*बाफना ज्वेलर्स कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम...*
पूर्वी मी शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथे प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी, केंद्र शासनाच्या सामूहिक तंत्रनिकेतन प्रकल्पाचा प्रमुख तसेच ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, न्यू दिल्ली अंतर्गत असलेल्या आंत्रप्रिनरशिप मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट सेंटरचा प्रमुख म्हणूनही मी कार्यरत होतो. त्या अंतर्गत विविध उद्योग समूहांकरिता, संस्थांकरिता, प्रशिक्षणार्थींकरिता उद्योजकता, व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण विकास अशा विविध विषयांशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करित होतो. त्याकरिता आम्ही एक टीम तयार केलेली होती. मी स्वतः, प्रा. आर. एम. नाफडे, प्रा. एम. बी. सानप, प्रा. एस. एन. जुमडे, प्रा. जयंत नांदेडकर (दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत) अशी आमची एक टीम होती.
या संबंधात नामांकित संस्थांमध्ये आमचे प्रशिक्षण झालेले होते. माणसांमधे निश्चित व स्थायी स्वरूपाचा बदल घडवून आणायचा असेल तर तो केवळ प्रशिक्षणानेच घडवून आणता येतो. व्याख्यानाने, प्रवचनाने, कथा आणि कीर्तनाने माणसे बदलण्याची शक्यता फार कमी असते. संस्थांच्या गरजेनुसार आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम डिझाईन करीत होतो.
मा. प्रतिभाताई पाटील यांच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी बांभोरी, जळगांव या संस्थेकरिता ते एन बी ए ॲक्रेडिटेशन करिता जात असतांना तेथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
नूतन मराठा संस्थेचे व्यवस्थापन प्रतिनिधी श्री. शिवाजीराव भोईटे यांच्या विनंतीनुसार संस्थेत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील सर्व हायस्कूलच्या मुख्याध्यापकांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी संस्थांच्या प्राध्यापकांकरिता 'इन्स्टिट्यूशनल मॅनेजमेंट' या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सुवर्णनगरी व आता स्वर्ण तीर्थ म्हणून ओळख असलेल्या जळगाव येथील रतनलाल सी. बाफना यांच्या 'बाफना ज्वेलर्स' या प्रसिद्ध फर्मच्या कर्मचाऱ्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी मी आज लिहीत आहे.
सोन्या-चांदीच्या व्यवसायातील स्पर्धेमुळे बाफना ज्वेलर्स या फर्म मधील कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण वाढलेले होते.
आमच्या कर्मचाऱ्यांकरिता आपण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावा व आमचा प्रश्न सोडवावा असा प्रस्ताव मा. रतनलालजी बाफना यांनी आमच्याकडे दिला. त्यानुसार आम्ही तीस कर्मचाऱ्यांकरिता एक ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केला.
ठिकाण: नयनतारा गेस्ट हाऊस
वेळ: रोज सकाळी ६ ते ९.३०
प्रशिक्षणाचा पहिला दिवस:
आम्ही सर्व प्रशिक्षक पावणेसहा वाजता माईक टेस्टिंग वगैरे करून एलसीडी प्रोजेक्टर ऑन करून पूर्णपणे तयारीत होतो. ठीक सहा वाजता प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला. जसजसे प्रशिक्षणार्थी हॉलमध्ये येत होते तसतसे आम्ही हसतमुखाने त्यांचे स्वागत करीत होतो. प्रशिक्षण वेळेवर सुरू होणार नाही हा बऱ्याच प्रशिक्षणार्थींचा अंदाज खोटा ठरला. सर्वात प्रथम आम्ही आमचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रशिक्षणार्थींचा परिचय करून घेतला व पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. आठ वाजता टी ब्रेक झाला. त्यामध्ये प्रा. सानप सर्व कर्मचाऱ्यांना प्रथम नावाने संबोधित करून भेटत होते. हे सर्व बघून कर्मचारी आश्चर्यचकित झाले. आमच्यापैकी दोघेजण सर्व कर्मचाऱ्यांचे ऑब्झर्वेशन करीत होते. कुठला कर्मचारी आक्रमक आहे, अनावश्यक प्रश्न विचारणार आहे, त्रुटी काढणार आहे याचा आम्हाला आधीच अंदाज येतो.
टी ब्रेक नंतर दुसरे सेशन संपन्न झाले. अर्थातच ते फार प्रभावी झाले.
दुसऱ्या दिवसापासून श्री. सुशील बाफना (पप्पू शेठ) प्रशिक्षण कार्यक्रमात पूर्ण वेळ उपस्थित राहत होते. तशी त्यांना आम्ही पूर्वीच सूचना केलेली होती.
दुसऱ्याच दिवसापासून सर्वजण अगदी उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेऊ लागले आणि त्यात पूर्णपणे समरस झाले. त्यांच्यात आणि आमच्यात एक अतुट नाते निर्माण झाले आहे याची त्यांना जाणीव व्हायला लागली.या प्रशिक्षण कार्यक्रमात कर्मचाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणा व संस्थेविषयी बांधिलकी (Organizational Commitment) हे दोन गुण विकसित करावेत असे आम्ही ठरविले होते. त्याकरिता सेल्फ एक्स्प्लोरेशन टेक्निकचा आम्ही उपयोग केला. म्हणजे प्रशिक्षणार्थीने स्वतः व्यासपीठावर येऊन त्यास प्रामाणिकपणाबद्दल काय वाटते हे स्वतःच्या शब्दात सांगायचे. त्यानंतर त्यास आम्ही काही प्रश्न विचारतो. त्या प्रश्नांची उत्तर द्यायला प्रशिक्षणार्थीने सुरुवात केल्यावर प्रामाणिकपणा हा गुण त्याच्यामध्ये विकसित होण्याची प्रक्रिया सुरू होते.
संस्थेबद्दल बांधिलकी हा गुण निर्माण करायचा होता तेव्हा कर्मचाऱ्यास व्यासपीठावर बोलवून आम्ही त्याला संस्थेत काम करत असतांना तुमच्या आयुष्यातील सर्वात सुखाचे व दुःखाचे क्षण कोणते असा एक प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देतांना काही कर्मचारी अक्षरशः रडत होते. या प्रश्नाचे उत्तर देत असतांना प्रशिक्षणार्थीत संस्थेविषयी बांधिलकी निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते.
प्रशिक्षण कार्यक्रमात आम्ही प्रात्यक्षिकांसह वेगवेगळे सेशन्स कंडक्ट केलेत. प्रा. नाफडे यांनी Delighted Customer (आनंदी ग्राहक) ही संकल्पना स्पष्ट करून सांगितली. प्रा. नांदेडकर यांनी स्वप्रतिमा कशी विकसित करावी याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. जुमडे यांनी एकमेकांशी व ग्राहकांशी सुसंवाद कसा असावा यासंबंधी महत्त्वाच्या टिप्स दिल्या. प्रा. सानप यांनी सुवर्ण व्यवसायातील सध्याच्या समस्या, प्रतिस्पर्धी ओळखून व्यवसाय वृद्धी कशी करावी, कर्मचाऱ्यांचे योगदान त्यात कसे महत्त्वाचे आहे याविषयीचे अभ्यासपूर्ण विवेचन केले.
शेवटी, लहानपणी पायाने अधू असलेल्या कार्ल लुईस या धावपटूने आपल्या व्यंगावर मात करून शंभर मीटर धावण्याच्या ऑलिंपिक स्पर्धेत नऊ वेळा सुवर्णपदके पटकावली व आपली स्वतःचीच रेकॉर्डस् अनेकदा मोडलीत ही प्रेरणादायी गोष्ट मी नाट्यमयरीतीने सांगतली तेव्हा श्रोते रोमांचित झालेत... टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला...
हा अनुभव पुन्हा एकदा मी घेतला...
*प्रा. डॉ. महेंद्र इंगळे*

 





















 
 
