भाग ५ : सभापती म्हणून कार्य…
सभापती म्हणून निवड झाल्यानंतर, बाबांनी तत्काळ कामाला सुरुवात केली. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांचे आभार मानले आणि आपल्या जबाबदारीची जाणीव स्पष्ट केली. "लोकांनी माझ्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. मी इथे सत्ता प्रदर्शनाकरिता नाही, तर सेवा करण्यासाठी आहे. येणाऱ्या लोकांच्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. आपला कारभार पारदर्शक आसावा” असे बाबांनी त्यांना नम्रपणे सांगितले.
दूरवरून येणाऱ्या लोकांशी आदराने वागण्याबाबत ते आग्रही होते. त्यांनी पंचायत समितीतील एक कुशल कर्मचारी, श्री. राजपूत यांना वैयक्तिक सहाय्यक म्हणून नियुक्त केले आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली. सभापती म्हणून मिळणारे मानधन ते अभ्यागतांच्या चहा-नाश्ता व पाहुणचारासाठी खर्च करित.
श्री. सीताराम कुंटे, जे नंतर महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव झाले, काही काळ बाबांसोबत बी.डी.ओ. म्हणून कार्यरत होते. श्री. कुंटे साहेबांशी आमचे नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले. उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे प्रधान सचिव असतांना त्यांची भेट झाली तेंव्हा त्यांनी बाबांची आस्थेने चौकशी केली होती. जळगांव जिल्हा परिषदेचे कार्यकरी आधिकारी राहिलेल्या, मुळच्या धरणगांवच्या, श्रीमती लीनाताई मेहंदळे तसेच श्री राजेशजी अग्रवाल यांचेशीं त्यांचे जिव्हाळयाचे संबंध होते. दिल्ली येथे महाराष्ट्र सदनात कार्यकरी आधिकारी असतांना भेटले तेंव्हा राजेशजींनी जळगांव जिल्ह्यातील राजकिय व्यक्तिंविषयी आस्थापूर्वक विचारपूस केली होती. जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बाबांचे चांगले संबंध होते. या अधिकाऱ्यांनी त्यांना वेळोवेळी मोलाचे सल्ले दिले आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय (जीआर) व महत्वाचे संदर्भ उपलब्ध करून दिले. त्यांच्या सहकार्यामुळे बाबा अनेक महत्वपूर्ण कामे करू शकलेत.
बाबा ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून सुरुवातीपासूनच कार्यरत होते. अनेक दशके त्यांनी विविध पदांवर काम केले होते. कांग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम केले असल्याने अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. संजय निराधार योजनेचे अध्यक्ष असतांना सामान्य माणसाच्या परिस्थिती विषयी त्यांना जाणीव होती. जनता शिक्षण संस्थेचे सचिव असल्याने शिक्षण क्षेत्रातील समस्यांची जाणीव होती. कुटुंब नियोजन करण्या करिता त्यांनी लोकांना प्रोत्साहित केले होते व या क्षेत्रात त्यांचे मोठे काम होते. त्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. वैद्यकीय विभागाचे उपसंचालक डॉ माठा साहेब, डॉ उदयसिंह पाटील, डॉ मराठे यांचे त्यांना नेहमीच सहकार्य लाभायचे. शेतकऱ्यांचे मोर्चे आणि धरणे आयोजित करून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला होता. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणुन कार्यरत होते. स्वतः शेतकरी असल्यामुळे, त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव होती. या अनुभवांची त्यांना पंचायत समिती सभापती म्हणून काम करतांना मोठी मदत झाली.
पुरातत्व विभाग औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजी नगर ) विभागा अंतर्गत येणाऱ्या चांगदेव मंदिरा संबंधात उप संचालक म्हणून कार्यरत असलेले श्री कांबळे साहेब तसेच पुणे येथील जंगली महाराज रोडवरील, पाताळेश्वर लेणी परसरातील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून, चांगदेव मंदिर परिसरात विभागकडून एका कर्मचऱ्याची कायम स्वरुपी नेमणूक, पनघटावरून नदीपात्रात उतरण्याकरिता पायऱ्या, मंदीराच्या आवारातील सुशोभिकरण, परिसरात पडलेल्या दगडांपासून कलात्मक वस्तू बनविणे या कामांना चालना देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
प्रशासनात त्यांना काही वेळा कठोर भुमिका घ्यावी लागायची. कोणीही रजेवर जातांना आपला कार्यभार, कपाटाच्या चाव्या वगैरे सहकाऱ्यांकडे सोपवून जाव्यात अशा सूचना असतांना, कार्यालयीन प्रमुख असलेले एक कर्मचारी कपाटाच्या चाव्या ठेवून न गेल्याने कामाचा खोळंबा होत आहे हे जेंव्हा बाबांच्या लक्षात आणून देण्यात आले तेंव्हा त्यांनी ताबडतोब पंचनामा करून त्यांच्या कपाटाचे कुलूप तोडले आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे कार्यभार सोपविला. त्यांच्या मुलाचा आमच्या संस्थेत प्रवेश घेण्यात आला तेंव्हा हे कर्मचारी मला भेटले होते.
पंचायत राज व्यवस्थे बद्दल त्यांना आस्था होती. जिल्हा परिषद ग्रामीण जनतेचे ‘मिनी मंत्रालय’ असते. पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असायला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. महाराष्ट्र सरकारच्या पंचायत राज समिती समोर ते आपली भूमिका कळकळीने मांडायचे. दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पंचायत राज परीषदे मधे, महाराष्ट्रातील निवडक पदाधिकाऱ्यांसोबत ते उपस्थित होते. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी नव्यानेच निर्माण केलेल्या जलसंधारण समितीवर त्यांची निवड केली होती.
पंचायत समिती मुक्ताईनगरच्या सभापती पदावर कार्यरत असतांनाच, बाबांनी जिल्हा परिषदेतील कामातही आपला ठसा उमटवला. ते जळगाव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सदस्य होते. अनुभवी व जेष्ठ सदस्य असल्याने त्यांच्या भूमिके कडे सर्वांचे लक्ष असायचे. त्यांनी मांडलेल्या अनेक महत्वपूर्ण प्रस्तावांवर गांभीर्यपूर्वक चर्चा व्हायची. त्यांच्या कार्यशैलीमुळे जिल्हा परिषदेच्या कारभाराला चालना मिळाली आणि ग्रामीण जनतेच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले.
प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, पुणे …फेब्रुवारी २१, २०२५





