प्रा के पी अकोले निवृत्त होतांना…
३३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि सन्माननीय शासकीय सेवेनंतर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेचे अधिव्यखाता तथा प्रभारी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले, प्रा. के. पी. अकोले सर, शासकिय तंत्रनिकेतन, जळगांव येथुन निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून त्यांनी संस्थेतील शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्यात उत्कृष्ट योगदान दिले. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता नवीन शैक्षणिक धोरणास (NEP) अनुसरून K -Curriculum अभ्यासक्रम तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
All India Council for Technical Education (AICTE) या संस्थेद्वारे तयार करण्यात येणाऱ्या Model Curriculum तयार करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ते सहलेखक असलेले Elements of Electrical and Electronics हे पुस्तक AICTE ने १८ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित केले. MSBTE अभ्यासक्रमांकरिता ५० पेक्षा अधिक, आणि SPPU, Pune; KBCNMU, Jalgaon; Shivaji University, Kolhapur; Uttarakhand Technical Board यांतील अभ्यासक्रमाकरिता अनेक पुस्तके त्यांनी लिहली आहेत. छत्तीसगढ राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन, दुर्ग येथे ते Department Advisory Committee वर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, बेळगांव येथून B E ( Electronics and Telecommunication) पदवी प्राप्त केल्यानंतर, १९८७ मधे जळगांव येथील SMIT तंत्रनिकेतनात ते अधिव्यखाता म्हणून रुजू झाले तेव्हा पासून ते परिचित ! मितभाषी, मृदू स्वभावाचे, सहकार्यास नेहमी पुढे असणारे, कठीण प्रसंगातही शांत आणि धैर्यशील असणारे व नेहमी हसतमुख राहणारे प्रा. अकोले आपल्या सहकाऱ्यांमध्ये अत्यंत प्रिय होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात ते नेहमीच अग्रेसर असायचे.
सुरवातीच्या काळात विना अनुदानित संस्थेत कार्यरत असल्याने आणि नंतर शासकीय तंत्रनिकेतनात अधिव्यखाता म्हणून मुंबई येथे नेमणूक झाल्याने, व तेथे, संचालयामध्ये आणि World Bank Assistted Project (WBAP) मधे काम करण्याची संधी मिळाल्याने, तसेच काही काळ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगांव येथे प्रति नियुक्तीवर असल्याने, त्यांचे Net Working अत्यंत प्रभावी झाले. त्याचा त्यांना आणि ते ज्या ठिकाणी कार्यरत राहिले त्या संस्थांना खुप फायदा झाला. सेवेत असतांना त्यांना NITTTR, Chandigarh येथून M E (Computer Science) हे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी मिळाली.
Canada India Institute- Industry Linking Project (CIIILP) या प्रकल्पात आम्ही सोबत काम केले. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. मनोहर पर्रिकर यांनी पणजी येथे आयोजित केलेल्या Show Case मधे त्यांचा सहभाग होता. तसेच MSBTE कडून Non-AICTE अभ्याक्रमांकरिता Norms and Standards तयार करण्याच्या प्रकल्पातही आम्ही सोबत होतो. या प्रकल्पांत उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना प्रशस्ती पत्रके देवून गौरविण्यात आले.
शासकीय तंत्रनिकेतन, नंदुरबार या संस्थेच्या प्राचार्य आणि आहरण व संवितरण अधिकारी पदाचा कार्यभारही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळला.
शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथे मी प्राचार्य म्हणून कार्यरत असतांना त्यांची मला प्रशासनात खूप मदत झाली. DBT प्रकल्प, विद्यार्थ्यांचे प्रवेश व त्याकरिता संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली, शाळा आणि मुख्याध्यापकांशी संपर्क करून राबविण्यात येणारा School Connect कार्यक्रम, शासकीय तंत्रनिकेतन, मुक्ताई नगर स्थापने संबंधी कामे, प्रकल्प अहवाल तयार करणे, विविध समित्या, ट्रेझरी संबंधातील कामे, Academic Monitoring, MSBTE सोबत Laisoning, NBA संबंधातील प्रशिक्षण, सार्वत्रिक निवडणुकांत Nodal Officer म्हणून काम करतांना संस्था आणि जिल्हा प्रशासनाशी समन्वय, कोविड कालावधीत वरिष्ठ कार्यालयांनी मागविलेल्या माहित्यांचे वेळेत संकलन या कामात त्यांची मला बहुमोल मदत झाली.
शासकीय तंत्रनिकेतन जळगांव या संस्थेशी त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यांच्या दोन्ही मुली आणि मुलाने या संस्थेतून पदविका प्राप्त करून पुढे उच्च शिक्षण घेतले.
कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडून, एक आदर्श शिक्षक म्हणून ते निवृत्त होत आहेत. शासकीय सेवेत ते सन्मानाने आणि निष्ठेने जीवन जगले. निवृत्ती नंतरच्या त्यांच्या आनंददायी आणि निरामय आयुष्या करिता मी प्रार्थना करतो!
प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, जळगांव @ ऑगस्ट ३०, २०२५
No comments:
Post a Comment