विनम्र अभिवादन- कवयित्री बहिणाबाईं !
आज २४ ऑगस्ट रोजी, रोटरी क्लब जळगांव आणि व. वा. जिल्हा वाचनालय जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने, कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती निमित्ताने, ‘रोटरी वाचन कट्टा’ या उपक्रमा अंतर्गत ‘बहिणाबाईंच्या कवितांचे वाचन’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन ‘अभियंता भवन’ येथे करण्यात आले होते.
रोटरी क्लब अध्यक्ष मा. रो. गिरीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात, ‘वाचन कट्टा’ या उपक्रमाबाबतची भूमिका विषद केली. अभियंता भवनात होणाऱ्या या कार्यक्रमात, प्रसंगाचे औचित्य साधून महान अभियंता भारतरत्न विश्वेश्वरय्या हे कसे महान लेखकही होते ते त्यांच्या आत्मचरित्राचा उल्लेख करून त्यांनी सांगितले.
मराठी साहित्यात बालसाहित्याचे लेखन करणाऱ्या भावकवयित्री, गीतकार, लेखिका आणि समीक्षक, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे अशा जेष्ठ कवयित्री सौ. माया धुप्पड यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचे वाचन, त्याच सोबत त्यांचे रसग्रहण अतिशय सुंदर रितीने केले; आणि त्यांच्या काही ओव्यांचे गायन केले. येणाऱ्या अभियंतादिनाच्या शुभेच्छा देवून भारत रत्न इंजि. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनातील ठळक वैशिष्टे सांगितले.
‘प्रतिमा’ या ललित लेख संग्रहाच्या, आणि ‘अस्मिता’ या काव्य संग्रहाच्या, लेखिका आणि कवयित्री सौ. पुष्पा साळवे यांनी बहिणाबाईंचा जीवनपट उलगडून दाखविला आणि बहिणाबाईंवर स्वरचित कविता प्रभावीरित्या सादर केली.
‘अभियांत्रिकी स्पंदने’ या पुस्तकाचे लेखक इंजि. प्रा. डॉ. महेंद्र इंगळे यांनी आपल्या मनोगतात,
‘शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बहिणाबाईंनी, आपल्या साध्या सोप्या बोलीभाषेत स्त्रियांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या; आणि जीवन संघर्ष्याच्या कहाण्या ऐकविल्या. आपल्या सूक्ष्म निरीक्षणातून आणि चिंतनातून, निसर्गाची रहस्ये उलगडून दाखविली; मानवी मनाच्या वर्तनावर भाष्य केले आणि अध्यात्मही सांगितले!
ज्या जीवन संघर्षाला त्या स्वतः धीराने सामोरे गेल्या तो त्यांनी आपल्या कवितेतून मांडला. आपला स्वानुभव त्यांनी अंतःप्रेरणेने शब्दबद्ध केला म्हणून त्याला चिरंतन स्वरूप प्राप्त झाले. त्यांची कविता आपल्या हृदयाच्या गाभ्यापर्यंत जाऊन पोहचते आणि म्हणूनच ती पुन्हा पुन्हा वाचाविशी आणि ऐकाविशी वाटते.
‘सरसोती’ला आपली माय मानून,
‘अरे,संसार संसार जसा तवा चुल्हयावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर’
या शब्दांतून जीवन संघर्षाचे सत्य त्या सहजरित्या मांडतात!
‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर’
यातून मानवी मनाच्या वर्तनावर समर्पक शब्दात भाष्य करतात !’, असे सांगितले.
कवयित्री ज्योती वाघ, संगीता महाजन, प्रिया सफळे, अर्चना पाटील, महिला अधीक्षिका प्राची पाटील, आणि पूर्वेश पाटील व योगेश पाटील या विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या कवितांचे वाचन केले.
या कार्यक्रमास रोटरी क्लबचे सचिव रो. सुभाष अंमळनेरकर, कार्यकारी सचिव रो. पंकज व्यवहारे, एनक्लेव चेअरमन रो. इंजि. जितेंद्र ढाके, व. वा. वाचनालयाच्या मानद सचिव रो. प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी, अभियंता पतपेढीचे चेअरमन इंजि. प्रमोद पाटील, व्हा. चेअरमन इंजि. चंद्रकांत तायडे, संचालिका इंजि. स्वाती नन्नवरे, संचालक इंजि. एस पी चव्हाण, इंजि. ब्रह्मानंद तायडे, इंजि. दिपक निकम, इंजि. सौ. लता इंगळे, रोटरी क्लब, व. वा. वाचनालय व अभियंता पतपेढीचे पदाधिकारी, जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल मा. सुहास रोकडे, परिवर्तनचे हर्षल पाटील, साहित्य क्षेत्रातील मान्यवर, अभियंते, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्यांनी बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या त्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके देवून सन्मान करण्यात आला.
संस्थापक चेअरमन तथा आजीव अध्यक्ष इंजि.साहेबराव पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment