अभियंता भवन!
आज, जळगांव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीच्या, ‘अभियंता भवन’ या नवीन वास्तूला, माझ्या पत्नी इंजि. सौ. लता इंगळे यांच्या सोबतीने भेट देण्याचा योग आला.
वास्तूत प्रवेश करताच, आम्हा सर्वांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व, महान अभियंता भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा, नाजूक कलाकृतीच्या पेडस्टल वरील सुंदर अर्धाकृती पुतळा, त्यामागील धरणाच्या प्रतिकृतीतून बाहेर पडून वाहत येणारा जलप्रवाह व त्यातील नयनरम्य रोषणाई बघून मन प्रसन्न झाले.
यानिमित्त येथील वाचन कट्टा, वाचनालय, विविध कक्ष, थोर विभूतींच्या प्रतिमा, जळगांव जिल्ह्यातील जलसंधारण विभागांतर्गत असलेल्या विविध प्रकल्पांच्या, धार्मिक स्थळांच्या तसेच महाराष्ट्रातील पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या स्थळांच्या डिजिटल स्वरूपातील आकर्षक चित्राकृती बघून आनंद झाला.
आमचे मित्र, निवृत्त अभियंता आणि संस्थापक चेअरमन इंजि. साहेबराव पाटील यांच्या कल्पकतेतून आणि अथक परिश्रमातून हा प्रकल्प साकार झाला आहे. येथे वाचन दिन, अभियंता दिन, जल संधारण विषयावर चर्चा, विविध प्रकारच्या औपचारिक आणि अनौपचारिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
यानिमित्त, पतपेढी द्वारा संचालित वाचनालयाला ‘अभियांत्रिकी स्पंदने’ हे पुस्तक मी भेट दिले.
पतपेढी द्वारा दर वर्षी, महान अभियंता भारतरत्न विश्वेश्वरैय्या यांच्या जयंती निमित्त, १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो. यात समजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्ती, आदर्श अधिकारी, सभासदांचे गुणवंत पाल्य यांचा गुणगौरव केला जातो. त्याबद्दल पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक कौतुक आणि त्यांच्या उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा!
No comments:
Post a Comment