१.
शाळेत असताना, मुंबईला सहल गेली होती .
मी जाऊ शकलो नाही.
"नाराज होऊ
नकोस... तुला पुढे मुंबईला शिकायला जायचं आहे,"
हे शब्द हृदयपटलावर कोरले गेले.
२.
मुंबईत आलो तेव्हा—
जुहू बीचचा किनारा असलेला समुद्र माझा होता.
आताही आहे—तेव्हा अधिक होता.
दूरवर समुद्राला भेटणारे क्षितिज माझं होतं.
आताही आहे—तेव्हा अधिक होतं.
स्वप्नांना आकार देणारे Bhavan’s आणि SPCE आवडले.
स्वतंत्रतेचं पहिलं पाऊल हॉस्टेल अधिक आवडले.
स्टर्लिंग आणि एक्सेलसिअर थिएटर आवडले.
इंग्रजी सिनेमा बघायला येणारे लोक अधिक आवडले.
दिल्ली दरबार आवडले. व्हाइट चिकन अधिक आवडले.
आभासी विश्व निर्माण करणारी फिल्म सिटी आवडली.
तेथे लीलया वावरणारे कलाकार अधिक आवडले.
वानखेडे स्टेडियम आवडलं.
विक्रमवीर क्रिकेटपटू अधिक आवडले.
३.
मंत्रालय आणि विधान भवन आवडलं.
त्या समोरील आमदार निवास अधिक आवडलं.
मलबार हिलवरील बंगले आवडले. 'वर्षा' ही आवडला.
त्यात रहिवासी येतात, जातात—म्हणून अधिक आवडला.
समुद्राच्या लाटांशी खेळणारं गेटवे ऑफ इंडिया आवडलं.
त्या समोरील ताज अधिक आवडलं.
अरुण साधूंचं ‘मुंबई दिनांक’ आवडलं. ‘सिंहासन’ अधिक आवडलं.
जॉनी वॉकरचं ‘ये है बंबई मेरी जान…’ आवडलं.
त्यातील वास्तव अधिक भिडलं.
काही चेहऱ्यांची, काही
बिनचेहऱ्यांची माणसं येथे भेटली.
बिनचेहऱ्यांची लोकलमध्ये जास्त भेटली—ती ही आवडली.
४.
मुंबईने प्रेम दिले, लाटांनी खेळविले, क्षितिजाने स्वप्नं दाखविली,
तरी येथे का थांबलो नाही?
चेहरा हरवून, बिनचेहऱ्याचं होऊ
असे वाटले म्हणून थांबलो नाही का?
थंडगार, मऊशार वाळूवरून
चालताना हा प्रश्न पडतो,
आणि त्याचं उत्तर समोरील समुद्रासारखंच असतं—
गूढ, खोल, आणि सतत बदलणारं!
महेंद्र इंगळे
No comments:
Post a Comment