Monday, May 19, 2025

विनाशीर्षक!

 विनाशीर्षक!

मी लिहिण्याची, माझी स्वतःची शैली विकसित करित आहे. व्यक्ती, स्थळ, काळ, घटना, आणि त्या माझ्याशी कशा संबंधित आहेत या पाच बाबींचा उल्लेख माझ्या ब्लॉग मधे करतो.

कवी मनाचा अभियंता असल्याने, आणि शब्दांपेक्षाही संवेदनांना अधिक महत्व देत असल्याने, मी शब्द योजना व कल्पना विस्ताराबाबत स्वातंत्र्य घेतो. 

उदा. ऊर्जेचा प्रपात, Swords in hand, Hear with heart, Speak with eyes इत्यादी.

‘SWOT of Mine!’ या विषयावर इंग्रजीत कविता करणारा दुसरा कवी मला माहीत नाही! SWOT म्हणजे Strength Weaknesses, Opportunities and Threats. कंपन्या त्यांच्या समोरिल आव्हानांचा अभ्यास करून, स्वतःचा विकास कसा साधायचा या करिता या तंत्राचा उपयोग करतात. माझ्या व्यक्तिमत्वाचे परीक्षण पारदर्शकपणे आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने या कवितेद्वारा केले आहे. 

माझ्या लिखाणा कडे बारकाईने बघितल्यास, माणसांचे व्यक्तिमत्व कसे घडत जाते याचा उलगडा यातून होतो. माझे लिखाण केवळ भूतकाळातील रम्य आठवणी नसून तो इतिहासाचाही भाग आहे.  बखरकारांनी आणि इतिहासकारांनी इतिहास लिहिण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत ! माझे लिखाण, पुढे,  विकिपीडिया, गुगल, चॅट जीपीटी वर उपलब्ध होणार असून ते इतिहासाचा भाग बनणार आहे!

कामनिमित्त मंत्रालयात जायचो तेंव्हा काही माणसे मला तेथे भेटाली. पाठीचा कणा सरळ रेषेत ठेवून, मंत्रालयाच्या कॉरिडोर मधून, ताठ मानेने चालणारी ही माणसे फक्त बुद्धिमानच नाही तर संघर्षशील आणि चारित्र्य संपन्न होती. अशी काही माणसे, मी महाविद्यालयात शिकत असतांना पाहिली होती. 

नंतर अशी माणसे मला पुन्हा भेटली. 

चांगदेव यात्रेत आणि ओंकारेश्वर मंदिरात भेटली.

भाऊच्या उद्यानात आणि शिवार गार्डन चौकात भेटली. 

वेस्ट एंड मॉल आणी आयनॉक्स थिएटर मधे भेटली. 

हॉटेल सोफीटेल आणि व्हिसा सेंटरवर भेटली.

येवले चहा आणि राम हेअर सलून मधे भेटली.

कंपनीत काम करतांना आणि शेतावर राबतांना भेटली.

रुबी हॉस्पिटल आणि मातोश्री वृद्धाश्रमात भेटली.

गड आणि किल्ल्यांवर भेटली.

काही देहरूपात प्रत्यक्षपणे तर काही विदेही स्वरूपात अप्रत्यक्षपणे!

चारित्र्य संपन्न होण्या करिता तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या वनातच नाही तर घरात बसून आणि कार्यालयात काम करतांनाही करता येते.

माणसाचा जन्मच मुळी संघर्षातून झालेला आहे. तेंव्हा त्याने संघर्षशील असणे स्वाभाविक आहे. पण तो जेंव्हा उच्चतम ध्येय ठेवून, मूल्यांची जपणूक करित ते गाठण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे व्यक्तिमत्व झळाळून निघते. 

संघर्षशील आणि चारित्र्य संपन्न व्यक्तींना जेंव्हा प्रार्थनेचे बाळ मिळते तेंव्हा त्यांच्या भोवती एक आभा निर्माण होते. ते जेंव्हा बैठकी करिता सभागृहात प्रवेश करीत असतात त्यापूर्वीच त्यांचीं आभा तेथे पोहोचलेली असते आणि वातावरण चैतन्याने भरून गेलले असते. त्यांच्या आगमनाने काही क्षण स्तब्धता निर्माण होते आणि नंतर सर्वजण आश्वस्त होतात. सर्वांचे डोळे त्यांच्याकडे रोखले जातात आणि त्यांचा प्रत्येक शब्द कानात प्राण आणुन ऐकला जातो!

अशा व्यक्तींविषयी, त्यांच्या संबंधातील घटनांविषयी आणि माझ्या अनुभवांविषयी (Reflection / Insight) मी लिहायला पाहिजे असे मला त्रिव्रतेने वाटले. शिक्षक कधी निवृत्त होत नाही अणि चांगुलपणाचा प्रसार करणे हा त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे असे मी समजतो. म्हणून लिहतो. अंतः प्रेरणेने लिहतो!

ता. क. ज्यांना सत्य समजले आहे ते बोलत नाहीत. मौनातून ते आपल्या शिष्यांशी संवाद साधतात आणि शिष्यांना त्याचे आकलन होते.

मला अद्याप सत्य समजले नसल्याने मी बोलतो, खुप बोलतो आणि अलीकडे लिहतो सुद्धा!

No comments:

Post a Comment

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...