Monday, June 2, 2025

४२. माझे सांगाती: प्रा के पी वानखेडे

 ४२. माझे सांगाती: प्रा के पी वानखेडे

प्रा के पी वानखेडे, १९८५ मधे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे येथून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर, आपल्या गावी एरंडोलला (जळगाव जिल्हा) आले असता सहज म्हणून त्यांच्या घराजवळ असलेल्या गिरणांजनी तंत्रनिकेतनात आले. मला भेटले. मी त्यांना अधिव्याखाता म्हणून संस्थेत जॉइन व्ह्यायची सूचना केली. दुसऱ्या दिवसापासून ते अधिव्याखाता म्हणून संस्थेत रुजू झाले आणि विद्यार्थ्यांमधे रमून गेले. अनेक क्षेत्रात संधी असतांनाही ते तिकडे गेले नाहीत.  

आम्ही, शासकीय तंत्रनिकेतनात, उपयोजित यंत्र शास्त्र विभागात, अधिव्याखाता म्हणून, १९८९ मधे सोबत रुजू झालो. निवृत्त होइपर्यंत सोबतच होतो. आपल्या कामात आनंद घेवून, त्यात ते एव्हढे समरस झाले होते की चाळीस वर्षे कशी गेली भुरर्कन निघून गेली हे त्यांनाही समजले नाही आणि मलाही!

अतिशय शांत व संयमी वृत्तीचे प्रा वानखेडे, सर्वांना मदत करायचे. विद्यार्थ्यांना तर ते  घडवत होतेच. पण संस्थेत नव्याने रुजू झालेल्या नवीन प्राध्यापकांनाही ते लहान सहान गोष्टीत मार्गदर्शन करायचे. नवीन प्राध्यापकांकडे, परीक्षा प्रमुख, प्रवेश समिती प्रमुख, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, DBT, जात पडताळणी प्रकरणे, भांडार पडताळणी, Engineering Admission Facilitation Center, CET Examination, स्नेहसंमेलन, खेळांच्या स्पर्धा अशा जबाबदऱ्या सोपवल्या जायच्या तेंव्हा प्रा वानखेडे यांचा भक्कम आधार त्यांच्या पाठीशी असायचा. 

शैक्षणिक कार्याव्यतिरिक्त इतर अनेक कामात ते सर्वांना मदत करायचे. बऱ्याचदा ती वैयकत्तीक  स्वरूपाची असायची. संस्थेतील कर्मचारी त्यांच्यावर मनापासून प्रेम करायचे त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या कामास कोणी नाही म्हणायचे नाही. अनेक जणांचे ते पालक होते.   

मी विभाग प्रमुख असतांना आणि प्राचार्य म्हणून कार्यरत असतांना, Applied Mechanics Department(उपयोजित यंत्र शास्त्र विभाग) ची संपूर्ण जबाबदारी ते सांभाळायचे. विभागात शैक्षणिक कार्यक्रमा व्यतिरिक्त विविध उपक्रम सुरू असायचे. संस्थेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त टेस्टिंग आणि कन्सल्टंसी सर्विसेस निमित्त बाहेरच्या व्यक्तींचे येणे जाणे सुरू असायचे. त्याकरिता कार्यालयीन वेळेनंतर व सुटीच्या दिवशीही विभाग उघडा असायचा. काही वेळेस शैक्षणिक कामातील व्यस्तते मुळे टेस्टिंगचे काम स्वीकारणे शक्य व्हायचे नाही तेंव्हा त्यास  नकार दिल्यास परिचयच्या व्यक्तींकडून, काही वेळेस मंत्री महोदयांचा ‘प्रेमळ’ दबाव यायचा. ही सर्व परिस्थिती प्रा वानखेडे कौशल्यपूर्णरित्या हाताळायचे.

Universal Testing Machine (UTM) हे Applied Mechanics विभागातील सर्वात महत्वाचे मशीन! त्याच्या नावातच ‘सर्व काही’ आहे. साधारणतः २० लाख रुपये किमतीचे हे मशीन. यावर टेंशन, कॉमप्रेशन, बेंडीग, शिअर अशा सर्व महत्वाच्या टेस्ट व्हायच्या. ३२ mm लोखंडी बार जेंव्हा ताण देवून, या मशीन वर तोडला जायचा तेंव्हा इमारत हादरायची आणि प्रचंड आवाज व्हायचा.  विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांत या टेस्ट असायच्या. त्याच बरोबर बांधकाम कंत्राटदार, उद्योग व्यावसायिक यांना मटेरियल टेस्टिंगचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याने, त्यांच्याकरिता या टेस्ट करून, त्याचे प्रमाणपत्र दिले जायचे.

World Bank Assisted Project अंतर्गत १०० टन कपॅसिटीचे डिजिटल UTM विकत घेण्यात आले. ५००० किलो वजनाचे हे अवाढव्य मशीन प्रयोग शाळेत आणून तेथे व्यवस्थित बसविणे हे आव्हानात्मक काम होते. प्रयोग शाळेची भिंत फोडून ते आत आणावे लागणार होते. त्याकरिता आम्ही याच विभागात पूर्वी कार्यरत असलेले व नंतर स्वतंत्ररित्या व्यवसाय करणारे प्रा व्ही आर जोशी यांना हा कॉंट्रॅक्ट दिला. 

मशीन सोबत आलेल्या मॅनुअल नुसार मशीन करिता फाऊंडेशन तयार करणे, मशीन प्रयोग शाळेत आणणे, आणि ते योग्य पद्धतीने इंस्टॉल करणे अशा तीन टप्प्यात हे काम करायचे होते.

फाऊंडेशन तयार झाले. मशीन आत आणले गेले. फाऊंडेशन मधून वर आलेल्या अँकर बोल्ट वर मशीन बसवायचे होते. त्याकरिता ५००० किलो वजनाचे हे मशीन उचलून योग्य स्थितीत आणायचे होते. प्रयोग शाळेतील किंग पोस्ट ट्रस छताच्या अॅंगल्सनां मजबूत दोर बांधण्यात आले होते, त्याद्वारे, मिस्त्री व मजूर, हळू हळू दोर ताणून मशीन वर उचलत होते. मशीन वर उचलले गेले.  

...आणि अचानक कर कर आवाज आला. “जोशी सर!”, कोणीतरी जीवाच्या आकांताने ओरडले. सगळ्यांचे श्वास रोखले गेले...दोर स्लिप झाला होता... मशीन एका बाजूला झुकले होते...जोशी सर ज्या ठिकाणी उभे होते तेथे ते पडणार, तेव्हाडयात भोळे दादा आणि कडू महाजन धावत जाऊन दोरांना लटकले. किंचाळी ऐकून जोशी सर बाजूला झाले होते.  मशीन खाली यायचे थांबले होते. सगळ्यांनी उसासे सोडले! दसऱ्याच्या आदल्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी, शस्त्र पूजन निमित्ताने, UTM ची मनोभावे पूजा केली जाते.  

असे सहकारी मित्र, मी त्यांना सांगाती म्हणतो, मला लाभले, म्हणून माझा कार्यकाळ अगदी आनंदात गेला!

No comments:

Post a Comment

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...