सत्य आणि आभास!
एका लहान गावात, जि प शाळेच्या चौथ्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी, वर्गात बसला होता. शिक्षक अजून यायचे होते. कौलारू इमारतीच्या शाळेतील वर्गाच्या भिंती पांढऱ्या चुन्याने रंगविल्या होत्या. त्या चार भिंतींवर गेरुने पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण असे लिहले होते. त्याखाली, प्रत्येक भिंतीवर एक सुविचार लिहला होता. पूर्वेकडच्या भिंतीवरील ‘नेहमी सत्य बोलावे’ हा सुविचार या विद्यार्थ्याने सहज म्हणून वाचला…पण तो त्याच्या मनात रुजला.
काही वर्षांनी तो Velocity, Relative Velocity आणि Absolute Velocity शिकला.
‘धावत्या रेल्वेतून बाहेर बघितले असता झाडे पळतांना दिसतात.’ याचे त्याला कारणांसह स्पष्टीकरण विचारण्यात आले. त्याने हे सापेक्ष वेगा मुळे घडते असे कारण देवून स्पष्ट केले.
सत्य आणि आभास याचा त्याला भास होऊ लागला!
त्याला आइन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताची ओळख झाली. सत्य या विषयावर त्याने काही ग्रंथ वाचले आणि प्रवचने ऐकली.
त्याने वाचले आणि ऐकले की, ‘ज्यांना सत्य समजते ते बोलत नाहीत. ते मौनात जातात.’
त्याने काहींना सत्याचे प्रयोग करताना बघितले तर काहींना त्याचा शोध घेतांना!
प्रयोग करणाऱ्यांना काय निष्कर्ष काय मिळाले? आणि शोध घेणाऱ्यांना ते सापडले का?
सत्य बोलण्यापुरते मर्यादित आहे का?
त्याच्या मनात प्रश्नांची मालिका सुरू झाली:
सत्याचे प्रकार असतात का? जसे की वैज्ञानिक सत्य, तात्विक सत्य, वैयक्तिक सत्य…
प्रत्येकाचे सत्य वेगळे असते का?
आपणही सत्याचा शोध घ्यावा का?
आणि समजा ते सापडले तर त्याचे पुढे काय करायचे?
आपल्याला सापडलेल्या सत्याचा इतरांना काय उपयोग होईल?
असे प्रश्न त्याला अलीकडे पडू लागले आहेत.
शाळेच्या भिंतीवरील सुविचार आता त्याच्या विचारांचा केंद्रबिंदू होतांना दिसत आहे!
प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, जळगांव @ ऑगस्ट ३१, २०२५
No comments:
Post a Comment