कवयित्री बहिणाबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
२४ ऑगस्ट रोजी रोटरी क्लब जळगांव आणि व. वा. जिल्हा वाचनालय जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने, कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती निमित्ताने, ‘रोटरी वाचन कट्टा’ या उपक्रमा अंतर्गत ‘बहिणाबाईंच्या कवितांचे वाचन’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान महाबळ रोड वरील, ‘अभियंता भवन’ या ठिकाणी येथे आयोजित करण्यात आला आहे.
त्याबद्दल रोटरी क्लब, व वा वाचनालय आणि अभियंता पतपेढीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देवून त्यांचे अभिनंदनही करतो.
बहिणाबाई चौधरी जळगांव जिल्ह्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या अस्मिता!
औपचारिक शिक्षण न घेताही, आपल्या अनुभवांवर आधारित कवितांनी मराठी साहित्यात अमिट ठसा उमटविणाऱ्या बहिणाबाईंच्या नावाने जळगांव येथे ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ’ आहे हेच त्यांच्या प्रतिभेचे आणि लोकमान्यतेचे मोठेपण दर्शविते.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बहिणाबाईंनी, आपल्या साध्या सोप्या बोलीभाषेत स्त्रियांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या; आणि जीवन संघर्ष्याच्या कहाण्या ऐकविल्या. आपल्या सूक्ष्म निरीक्षणातून आणि चिंतनातून, निसर्गाची रहस्ये उलगडून दाखविली; मानवी मनाच्या वैशिष्ट्यावर भाष्य केले आणि अध्यात्मही सांगितले!
ज्या जीवन संघर्षाला त्या स्वतः धीराने सामोरे गेल्या तो त्यांनी आपल्या कवितेतून मांडला, म्हणूनच त्यांची कविता आपल्या हृदयाच्या गाभ्यापर्यंत जाऊन पोहचते. आणि म्हणूनच त्यांच्या कविता या पुन्हा पुन्हा वाचाव्याशा आणि ऐकव्याशा वाटतात.
त्या जेव्हा, ‘सरसोती’ला आपली माय मानून,
‘अरे,संसार संसार जसा तवा चुल्हयावर
आधी हाताला चटके तेव्हां मिळते भाकर’
हे सांगतात तेव्हा जीवन संघर्षाचे किती मोठे सत्य त्या सहजपणे मांडतात !
‘मन वढाय वढाय,
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला,
फिरी येतं पिकांवर’
यातून मानवी मनाच्या वर्तनावर किती समर्पक शब्दात भाष्य केले आहे !
अशा अनेक निवडक कवितांचे वाचन, जेष्ठ कवियित्री सौ. माया धुप्पड आणि सौ. पुष्पा साळवे या प्रभावीपणे करणार आहेत. त्यांच्या वाचनातून बहिणाबाईंच्या शब्दांचे स्पंदन पुन्हा एकदा आपल्या मनात घुमेल!
या कार्यक्रमास उपस्थित राहून, बहिणाबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्याची संधी आपण अवश्य घ्यावी अशी मी आपणास विनंती करतो.
प्रा. डॉ. महेंद्र इंगळे @ ऑगस्ट २१, २०२५
No comments:
Post a Comment