आदर्श शिक्षक….माधव मुळे सर
सकाळी रंजन देशपांडेचा फोन आला. आपले माधव मुळे सर आपल्याला सोडून गेल्याचे त्याने सांगितले. ऐकून मी निःशब्द झालो. चार दिवसांपूर्वीच, प्रजासत्ताक दिना निमित्त, आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या होत्या.
शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका प्राप्त केल्यानंतर सर काही काळ अबुधाबी येथे अभियंता म्हणुन कार्यरत होते. त्यांनतर ते शासकिय तंत्रनिकेतन जळगांव या संस्थेत अधिव्याख्याता पदावर रुजू झाले.
अत्यंत शांत स्वभावाचे, मृदू व्यक्तिमत्त्वाचे माधव मुळे सर विद्यार्थ्यांशी अत्यंत प्रेमाने संवाद साधायचे. त्यांचे विपूल वाचन होते व त्यांना विविध क्षेत्रातील अनुभव होता. याचा आम्हा विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला.
World Bank Assistted Project अंतर्गत सरांनी संस्थे करिता DPR बनविला व त्याच्या यशस्वी अंमल बजावणीत सहभाग घेतला. उद्योग व्यवसायांशी समन्वय साधून, प्राध्यापांकरिता विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे संस्थेत आयोजन केले. याची दखल घेवून Indian Society for Technical Education ने संस्थेला Faculty Devlopment करिता Narasi Monaji Award देवून गौरविले
महाराष्ट्र तंत्रशिक्षण परीक्षा मंडळात ‘कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन’ या पदावर कार्यरत असतांना मंडळांतर्गत असलेल्या ९० पेक्षा अधिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा वेळेवर घेवून, निकाल वेळेवर घोषित करण्याकरिता प्रणाली निर्माण करण्या करिता ते अहोरात्र कार्यरत होते. सर या काळात बांद्रा येथील ‘सर जे जे स्कुल ऑफ आर्ट’ येथील हॉस्टेल मधे राहत होते. कामानिनित्त मुंबईला जायचो तेंव्हा आम्ही तेथे राहत असू. विविध विषयांवर ते भरभरून बोलायचे. त्यांना ऐकणे ही एक पर्वणी असायची. MSBTE करिता Rule Book तयार करणे, MSCIT या परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करणे, मंडळाला ऑटोनोमी मिळवण्याच्या कार्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. निवृत झाल्यावरही काही काळ ते OSD म्हणुन मंडळात कार्यरत होते. अत्यंत समर्पित भावनेने ते काम करायचे.
त्यांची बायपास सर्जरी झाली. थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा तेव्हाढ्याच उत्साहाने ते सर्व कार्यक्रमांत कार्यरत झाले. डॉ. ऑर्निश यांचे ‘Program for Reversal of Heart Disease’ हे पुस्तक विकत घेवून त्यात दिलेल्या पद्धतींचा अभ्यास करून त्यांचा त्यांनी अवलंब केला.
शासकिय तंत्रनिकेतन, ठाणे या संथेच्या सुरवातीच्या दिवसांत, संथेच्या प्रगती करिता त्यांनी मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविले .
महत्वाच्या प्रशासकिय पदांवर काम करित असतांना देखील, त्यांनी आमच्या आग्रहास्तव Maharashtra Government Polytechnic Teachers’ Association या संघटनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. तंत्रनिकेतनातील शिक्षकांना AICTE वेतनश्रेणी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
अत्यंत समाधानी आयुष्य ते जगले. निवृत्तीनंतर बराच काळ, ते वर्षातुन सहा महिने अमृताकडे लंडनला, सहा महिने हर्षदाकडे नाशिकला असायचे. ते अत्यंत संवेदनशील व सहृदयी व्यक्ती होते. वडिलोपार्जित संपत्तीवरील हक्क त्यांनी स्वेच्छेने सोडून दिला होता. आम्हा सर्वांना ते शिक्षक, तत्वचिंतक व मार्गदर्शकाच्या भूमिकेतून सदैव मार्गदर्शन करायचे. आज ते सोडून गेलेत तेंव्हा माझ्या व्यक्तिमत्वाचा एक हिस्सा मी कायमचा गमावल्याची भावना मनात आहे!
त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना!
प्रा. महेंद्र इंगळे, पुणे
३१ जानेवारी,२०२५

No comments:
Post a Comment