शासकीय सेवेत सन्मानाने जगा !
माझ्या लेखनाला आपल्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. यात केवळ कौतुक नाही तर एक आत्मीयता आहे जी माझ्या अंतरंगाला स्पर्शून नवीन स्पंदने निर्माण करते.
मागील ब्लॉगमध्ये मी ‘शासकीय सेवेत सन्मानाने जगा!’ या नव्या पुस्तक लेखनाचा संकल्प जाहीर केला होता आणि त्यामागची पार्श्वभूमीही उलगडली होती. गुरु पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर माझ्या सर्व गुरुजनांना वंदन करून, या पुस्तकाच्या लेखनास औपचारिक सुरुवात केली आहे.
या ग्रंथाच्या माध्यमातून मी शासकीय सेवेतील संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ आणि लोकाभिमुख अधिकार्यांच्या प्रेरणादायी वाटचालीचे दर्शन घडविणार आहे. विविध घटना, प्रसंग आणि व्यक्तिमत्त्वांच्या उदाहरणांतून प्रशासनातील अनेक पैलू आपोआपच उलगडले जातील. कामानिमित्त माझा संबंध आला आणि ज्यांची कार्यशैली मला जवळून बघता आली अशा अनेक कर्तव्यदक्ष अधिकार्यांबद्दल मी लिहणार आहे. साधेपणाच्या तेजाने झळकणारे, प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी मा. सीताराम कुंटे; एखादा प्रकल्प हातात घेतल्यावर देहभान विसरून त्यात स्वतःला झोकून देणारे, प्रतिभाशाली व कलावंत मनाचे मा. मनुकूमार श्रीवास्तव; दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल उत्पादनात लक्षणियरीत्या वाढ करण्यात योगदान देणारे पहिले Inspector General of Registration (IGR) मा. नितीन करीर यांच्याबद्दल लिहणार आहे. या अधिकार्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव पद भूषविले. सेवा संस्काराचा वारसा लाभलेले, निःस्पृहतेने काम करणारे मा. भूषण गगरणी; अत्यंत अभ्यासू आणि कर्तव्यतत्पर अधिकारी मा. प्रविण परदेशी यांच्याबद्दल लिहणार आहे. शासकीय तंत्रनिकेतनात विविध ठिकाणी कार्यरत राहिलेले, अभ्यासू व स्वाभिमानी व्यक्तिमत्वाचे प्राचार्य डॉ एन टी खोब्रागडे; सहसंचालक पदावर कार्यरत राहिलेले, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम केलेले प्राचार्य मा डी पी नाठे; सहकाऱ्यांना विश्वासात घेवून निर्णय घेणारे व तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत राहिलेले प्राचार्य एम एस महाजन यांच्याविषयी लिहणार आहे.
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 'कार्य संस्कृती अभियान' आणि 'पगारात भागवा' हे प्रकल्प राबवितांना जीवाचे रान करून, पायला भिंगरी लाऊन वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत महाराष्ट्रभर दौरे करणाऱ्या, शेवटच्या श्वासपर्यंत अधिकाऱ्यांच्या कल्याणा करिता झटणाऱ्या राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस राहिलेल्या मा. ग दि कुलथे यांच्या बद्दल लिहणे ही माझ्या कडून त्यांना विनम्र आदरांजली ठरेल.
संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि लोकभिमुखता केंद्रस्थानी ठेवून जेव्हा प्रशासन चालते तेव्हा लोक कल्याणाचे दरवाजे उघडले जातात. शासकीय सेवेत सन्मानाने जगणारे अधिकारी हे समाजाच्या आशा आकांक्षांची पुर्ती करणारी शक्ती असतात. अशा अधिकार्यांच्या कार्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाला झळाळी प्राप्त होते. एक उच्च दर्जाचे मूल्याधिष्ठित आयुष्य त्यांच्या वाट्याला येते. इतिहासात त्यांच्या कार्य कर्तृत्वाची नोंद होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी ते दीपस्तंभ ठरतात.
या सर्व प्रेरक व्यक्तिमत्वांकडून मला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या अनुभवांनी माझ्या विचारांना दिशा दिली. त्या सर्वांप्रती कृतज्ञता भाव ठेवून मी हे लिहणार आहे.
No comments:
Post a Comment