता येईल, तेव्हा ते लेखन पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबायचे नाही असा संकल्प या निमित्ताने करित आहे!

No comments:

Post a Comment

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...