स्पंदन ९
शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव
शासकिय तंत्र निकेतन, जळगांवला संस्थेच्या स्थापनेपासून (१९६०) आजपर्यंत संस्थेच्या विकासाकरिता आणि विद्यार्थ्यांच्या प्रगती करिता वाहून घेतलेले प्राचार्य आणि प्राध्यापक लाभले. संस्थेचे पहिले प्राचार्य, जोगळेकर सर, यांचेविषयी त्यांच्या शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष शैलीमुळे, सर्वांच्या मनात भीतीयुक्त आदर होता. त्या वेळी जिल्हाधिकारी आणि शासकिय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांना कर्मचारी नेमण्याचे अधिकार होते. प्राचार्य जोगळेकर सरांना, रात्री राउंड घेतांना, वॉचमन झोपलेला आढळल्यास, ते त्याची बॅटरी व काठी उचलून आणायचे. दुसऱ्या दिवशी ती मागायची हिंमत वॉचमनला होत नसे! त्यांच्या हातून लावलेले कॅशिया वृक्ष आजही संस्थेच्या परिसरात डौलाने उभे आहेत.
याच समर्प्रीत वृत्तीचे प्राचार्य व प्राध्यापक संस्थेला पुढेही लाभले. तंत्रनिकेतनात रुजू होण्यापूर्वी, प्रा मुळे रिझर्व बँकेत, व काही काळ परदेशात अभियंता म्हणून कार्यरत होते, प्रा गाजरे नागार्जून सागर धरणावर अभियंता म्हणून तर प्रा अग्निहोत्री सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवचा विद्यार्थ्यांना फायदा झाला. ते विद्यार्थ्यांची अपुलकीने विचारपूस करून, त्यांना मार्गदर्शन करायचे. ‘स्टूडंट एड फंड’ समिती द्वारा व वैयक्तिक रित्याही अनेक गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करायचे.
संस्थेचा परिसर व हॉस्टेल मधील विद्यार्थ्यांचे पालकत्व प्रा बी जी भंडारकर सरांनी दीर्घ काळ सांभाळले. ते उत्तम शिक्षक, त्याच बरोबर उत्तम प्रशाशक होते. पुढे त्यांनी स्वेछा निवृत्ती घेतली. अनेक इंजीनियरिंग कॉलेजेस, पॉलिटेक्निक्स आणि मेडिकल कॉलेजेसच्या उभरणीत त्यांचा मोलाचा वाटा आहें. श्री डी वाय पाटील संस्थेमार्फत नेपाळ येथे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे ठरले तेंव्हा यासंबधातील महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. सध्या ते अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठात मानद सचिव म्हणुन कार्यरत आहेत.
प्राचार्य आर डी वायकोळे यांनी विद्यार्थ्यांकरिता संस्थेत विविध प्रकारचे उपक्रम राबविले. ते रोटरी क्लबचे मेंबर होते. रोटरी क्लबच्या सौज्यान्याने त्यांनी अनेक उद्योग व्यवसायिकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्या करिता, संस्थेत आमंत्रित केले.
शहराच्या बाहेर, नॅशनल हायवे क्रमांक ६ ला लागून असलेली शासकीय तंत्रनिकेतनची इमारत सर्वांना दिसायची, परंतु आत मधे ६० एकरचा एव्हडा सुंदर परिसर आहे याची अनेकांना कल्पना यायची नाही. मंत्री असतांना, मा. अरुणभाई गुजराथी कार्यक्रमा निमित्त संस्थेत आले तेंव्हा त्यांनी या गोष्टीचा उल्लेख आपल्या भाषणातून केला होता.
त्यांनंतर विविध कार्यक्रमा निमित्त सामाजिक, राजकिय व उदयोग क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक नामांकित लोक, उच्च पदांवर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी, कार्यक्रमा निमित्त संस्थेत आले.
शासकीय तंत्रनिकेतन आणि जैन उद्योग समुहाचे, त्याच्या स्थापनेपासूनचे दृढ संबंध राहिले. जैन उद्योग समूहाचे प्रमुख, मा. भंवरलाल जैन हे उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन करण्या करिता संस्थेत आले, तेंव्हा त्यांची शाइनिंग येलो कलरची MJL 1 क्रमांकाची मर्सिडीझ कार अनेकांना बघयाला मिळाली. त्यांनी, यशस्वी उद्योजक कसे बनावे यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “तुम्हाला माझ्यासारखे मर्सिडीज मधून फिरायचे असेल, तर उद्योजक बना!” असे विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांचे भाषण अतिशय प्रेरणादायी व विद्यार्थ्यांच्या मनात उद्योगशीलतेची चेतना निर्माण करणारे होते.
१९९२ मधे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर, केमिकल टेक्नोलॉजी शाखेच्या केमिस्ट्री विषयाची प्रात्यक्षिके संस्थेत घेतली जायची. प्राचार्य वायकोळे सर विद्यापीठाच्या विविध समित्यांवर कार्यरत होते.
१९९८ मधे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरवात शासकीय तंत्रनिकेतनातून झाली. प्राचार्य एम एस महाजन सरांकडे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचाही कार्यभार होता. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उपयोगा करिता, त्यांनी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून तातडीने दोन्ही ड्रॉइंग हॉल वर दोन मजले व एका शेडचे बांधकाम करून घेतले.
गुणवत्तेच्या बाबतीत शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव नेहमीच अग्रेसर राहिले. अनेक विद्यार्थी महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. उच्च शिक्षणास जाण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाणही लक्षणिय आहे. येथील अनेक विद्यार्थी देशात व परदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत.
माझ्या पत्नी, सौ. लता जगताप-इंगळे या शासकीय तंत्रनिकेतन, जळगांवच्या, १९८१ बॅचच्या विद्यार्थीनी. त्यानंतर त्या नगर रचना विभागात प्लानिंग असिस्टंट म्हणून रुजू झाल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून त्यांची नगर रचनाकार पदावर निवड झाली. त्यांनी बी ई सिविल केले. जळगांव, धुळे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी विविध पदांवर त्या कार्यरत होत्या. निवृत्तीनंतर अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो.
माझा मुलगा हर्षवर्धन याने, येथूनच Diploma in IT केले. पुढे मॉडर्न कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे येथून B E केले. प्रथम क्रमांकाबरोबरच, मॉडर्न कॉलेजचा, तो Best Outgoing Student होता. नंतर त्याने University of Texas, Dallas येथून Master of Computer Science केले. तो सध्या USA मधे सॉफ्टवेयर इंजीनियर म्हणून कार्यरत आहे.
ज्या संस्थेत मी शिकलो, त्याच संस्थेत अधिव्याखाता, विभाग प्रमुख व प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली हा माझ्या करिता गौरवाचा क्षण आहे!
१९८५ मधे, संस्थेने रौप्य महोत्सव साजरा केला. महाविद्यालयीन जीवनावरील, प्रा. मधुकर तोरडमल लिखित, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे लोकप्रिय मराठी नाटक, १९७७ मधे, स्नेहसंमेलनात सादर करण्यात आले होते; त्यातील एक प्रयोग त्याच कलाकारांनी तेव्हड्याच उत्साहने या प्रसंगी सादर केला. या कार्यक्रमास संस्थेचा माजी विद्यार्थी आणि गिरणांजनी तंत्रनिकेतन, एरोंडोलचा प्राचार्य म्हणून मी उपस्थित होतो.
येथें मला चांगले मित्र मिळाले. शासकीय निमशासकीय नोकरीत तसेच नामांकित कंपन्यांमधे कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. काही उद्योजक बनले, काही समाजसेवक तर काहींनी आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती केली. नोकरी सांभाळून व त्यानंतरही स्तंभ लिखाण, फोटोग्राफी हे छंद अनेकजण जोपासत आहेत. आम्ही शासकीय तंत्रनिकेतन हे ‘स्थळ’ आणि ७६-७९ हा ‘काळ’; अशा स्थळ-काळाने गुंफलेल्या प्रेमळ धाग्यात, ‘G P Jalgaon 76-79‘ या व्हॉट्सअप ग्रुप द्वारा बांधले गेलो आहोत!
येथील शिस्त, तळमळीने आणि कळकळीने शिकविणारे शिक्षक; खोलात जाऊन विषय समजून घेण्याची व कठोर परिश्रम करायची लागलेली सवय यामुळे अभियांत्रिकीतील यशाचा पाया मजबूत झाला.
शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव या संस्थेचे कधीही न फिटणारे ऋण माझ्यावर आहेत !
No comments:
Post a Comment