*प्रा. ए. एस. झोपे यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने* ......
शासकीय तंत्रनिकेतन जळगाव येथून अधिव्याख्याता तथा प्रभारी विभाग प्रमुख, विद्युत विभाग म्हणून कार्यरत असलेले, माझे सहकारी राहिलेले प्रा. अविनाश झोपे सर ३१/८/२०२२ रोजी शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांना निवृत्तीनंतर सुरु करावयाच्या सेकंड इनिंग करिता मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना निरामय आयुष्य आपल्या मना प्रमाणे जगायला मिळो व त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत याकरिता परमेश्वराकडे प्रार्थना!
श्री.झोपे सरांनी १९८१ साली शासकीय तंत्रनिकेतन जळगाव येथून पदविका प्राप्त केली. त्यानंतर VJTI मुंबई येथून पदवी प्राप्त केली. सात आठ वर्षाच्या औद्योगिक क्षेत्रातील अनुभवानंतर ते तंत्र शिक्षण विभागात अधिव्याख्याता, विद्युत पदावर रूजू झाले. त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन खामगाव, गडचिरोली, धुळे, औसारी तसेच शासकीय अभियांत्रिकी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे सेवा दिली. सेवेत असताना त्यांनी NITTR, भोपाळ येथून M. Tech. Ed. ही पदवी प्राप्त केली.
आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या करिता अहोरात्र प्रयत्नशील असलेले अत्यंत शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यार्थ्यांकरिता त्यांनी सोप्या भाषेत विद्युत विषयावर पुस्तके लिहिली. अनेक वर्षे ते महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाच्या विद्युत शाखेच्या अभ्यास मंडळावर कार्यरत होते.
त्यांच्या अधिपत्या खालील विद्युत विभागातील जुन्या अवजड मशीन्स आजही चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. अत्यंत कमी खर्चात त्यांनी विद्युत विभागातील प्रयोगशाळा तसेच वर्ग अद्ययावत केले आहेत. विद्यार्थ्यांकडून प्रोजेक्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध थर्मल प्लांट्स चे इल्युमिनेटेड ले आउट आणि मॉडेल्स प्रयोग शाळांमध्ये लावण्यात आलेले आहेत. विविध शास्त्रज्ञांचे फोटो व त्यांनी केलेले कार्य याची माहिती प्रयोगशाळा आणि वर्गांमध्ये Display Board वर लावण्यात आलेली आहे.
विभागाबरोबरच संपूर्ण संस्थेच्या चाळीस एकर परिसरातील विविध इमारती, वसतिगृहे यांच्या व्यवस्थेची देखभाल करणे याची जबाबदारीही श्री.झोपे सरांकडेच होती. देखभाली करिता अत्यंत कमी आर्थिक तरतूद असताना अधिकाऱ्यांशी असलेल्या व्यक्तीगत संबंधांमुळे अनेक अवघड गोष्टी ते सहज करून घेत असत.
सप्टेंबर २०१८ मध्ये संस्थेतील ट्रांसफार्मरचा स्फोट झाला. त्यामधून तेल गळती होऊन आगी सह ते खाली पसरले व अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. श्री. झोपे सर व त्यांच्या सहकार्यांनी MSEB इंजिनिअर कडे त्वरित संपर्क करून स्फोट झालेले ट्रांसफार्मर सुरक्षित रित्या बाहेर काढले. दोन दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.अशा अनेक घटनांची मला या प्रसंगी आठवण होत आहे.
संस्थेत कोणताही कार्यक्रम असेल तर तो अत्यंत नीटनेटका पद्धतीने करायचा यावर त्यांचा नेहमी भर असायचा. ते नेहमी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचे व कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवायचे. विशेषत: दसरा, शिक्षक दिन, इंजिनिअर्स डे, सत्कार समारंभ, निरोप समारंभ या कार्यक्रमांत विद्युत शाखेच्या विद्यार्थीनी स्वतःहून रांगोळ्या काढायच्या. रोषणाईने विद्युत विभाग उजळून निघायचा.
Alumni Association स्थापनेत व रजिस्ट्रेशन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.असोसिएशन मार्फत त्यांनी संस्थेत विविध उपक्रम राबविले.
संस्थेत Entrepreneurship Management Development Cell सेल कार्यरत होता तेव्हा त्यामार्फत विद्यार्थ्यांकरिता तीन दिवसांचा प्रक्षिण कार्यक्रम आयोजित केला जायचा. त्यामध्ये शेवटच्या दिवशी नामांकित उद्योगपतींना बोलून त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष संवाद आयोजित केला जायचा व विद्यार्थ्यांना उद्योजकांना हवे ते प्रश्न विचारण्याची संधी मिळायची. या कार्यक्रमाचे संचालन श्री. झोपेे सर करायचे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना तर खूप फायदेशीर ठरायचाच पण जे नामांकित उद्योजक संस्थेत यायचे ते सुद्धा कार्यक्रमाचे आयोजन व विद्यार्थ्यांची कल्पकता बघून भारावून जायचे. आजही अनेक जण या कार्यक्रमाची आठवण काढतात.
श्री.झोपे सर नोबेल पारितोषिक विजेत्या पाबलो नेरुडा या कवीच्या You start dying slowly if you don't.......या कवितेचा आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख करायचे. नाविन्याचा ध्यास घेऊन आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्याचे प्रयत्न करीत असतांना सौंदर्यपूर्ण जीवनाचा आस्वाद घेत जगावे अन्यथा आपण हळूहळू मरत जातो असे कवी या कवितेतून सांगत आहे.
श्री.झोपे सर खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक तर आहेतच पण एक चांगला *माणूस* आहेत. कुटुंबवत्सल आहेत. टापटीप राहणे,आप्तेष्टांसोबत सहलीला जाणे, शास्त्रीय संगीत व नृत्यांच्या कार्यक्रमांना जाणे याची त्यांना आवड आहे.जीवनाचा मनमुराद आस्वाद घ्यावा अशी त्यांची वृत्ती आहे.
शासकीय तंत्रनिकेतन जळगाव या संस्थेशी त्यांचे ऋणानुबंध गेल्या ४५ वर्षांचे आहेत. ते व त्यांच्या दोन्ही कन्या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे हे तिघे जण संस्थेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत. काही यशस्वी उद्योजक आहेत. अनेक उपक्रमात त्यांचे मला सहकार्य लाभले त्याबद्दल व्यक्तिश: मी त्यांचा ॠणी आहे. निवृत्त होत असतांना श्री.झोपे सर निश्चित समाधानी असतील याची मला खात्री आहे.पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.
धन्यवाद !
डॉ. महेंद्र इंगळे, प्राचार्य (निवृत्त)
शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव
No comments:
Post a Comment