Sunday, September 29, 2024

Training Program for Bafana Jewellers

 


*बाफना ज्वेलर्स कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम...*

पूर्वी मी शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथे प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी, केंद्र शासनाच्या सामूहिक तंत्रनिकेतन प्रकल्पाचा प्रमुख तसेच ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, न्यू दिल्ली अंतर्गत असलेल्या आंत्रप्रिनरशिप मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट सेंटरचा प्रमुख म्हणूनही मी कार्यरत होतो. त्या अंतर्गत विविध उद्योग समूहांकरिता, संस्थांकरिता, प्रशिक्षणार्थींकरिता उद्योजकता, व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण विकास अशा विविध विषयांशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करित होतो. त्याकरिता आम्ही एक टीम तयार केलेली होती. मी स्वतः, प्रा. आर. एम. नाफडे, प्रा. एम. बी. सानप, प्रा. एस. एन. जुमडे, प्रा. जयंत नांदेडकर (दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत) अशी आमची एक टीम होती‌.

या संबंधात नामांकित संस्थांमध्ये आमचे प्रशिक्षण झालेले होते. माणसांमधे निश्चित व स्थायी स्वरूपाचा बदल घडवून आणायचा असेल तर तो  केवळ प्रशिक्षणानेच घडवून आणता येतो. व्याख्यानाने, प्रवचनाने, कथा आणि कीर्तनाने माणसे बदलण्याची शक्यता फार कमी असते. संस्थांच्या गरजेनुसार आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम डिझाईन करीत होतो.

मा. प्रतिभाताई पाटील यांच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी बांभोरी, जळगांव या संस्थेकरिता ते एन बी ए ॲक्रेडिटेशन करिता जात असतांना तेथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

नूतन मराठा संस्थेचे व्यवस्थापन प्रतिनिधी श्री. शिवाजीराव भोईटे यांच्या विनंतीनुसार संस्थेत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील सर्व हायस्कूलच्या मुख्याध्यापकांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी संस्थांच्या प्राध्यापकांकरिता 'इन्स्टिट्यूशनल मॅनेजमेंट' या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

सुवर्णनगरी व आता स्वर्ण तीर्थ म्हणून ओळख असलेल्या जळगाव येथील रतनलाल सी. बाफना यांच्या 'बाफना ज्वेलर्स' या प्रसिद्ध  फर्मच्या कर्मचाऱ्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी मी आज लिहीत आहे.

सोन्या-चांदीच्या व्यवसायातील स्पर्धेमुळे बाफना ज्वेलर्स या फर्म मधील कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण वाढलेले होते.

आमच्या कर्मचाऱ्यांकरिता आपण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावा व आमचा प्रश्न सोडवावा असा प्रस्ताव मा. रतनलालजी बाफना यांनी आमच्याकडे दिला. त्यानुसार आम्ही तीस कर्मचाऱ्यांकरिता एक ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केला.

ठिकाण: नयनतारा गेस्ट हाऊस

वेळ: रोज सकाळी ६ ते ९.३०

प्रशिक्षणाचा पहिला दिवस: 

आम्ही सर्व प्रशिक्षक पावणेसहा वाजता माईक टेस्टिंग वगैरे करून एलसीडी प्रोजेक्टर ऑन करून पूर्णपणे तयारीत होतो. ठीक सहा वाजता प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला. जसजसे प्रशिक्षणार्थी  हॉलमध्ये येत होते तसतसे आम्ही हसतमुखाने त्यांचे स्वागत करीत होतो. प्रशिक्षण वेळेवर सुरू होणार नाही हा बऱ्याच प्रशिक्षणार्थींचा अंदाज खोटा ठरला. सर्वात प्रथम आम्ही आमचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रशिक्षणार्थींचा परिचय करून घेतला व पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. आठ वाजता  टी ब्रेक झाला. त्यामध्ये प्रा. सानप सर्व कर्मचाऱ्यांना प्रथम नावाने संबोधित करून भेटत होते. हे सर्व बघून कर्मचारी आश्चर्यचकित झाले. आमच्यापैकी दोघेजण सर्व कर्मचाऱ्यांचे ऑब्झर्वेशन करीत होते. कुठला कर्मचारी आक्रमक आहे, अनावश्यक प्रश्न विचारणार आहे, त्रुटी काढणार आहे याचा आम्हाला आधीच अंदाज येतो.

टी ब्रेक नंतर दुसरे सेशन संपन्न झाले. अर्थातच ते फार प्रभावी झाले.

दुसऱ्या दिवसापासून श्री. सुशील बाफना (पप्पू शेठ) प्रशिक्षण कार्यक्रमात पूर्ण वेळ उपस्थित राहत होते. तशी त्यांना आम्ही पूर्वीच सूचना केलेली होती.

दुसऱ्याच दिवसापासून सर्वजण अगदी उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेऊ लागले आणि त्यात पूर्णपणे समरस झाले. त्यांच्यात आणि आमच्यात एक अतुट नाते निर्माण झाले आहे याची त्यांना जाणीव व्हायला लागली.या प्रशिक्षण कार्यक्रमात कर्मचाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणा व संस्थेविषयी बांधिलकी (Organizational Commitment) हे दोन गुण विकसित करावेत असे आम्ही ठरविले होते. त्याकरिता सेल्फ एक्स्प्लोरेशन टेक्निकचा आम्ही उपयोग केला. म्हणजे प्रशिक्षणार्थीने स्वतः व्यासपीठावर येऊन त्यास प्रामाणिकपणाबद्दल काय वाटते हे स्वतःच्या शब्दात सांगायचे. त्यानंतर त्यास आम्ही काही प्रश्न विचारतो. त्या प्रश्नांची उत्तर द्यायला प्रशिक्षणार्थीने सुरुवात केल्यावर प्रामाणिकपणा हा गुण त्याच्यामध्ये विकसित होण्याची प्रक्रिया सुरू होते.

संस्थेबद्दल बांधिलकी हा गुण निर्माण करायचा होता तेव्हा कर्मचाऱ्यास व्यासपीठावर बोलवून आम्ही त्याला संस्थेत काम करत असतांना तुमच्या आयुष्यातील सर्वात सुखाचे व दुःखाचे क्षण कोणते असा एक प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देतांना काही कर्मचारी अक्षरशः रडत होते. या प्रश्नाचे उत्तर देत असतांना  प्रशिक्षणार्थीत संस्थेविषयी बांधिलकी निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते.

प्रशिक्षण कार्यक्रमात आम्ही प्रात्यक्षिकांसह वेगवेगळे सेशन्स कंडक्ट केलेत. प्रा. नाफडे यांनी Delighted Customer (आनंदी ग्राहक) ही संकल्पना स्पष्ट करून सांगितली. प्रा. नांदेडकर यांनी स्वप्रतिमा कशी विकसित करावी याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. जुमडे यांनी एकमेकांशी व ग्राहकांशी सुसंवाद कसा असावा यासंबंधी महत्त्वाच्या टिप्स दिल्या. प्रा. सानप यांनी सुवर्ण व्यवसायातील सध्याच्या समस्या, प्रतिस्पर्धी ओळखून व्यवसाय वृद्धी कशी करावी,  कर्मचाऱ्यांचे योगदान त्यात कसे महत्त्वाचे आहे याविषयीचे अभ्यासपूर्ण विवेचन केले.

शेवटी, लहानपणी पायाने अधू असलेल्या कार्ल लुईस या धावपटूने आपल्या व्यंगावर मात करून शंभर मीटर धावण्याच्या ऑलिंपिक स्पर्धेत नऊ वेळा सुवर्णपदके पटकावली व आपली स्वतःचीच रेकॉर्डस् अनेकदा मोडलीत ही प्रेरणादायी गोष्ट मी नाट्यमयरीतीने सांगतली तेव्हा श्रोते रोमांचित झालेत... टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला... 

हा अनुभव पुन्हा एकदा मी घेतला...

*प्रा. डॉ. महेंद्र इंगळे*

ओसाड माळरानावर नंदनवन फुलले

 


परवा शिशिर जैन भेटला. शिशिर श्रमसाधना ट्रस्ट द्वारा संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअर अँड टेक्नॉलॉजी, जळगांव या संस्थेचा १९८३ च्या पहिल्या बॅचचा माझा विद्यार्थी. आता मानस कन्स्ट्रक्शन या नावाने जळगांवात बांधकाम व्यवसायात आहे. सर, तुम्ही ॲप्लाईड मेकॅनिक्स तर उत्कृष्टरित्या शिकवित होताच; पण तुमच्या शिस्त आणि वर्तणूकी बद्दलच्या आग्रहाचा आम्हाला खूप फायदा झाला असे त्याने सांगितले. 

........पुणे विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट असलेले माझे मित्र प्रा. एल. पी. पाटील व मी वेगवेगळ्या डिव्हिजन्सला ॲप्लाइड  मेकॅनिक्स हा विषय अत्यंत आवडीने शिकवायचो. त्याकरिता प्रचंड मेहनत घ्यायचो. Beer and Johnston यांनी लिहिलेली व जगभरात वापरली जाणारी  मॅक्ग्रा हिल पब्लिकेशनची Engineering Mechanics ची Statics आणि Dynamics ही दोन पुस्तके आम्ही वापरायचो. अत्यंत नेटकेपणाने आणि काळजीपूर्वक छापलेल्या या पुस्तकांत कोणतीही प्रिंटिंग मिस्टेक नाही तसेच सर्व अनसॉल्व्हड प्रॉब्लेम्सची शेवटी दिलेली उत्तरे तंतोतंत बरोबर आहेत. या पुस्तकांतील जवळजवळ सर्व प्रॉब्लेम्स आम्ही सोडविले होते. डायनामिक्स या भागातील काही प्रॉब्लेम्स आम्हाला सोडविता येत नव्हते तेव्हा पुणे येथे जाऊन प्रा. बर्वे यांचे मार्गदर्शन घेतले होते.

पंचवीस वर्षानंतर माझी मुलगी पौर्णिमा हिने Vishwakarma Institute of Technology, Pune या संस्थेत शिकत असतांना माझ्याकडे असलेले हेच पुस्तक वापरले. या विषयात ती प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्यानंतर तिचे शिक्षक प्रा. तारापोरवाला यांनी तिला बोलवून तुला कोणाचे मार्गदर्शन लाभले याची विचारणा केली होती. आजही ही पुस्तके माझ्याकडे आहेत. 

पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अतिशय कठीण असलेला अप्लाईड मेकॅनिक्स हा विषय शिकवितांना मला व्यक्तिशः त्याचा खूप फायदा झाला. माझ्यातील अभ्यासू वृत्ती वृद्धिंगत झाली. या विषयाने मला ऐश्वर्य संपन्न केले. विद्यार्थ्यांमध्ये व सहकाऱ्यांमधे माझ्याविषयी आदर निर्माण केला. 

........ अप्लाईड मेकॅनिक्स या विषयाचे सत्र कर्म (Term Work) वेळेत पूर्ण न केल्यामुळे, प्राचार्य एम.जी. पाटील यांचा त्यास विरोध असतांनाही, मी चतुर्वेदी नावाच्या एका विद्यार्थ्याला डिटेंड (परीक्षेला बसण्याची परवानगी नसणे) केले. चतुर्वेदी हा दिल्ली येथील केंद्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुलगा होता. जळगांव येथील एक उद्योजक त्याचे स्थानीय पालक होते.

सदर प्रकरणाची मा. प्रतिभाताई पाटील यांनी फोन करून माहिती घेतली. चतुर्वेदी हा बेशिस्त विद्यार्थी आहे, त्याला वारंवार संधी देऊनही त्याने सत्र कर्म पूर्ण केले नाही. संस्थेच्या दीर्घकालीन हिताचा विचार करता व शिस्त टिकून राहावी याकरिता त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे असे मी त्यांना सांगितले. त्यावर ठीक आहे, योग्य तो निर्णय घ्या असे त्यांनी सांगितले होते. विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयात सत्र कर्म पूर्ण न केल्यामुळे डिटेंड झालेला हा बहुदा पहिलाच विद्यार्थ्या असावा.

..........१९८२ मधे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, मुंबई येथून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी प्राप्त केल्यानंतर मी काही काळ उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होतो.

महाराष्ट्र शासनाच्या एका क्रांतिकारी निर्णयाद्वारे, १९८३ मधे महाराष्ट्रात अनेक संस्थांना विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी मिळाली. श्रमसाधना ट्रस्ट या संस्थेस जळगांव येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू सुरू करण्याची परवानगी मिळाली. महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण खात्याच्या मंत्री  असलेल्या मा. प्रतिभाताई पाटील या संस्थेच्या अध्यक्ष होत्या.

प्राचार्य एम जी पाटील व अधिव्याख्याते..... लीलाधर पाटील, मनोज बेंद्रे, सुनील बढे, राजीव चौबे, प्रमोद बोरोले, सतीश महाजन, बोरसे, खंडेलवाल, श्रीमती वारके व मी असे सर्वजण आम्ही ८ऑगस्ट १९८३ रोजी एम जे कॉलेजच्या आवारात दाखल झालो. एम जे कॉलेजचे प्राचार्य डी एस नेमाडे यांचे कडून कॅन्टीन जवळ असलेल्या स्टुडन्ट रूमची चावी घेतली. स्टुडन्ट रूम मधे प्राचार्य व प्राध्यापक कक्ष, नंतर मिळालेल्या तिच्या शेजारच्या रूम मधे कार्यालय, एम जे कॉलेजच्या टाईम टेबल स्लॉटमध्ये रिकामी असतील ते क्लासरूम, प्रात्यक्षिके शासकीय तंत्रनिकेतन जळगांव येथे या पद्धतीने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ची सुरुवात झाली.

कॉलेज कामानिमित्त मुंबईला गेल्यावर आम्ही मा. प्रतिभाताई यांना मिळालेल्या सेवा सदन  बंगल्यात राहायचो. तिथे जळगाव जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते व अधिकारी भेटायचे. मी मुंबई येथील युनियन व‌ आयडियल बुक डेपो मधून मोठा डिस्काउंट घेऊन लायब्ररी करिता पुस्तके आणली.  सुनील बढे यांनी अकबर अली स्ट्रीट वरून वर्कशॉप व इतरत्र लागणारऱ्या टूल्सची खरेदी केली, राजीव चौबे यांनी फिजिक्स, केमिस्ट्री या विषयांकरता लागणारे प्रयोगशाळा साहित्य तर खंडेलवाल यांनी लुधियानावरून वर्कशॉप करिता लागणारी मशिनरी खरेदी केली. लीलाधर पाटील यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आवश्यक फर्निचर, स्टेशनरी खरेदी केली.  

कॉलेज कामकाजा संबंधीच्या आमच्या बैठका मा. प्रतिभाताईंच्या अध्यक्षतेखाली अजिंठा गेस्ट हाऊस, जळगांव येथे व्हायच्या. मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य असलेले ॲड. आबासाहेब डी एन पाटील, खासदार भाईसाहेब वाय एस महाजन, खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जी डी बेंडाळे, पत्रकार शंभू फडणविस,  अंधशाळा सांभाळणारे मामा वरियानी आवर्जून उपस्थित राहायचे. आम्ही प्राध्यापक मंडळी या बैठकांमध्ये नवीन नवीन कल्पना उत्साहाने मांडत असू. बऱ्याचदा बैठकांत वेगवेगळी मते मांडली जायची. मा. प्रतिभाताई ते सर्व शांतपणे ऐकून घेत असत.

पहिल्या सत्राचा रिझल्ट लागला. तो अतिशय कमी होता. रिझल्ट कमी लागल्यावर तातडीची बैठक बोलविण्यात आली. बैठकीत रिजल्ट कमी लागल्याबद्दलची कारणमीमांसा सुरू होती व याकरिता  प्राध्यापकांना जबाबदार धरण्यात येत होते. चर्चा सुरू असतांना एक सन्माननीय सदस्य We want result by hook or crook असे म्हटले. तेव्हा  त्यांच्या या म्हणण्याला मी स्पष्टपणे विरोध केला. पुणे विद्यापीठातील सर्वच विनाअनुदानित कॉलेजचा रिझल्ट कमी लागलेला आहे. आपल्याकडे कमी मेरिटचे विद्यार्थी आहेत. आम्ही प्राध्यापक मंडळी खूप मेहनत घेत आहोत व पुढेही घेऊ. कॉलेजच्या दीर्घकाळ हिताच्या दृष्टीने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्या आम्ही जरूर करू असे सांगितले. प्राध्यापकांचे शिकविणे आणि विद्यार्थ्यांचा रिझल्ट यांचा संबंध लावणे योग्य नाही हेही मी सांगितले.

....आता कॉलेज करिता जागा घेऊन, स्वतःची इमारत बांधण्याचे ठरविण्यात आले. त्याकरिता मुंबई येथील नामांकित आर्किटेक ची नेमणूक करण्यात आली. जळगावला लागून असलेल्या परिसरातील साधारणत: २० ते ३० एकर शासकीय जागा शोधण्याची जबाबदारी मी, प्रा. एल. पी.पाटील व जिल्हा परिषदचे डेप्युटी इंजिनिअर चौधरी साहेब यांच्यावर सोपविण्यात आली. त्याप्रमाणे आम्ही तीन जागा शोधल्या. एक नशिराबादच्या अलीकडे असलेली, दुसरी कुसुंब्या जवळ व तिसरी बांभोरी जवळ. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असलेले अख्तर अली काझी हे नशिराबाद जवळील त्यांच्या मतदारसंघास लागून असलेल्या जागेबद्दल आग्रही होते. परंतु आम्ही, भविष्याच्या दृष्टीने बांभोरी येथील जागा योग्य राहील असे आमचे मत मांडले. त्यानुसार बांभोरी येथील जागा घेण्याचे निश्चित झाले. जागा ताब्यात घेण्यासाठी एप्रिल मे महिन्याच्या कडक उन्हात मी,  एल पी पाटील व चौधरी साहेब यांनी मिळून प्लेन टेबल सर्वे केला. जागेची बॉण्ड्री निश्चित करून खुणा गाडल्या. कंटूर सर्वे करून नकाशे तयार केले व आर्किटेक्ट कडे सोपविले.

जागा ताब्यात घेण्याचे सर्व सोपस्कार पार पडल्यावर व ती ताब्यात घेतल्यावर भूमिपूजन करून त्वरित बांधकाम करण्याचे ठरले. त्यानुसार साईटवर भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रखरखीत उन्हात, बांभोरी जवळील, एकही झुडूप नसलेल्या या टेकडीवर एक  मंडप टाकण्यात आला. विधानसभेचे उपसभापती असलेले दाजीबा पर्वत पाटील या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मा. प्रतिभाताई पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष होत्या. भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मी केले. त्यावेळेस,  आजच्या या ओसाड टेकडीवर उद्या नंदनवन फुलणार आहे ही सदिच्छा व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला.

आज रोजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेचे मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरुन दिसणारे भव्य प्रवेशद्वार, त्यातील मुख्य इमारतीस लागून असलेल्या विविध विभागांच्या प्रशस्त इमारती, लायब्ररी, प्रयोगशाळा, वस्तीगृहे, मेस, कर्मचारी निवासस्थाने, अंतर्गत रस्ते, क्रीडांगण, झाडे, बगीचा, कारंजे  हे सर्व बघितल्यानंतर येथे खरोखरीच नंदनवन  फुललेले आहे आणि माझे शब्द खरे ठरले आहे याचा आनंद आहे.


Tuesday, September 24, 2024

फक्त आमचेच नसलेले बाबा-३

 


१९७० ते ८० च्या दशकात महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक, व आर्थिक परिस्थिती कशी होती याचे उत्तम चित्रण अरुण साधू यांनी आपल्या 'मुंबई दिनांक' व 'सिंहासन' या कादंबऱ्यांतून केलेले आहे. त्यांवर जब्बार पटेलांनी 'सिंहासन' नावाचा सिनेमा काढला. अरुण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा खूप गाजला. आजही तो आपल्याला खिळवून ठेवतो.

आर्थिक विषमता, वाढती महागाई, कामगारांचे संप, शेती व शेतमजुरांचे प्रश्न ,दुष्काळी परिस्थिती यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या; त्यांचा मुकाबला करणे हे एक आव्हान होते. मूलभूत गरजा भागविण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर बाबांनी सामाजिक व राजकीय कार्यात स्वतःला झोकून दिले होते.

हतनुर धरण प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाले होते. तापी ही मध्यप्रदेशातील बैतूल येथे उगम पाऊन, सातपुड्याच्या दक्षिणेकडून वाहणारी पश्चिम वाहिनी नदी; तिला चांगदेव येथे पूर्णा नदी येऊन मिळते. चांगदेव पासून पश्चिमेला आठ किलोमीटर अंतरावर हातनूर येथे, तापी नदीवर, १३.८ टीएमसी (१३,८०० दशलक्ष घनफूट)  जलसाठा करू शकणारा, हतनुर प्रकल्प हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा प्रकल्प होता. सिंचन, पाणीपुरवठा व वीजनिर्मिती ही प्रकल्पाची उद्दिष्टे होती.

धरणामुळे जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध होणार, आपला भाग सुजलाम सुफलाम होणार, समृद्धी येणार असे सांगितले जात होते. परंतु आपण राहतो ती घरे सोडून जावे लागणार. शेत जमिनी पाण्याखाली जाणार. चरितार्थाचे साधन नष्ट होणार ही भीती असल्याने गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. या संबंधात गावातील व परिसरातील लोकांमध्ये चर्चा व्हायच्या, बैठका व्हायच्या परंतु निश्चित स्वरूपाची माहिती मिळत नव्हती, नेमके काय करायला पाहिजे या संबंधात निर्णय होत नव्हता. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांच्या समस्या सुटाव्यात याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने व मोर्चे सुरू होते म्हणून बाबा आढावां कडून मार्गदर्शन घ्यावे असे ठरले. त्याप्रमाणे बाबा त्यांना भेटले. त्यांच्याकडून धरणग्रस्तांच्या समस्यां संबंधी शासनाकडे दिलेली निवेदने, केलेला पाठपुरावा, प्रकल्पग्रस्तां विषयीचे  शासन निर्णय, वृत्तपत्रातील लेख, पुस्तके  मिळविली. त्याचा सखोल अभ्यास केला. कोयना धरण परिसरात जाऊन तेथील लोकांकडून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, शेतीला मिळालेला मोबदला, प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेचा लाभ याविषयी वस्तुनिष्ठ माहिती घेतली. त्या वेळेस बाबांच्या असे लक्षात आले की महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांचे अजूनही पूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. भूसंपादित केलेल्या जमिनीचा पूर्णपणे मोबदला मिळालेला नाही. अनेक प्रकरणात न्यायालयात दावे प्रलंबित आहेत. पुनर्वसन झालेल्या गावांमध्ये पुरेशा सोयी उपलब्ध नाहीत.

या पार्श्वभूमीवर हातनुर धरणग्रस्तांचे योग्य रीतीने पुनर्वसन व्हावे याकरिता बाबांनी, श्रीरामकाका चौधरी, युवराजकाका पाटील, देवरामभाऊ पाटील, विश्वनाथजी बोदडे या सहकाऱ्यांसोबत काम करायला सुरुवात केली. पुनर्वसनाचे काम अतिशय जिकरीचे असून त्याकरिता शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींच्या भक्कम पाठिंब्याशिवाय हे शक्य होणार नाही याची जाणीव सर्वांना व्हायला लागली. श्रीमती प्रतिभाताई पाटील विधानसभेत एदलाबाद तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत होत्या व महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होत्या. चांगदेवचे त्र्यंबक भाऊ चौधरी एदलाबाद तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते. तेव्हा सर्वांनी विचारविनिमय करून बाबांनी प्रतिभाताईंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश करून, काम करावे असे ठरले.

आता बाबांनी हतनुर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित केले. सर्वात महत्त्वाचे पहिले काम म्हणजे त्यांनी गावातील लोकांना खाते फोड करायला सांगितले व त्यात त्यांना मदत केली, जेणेकरून कुटुंबातील  सदस्यांना स्वतंत्ररित्या प्लॉट मिळतील. जुन्या चांगदेव गावात लहान लहान घरे होती. काही वाडे होते. वाड्यांना बुरुज व तटबंदी होती. गावातील घरांचे मूल्यांकनाचे काम इंजिनिअर भामरे साहेबांकडे होते. तटबंदी व  बुरुजांना वाड्याचा भाग समजून, त्याप्रमाणे त्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे हे त्यांना पटवून सांगितले. पुनर्वसनात सगळ्यांना मोठे प्लॉट कसे मिळतील ते पाहिले. रस्ते, गटारी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु दवाखाना, ग्रामपंचायत, वि का सोसायटी, समाज मंदिरे यांच्या करिता प्रशस्त जागा मंजूर करून घेतल्या. पुनर्वसन आराखडा मंजुरीचे काम जळगांव येथील टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटकडे होते. त्यात इंजिनियर असलेल्या लता जगताप यांची या कामात मदत झाली. पुढे माझे त्यांच्याशी लग्न झाले, हा योगायोग.

बाबांचे कार्य बघून त्यांची जिल्हा काँग्रेस समितीच्या सरचिटणीस पदावर नेमणूक करण्यात आली. त्यामुळे त्यांना अधिक मोठे कार्यक्षेत्र उपलब्ध झाले. ते जळगाव येथील काँग्रेस भवनच्या वरच्या मजल्यावर राहायचे. बाहेर गांवावरून आलेल्या कार्यकर्त्यांकरिता चहापाण्याची व्यवस्था होती. जेवण ते स्वतः बनवायचे. पत्रकारांचे त्यांना नेहमी सहकार्य मिळायचे. महाराष्ट्र टाईम्सचे मुरलीधर ढमाले, टाइम्स ऑफ इंडियाचे श्रीकांत जळूकर, बातमीदारचे शरद नेहते, जनशक्तीचे ब्रिजलालभाऊ पाटील, साप्ताहिक मधुविचारचे स्वामी रेणापूरकर, प्रेस फोटोग्राफर सिताराम साळी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राजकीय व सामाजिक जीवनातले अनेक बारकावे त्यातून त्यांना समजायचे.

या काळात आमच्या कुटुंबाच्या, विशेषत: माझ्या बाबतीत एक महत्त्वाची घटना घडली. १९७६ मध्ये मी दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आदल्या दिवशी, वृत्तपत्रांमध्ये बोर्डाचे मानकरी या सदरात, 

'महेंद्रनाथ विश्वनाथ इंगळे 

एदलाबाद तालुक्यात प्रथम

मानसिंगराव जगताप पारितोषिक रुपये २५१ प्राप्त',  अशी बातमी छापून आली. जळगाव आयटीआय मधे शिकणाऱ्या चांगदेवच्या विद्यार्थ्यांनी बाबांना ही वृत्तपत्रे संध्याकाळी एसटी स्टँड वर आणून दिली व त्यांचे अभिनंदन केले. रात्री साधारणत: साडेआठ वाजता बाबा घरी परतल्यानंतर, त्या दिवशी वीज नसल्याने, कंदीलाच्या प्रकाशात वाड्यातील सर्वांनी ही बातमी पुन्हा पुन्हा वाचली. प्रतिकूल परिस्थितीत मी ही परीक्षा दिली होती. चांगदेव येथे परीक्षेचे केंद्र नव्हते. ते जे ई स्कूल, एदलाबाद येथे होते. आम्ही सात आठ मुले मुली ट्रॅक्टरमध्ये बसून रोज परीक्षेला जात असू. जे ई स्कूल व्यतिरिक्त कोणी विद्यार्थी यापूर्वी तालुक्यातून प्रथम आलेला नव्हता. त्यामुळे माझे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणे ही एस बी चौधरी हायस्कूल, चांगदेव व गावातील सर्वांकरता अभिमानाची गोष्ट ठरली. या घटनेचा माझ्यावर मोठा परिणाम झाला. आपण वेगळे आहोत ही भावना माझ्यात निर्माण झाली. वाचलेल्या पुस्तकांमधील चरित्र नायकांप्रमाणे, आपण एक दिवस मोठे व्यक्ती होऊ असा विचार माझ्या मनात येऊ लागला.

(क्रमशः)

प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, जळगांव

Monday, September 23, 2024

थोर शिक्षक भारत रत्न डॉ. राधाकृष्णन

 


*शिक्षक दिनानिमित्ताने...*

५ सप्टेंबर हा भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. तो आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.

घरची गरिबीची परिस्थिती असतांनाही डॉ. राधाकृष्णन यांनी एम ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. तत्त्वज्ञान या विषयावर त्यांनी अनेक संशोधन पर लेख  व पुस्तके लिहिली. एक तत्त्वज्ञ म्हणून त्यांची झालेली ख्याती बघून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांची तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. 

डॉ. राधाकृष्णन यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. आंध्र, कलकत्ता व बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून कार्यरत असतांना त्यांनी तेथे आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटविला. युनोस्को मधे भारताचे प्रतिनिधी, रशियात  भारताचे राजदूत, प्रथम उपराष्ट्रपती आणि त्यानंतर राष्ट्रपती म्हणून झालेली निवड हा त्यांच्या कार्याचा गौरव होता. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे थोर विचारवंत, तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ञ होते. भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानाची पाश्चिमात्त्य जगाला ओळख करून देण्यामधे त्यांचा मोलाचा वाटा आहे.

कठीण परिस्थितीत, संघर्ष करून मार्ग काढणारा सृजनात्मक व्यक्ती निर्माण करणे हा शिक्षणाचा उद्देश असायला हवा. शिक्षक हे देशातील सर्वोत्तम बुद्धिमंत असावेत. शिक्षणाद्वारेच मानवाच्या बुद्धीचा सदुपयोग होऊ शकतो. संपूर्ण विश्व एक समजून, मानवाच्या उन्नती करिता शिक्षण पद्धती विकसित व्हावी असे त्यांचे मौलिक विचार होते.

डॉ. राधाकृष्णन हाडाचे शिक्षक होते. तत्त्वज्ञानासारखा गंभीर विषय ते अगदी सहज सोप्या पद्धतीने शिकवित असत. त्यामुळे विद्यार्थ्यांची त्यात आवड निर्माण होत असे. आपल्या नर्म विनोद बुद्धीने ते वर्गातील वातावरण हलकेफुलके करीत असत.

म्हैसूर विद्यापीठातील त्यांच्या निरोप समारंभा प्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांची विद्यापीठापासून रेल्वे स्थानकापर्यंत भव्य मिरवणूक काढली. सजवलेली बग्गी विद्यार्थ्यांनी स्वतः ओढत नेली. ही शोभायात्रा बघायला म्हैसूर शहरातील नागरिक रस्त्यावर दुतर्फा उभे होते.

आजच्या या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे स्मरण करून, उच्च नैतिक मूल्यांचे आचरण करून एक चांगले जीवन जगण्याची प्रेरणा आपण त्यांच्या चरित्रातून घ्यावी. आपल्या शिक्षकांचा सन्मान करावा. त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगावी.

आजच्या या दिवशी मीही माझ्या गुरुजनांचे स्मरण करून त्यांचे विषयी कृतज्ञताभाव व्यक्त करतो. सुदैवाने मला खूप चांगले शिक्षक मिळाले. चांगदेव येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा, श्री. एस. बी. चौधरी हायस्कूल, शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, मुंबई येथील माझ्या शिक्षकांनी मला भरभरून प्रेम दिले, वेळोवेळी कौतुक केले. माझे आयुष्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. 

माझ्या सर्व सहकारी शिक्षक मित्रांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या उज्वल भवितव्याकरिता सुयश चिंतितो. 

धन्यवाद!

*प्रा. डॉ. महेंद्र इंगळे*

जळगाव, सप्टेंबर २०१७

(शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव येथील विद्युत विभागाने आयोजित केलेल्या शिक्षक दिन समारंभा प्रसंगी केलेले भाषण: संकलित)

PUNE METRO


 *जागतिक दर्जाची पुणे मेट्रो....*

मी पुण्याला पिंपळे सौदागर भागात राहतो. राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी जवळ असल्याने बरेचसे आयटी इंजिनियर्स या भागात राहतात. गेल्या वीस वर्षात मुळा नदीच्या पश्चिमेला, वेस्ट पुणे वेगाने विकसित झालं; त्यातील अतिवेगाने विकसित झालेला एक भाग म्हणजे पिंपळे सौदागर!आधुनिक जीवनशैलीस आवश्यक असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर व इतर सुविधा या भागात बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहेत.

आता नव्यानेच पुण्यामध्ये मेट्रो आलेली आहे,परंतु वेस्ट पुण्याचा सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, रहाटणी हा भाग प्रत्यक्षरीत्या मेट्रो लाईन्सला जोडलेला नाही. पिंपळ सौदागरच्या रहिवाशांकरिता जेआरडी टाटा डबल डेकर ब्रिजच्या जवळ, नाशिक फाट्यावरील भोसरी मेट्रो स्टेशन हे त्यातले त्यात जवळचे स्टेशन. परंतु या मेट्रो स्टेशन पर्यंत पुरेशी कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे पिंपळे सौदागर भागातील मोजकेच प्रवासी मेट्रोचा लाभ घेतांना दिसतात.

पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रोच्या लाईन नंबर-१ (पर्पल लाईन)चे काम, इंटर जंक्शन असलेल्या सिविल कोर्ट स्टेशन पर्यंत पूर्ण झालेले असून तिथपर्यंत मेट्रो सेवा नियमितपणे सुरू आहे. अंडरग्राउंड असणाऱ्या सिव्हिल लाईन ते स्वारगेट या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. 

वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या लाईन नंबर-२ (एक्वा लाईन) चे काम पूर्ण झालेले असून, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट २०२३ रोजी त्याचे उद्घाटन झाले. या मार्गावर मेट्रो सेवा नियमितपणे सुरू आहे.

लाईन नंबर-१, पीसीएमसी पासून रेंज हिल पर्यंत इलेव्हेटेड मेट्रो आहे. तेथून नंतर हळूहळू ती भूमीगत होत जाते. सिविल कोर्ट स्टेशनला पोहोचते तेव्हा ती जमिनीच्या १०६ फूट खाली असते. सिविल कोर्ट हे इंटर जंक्शन स्टेशन भारतातील सगळ्यात जास्त खोलीवर असलेलं मेट्रो स्टेशन आहे. याच लायनीवरील शिवाजीनगर मेट्रो स्टेशन हे दुसरे वैशिष्ट्यपूर्ण स्टेशन. याचा बाह्य भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्याच्या दृश्याचा आहे तर आतील भाग पेशवेकालीन दृश्यांचा आहे. ऐतिहासिक पेंटिंग्ज व म्युरल्सनी अंतर्गत भागाची शोभा वाढविलेली आहे. या मेट्रो स्टेशन्सवर विमानतळावर असतात तसे सेक्युरिटी चेकिंग, एस्केलेटर्स, लिफ्ट, टॉयलेट ब्लॉक्स, स्वच्छ पिण्याचे पाणी, बोगदा व्हेंटिलेशन सिस्टीम, ऑटोमॅटेड तिकीट विक्री, संपर्क व्यवस्था अशा सुविधा आहेत. फायर सेफ्टी, भरपूर उजेड, स्वच्छता याकडे पुरेसे लक्ष देण्यात आलेले आहे. अगदी जागतिक दर्जाचे म्हणता येईल अशा प्रकारची ही स्टेशन्स आहेत. सिविल कोर्ट स्टेशनवर पोचल्यानंतर आपण एस्क्युलेटर्सने किंवा लिफ्टने जमीन पातळीवर येऊन स्टेशनच्या बाहेर पडू शकतो किंवा रामवाडी अथवा वनाज कडे जाऊ शकतो. येथे पुन्हा तिकीट काढण्याची आवश्यकता नाही.

मेट्रोने प्रवास करतांना  मेट्रो लाईनचे मॅप बघितले असल्यास प्रवास सुलभ होण्यास मदत होते. त्याकरिता हे मॅप मेट्रोमध्ये, स्टेशनवर आणि जागोजागी लावलेले आहेत. 9420101990 या व्हाट्सअप नंबर वर Hi केल्यानंतर तिकीट खरेदी संदर्भात सूचना मिळतात, त्यानुसार फोन पे किंवा गुगल पे ने पेमेंट केल्यावर आपल्याला मोबाईल वर क्यूआर कोडसह मेट्रोचे तिकीट येते. मेट्रो स्टेशन वर ॲटोमेटेड मशिनवरही तिकीट खरेदी करता येते. मोबाईलवरील किंवा हार्ड कॉपीवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर फलाटावरचे बॅरियर्स आपोआप बाजूला होतात. मेट्रो ट्रेन स्टेशनवर आल्यानंतर स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतात व सुरू होण्यापूर्वी आपोआप बंद होतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतलेली आहे. एक तिकीट घेतल्यानंतर ते कुठल्याही लाईनला चालू शकते. साधारणतः ३५ रुपयांचे तिकीट घेऊन दोन टोकाच्या स्टेशन दरम्यान आपण मेट्रोने प्रवास करू शकतो. काही अडचण आल्यास मेट्रोचे कर्मचारी आणि सहप्रवासी आपल्याला मदत करतात.

मेट्रोमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. लॅपटॉप व मोबाईल चार्जिंग करिता सुविधा उपलब्ध आहेत. इमर्जन्सी मध्ये ड्रायव्हर (पायलट)शी बोलण्याकरिता प्रत्येक डब्यामध्ये दरवाज्या जवळ स्पीकर फोनची सुविधा आहे. आपण प्रवासात कुठे आहोत हे डिस्प्ले बोर्डवर बघता येते. तीन डब्यांच्या मेट्रोला फायबर ग्लासच्या मोठ्या खिडक्या असल्याने बाहेरचे विहंगम दृश्य बघायला मिळते आणि मेट्रोचा प्रवास अल्हाददायक होतो.

दाट लोक वस्ती, परिसरात असलेल्या जुन्या इमारती, हेवी ट्रॅफिक अशा परिस्थितीत पुण्यामध्ये मेट्रोचे काम करणे आव्हानात्मक होते. जिओ टेक्निकल सर्वे करणे, उंच पिलर्स बांधून त्यावर ट्रेनच्या सहाय्याने प्रिकास्ट काँक्रीट गर्डर्स अथवा स्टील गर्डर्स चढविणे हे तर आव्हानात्मक होतेच पण त्याहीपेक्षा अंडरग्राउंड मेट्रोचे काम जास्त आव्हानात्मक होते. अंडरग्राउंड मेट्रो कन्स्ट्रक्शन करिता सगळ्यात आधुनिक पण महाग असलेल्या TBM (टनेल बोरिंग मशीन) पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टनेल बोरिंग मशीन हे एक वीस फूट व्यासाचे, साडेचारशे फूट लांबीचे महाकाय मशीन. जेथून अंडरग्राउंड मेट्रो सुरू होते त्या ठिकाणी शंभर ते दीडशे मीटर खोल मोठा खड्डा तयार करण्यात येतो. आजूबाजूला रिटेनिंग वॉल व तळाला काँक्रीट राफ्ट तयार करण्यात येतो. त्यावर या मशीनचे पार्ट क्रेनच्या साह्याने पोहोचविले जातात व त्यांना असेंबल केले जाते. मशीन असेम्बल करणे एक मोठे जिकरीचे काम असते. त्याला बराच वेळ लागतो. एकदाचे मशीन तयार झाले की नंतर पुढचे काम फार सोपे असते. सर्व प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने होतात. मशीनच्या पुढील व्हीलवर हार्ड स्टीलचे कटर हेड असतात. व्हील हळूहळू फिरत, जमिनीचा भाग कोरत पुढे जाते. खोदकामातून निर्माण झालेली माती व गिट्टी कन्व्हेअर बेल्टच्या सहाय्याने प्रोसेसिंग प्लांट जवळ पोहोचविली जाते. जमिनीखालून मशीन हळूहळू भूभागाचे कटिंग करत पुढे सरकते तेव्हा जमिनीवरील इमारतींना हादरे बसतात. माझी मुलगी पौर्णिमा स्वारगेट स्टेशनच्या परिसरात राहते. तिच्याकडे जायचो तेव्हा हे आम्ही अनुभवले आहे. रहिवाशांमध्ये भीती निर्माण होऊ नये व आणीबाणीच्या प्रसंगी त्वरित उपाययोजना करता याव्यात म्हणून सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले होते. मशीन पुढे जाते तसतसे मागच्या भागात हायड्रोलिक जॅक्सचा वापर करून प्रिकास्ट काँक्रीटच्या भिंती तयार केल्या जातात. कंट्रोल केबिनमधील इंजिनियर कामावर देखरेख ठेवतात.

एका TBM मशीन ची किंमत साधारणतः ७० ते ८० कोटी रुपयांपर्यंत असू शकते.

लाईन नंबर-१ च्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या सेगमेंटचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. एका बाजूने सिव्हिल कोर्ट बाजूने, जमिनी खालून, दोन मशीन एकाच वेळेस खोदकाम करित बुधवार पेठला पोहोचल्या आहेत. दुसऱ्या बाजूने स्वारगेट वरून, जमिनी खालून दुसऱ्या दोन मशीन्सही बुधवार पेठला पोहचत आहेत. या मशीन्स रिव्हर्स डायरेक्शन मध्ये जाऊ शकत नाहीत. त्यांना डिसअसेंबल्ड करून वर काढावे लागते.

पुणे मेट्रो प्रकल्पा संदर्भात, इलेव्हेटेड व अंडर ग्राउंड कन्स्ट्रक्शनचे, TBMचे  अनेक व्हिडिओ युट्युब वर उपलब्ध आहेत.  त्यातून खूप रंजक व ज्ञानवर्धक माहिती मिळते. सध्या फारशी गर्दी नसल्यामुळे आपल्याला निवांतपणे प्रवास करता येतो. फायबर ग्लासच्या मोठ्या खिडक्यांमधून बाहेरचे विहंगम दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्याद्वारे टिपता येते. 

सिविल कोर्ट ते हिंजवडीतील  मेगापोलिस सर्कल पर्यंत असलेल्या लाईन नंबर-३चे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबर २०२५ च्या आत पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. त्यास मनःपूर्वक शुभेच्छा!

*प्रा. डॉ. महेंद्र इंगळे*

पुणे, २ ऑगस्ट २०२३

Sunday, September 22, 2024

ENTREPRENEURSHIP DEVELOPMENT PROGRAM

 


उद्योजकता विकास शिबिर...

शासकीय तंत्रनिकेतन जळगांव येथे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) च्या अंतर्गत आंत्रप्रिन्युअरशिप मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट (EMD) सेल कार्यरत असतांना संस्थेतील व जिल्ह्यातील इतर संस्थांमध्ये तीन दिवसांचे उद्योजकता जागरूकता शिबिर आयोजित करण्यात येत असे.

तीन दिवसाच्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांकरिता चहा, नाश्ता, जेवण, प्रशिक्षण किट  याची  व्यवस्था केलेली असायची. सकाळी साडेनऊ पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विविध प्रकारची सेशन्स तज्ञ व्यक्तींकडून कंडक्ट केली जात असत. त्यात व्याख्यानासोबतच, प्रात्यक्षिके म्हणजे एक्सरसाइझेस, गेम्स, प्रश्नावली भरून घेणे अशा स्वरूपाचे कार्यक्रम असत. अशाप्रकारे प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असे. कार्यक्रमात विद्यार्थी पूर्ण तल्लीन होऊन जात असत.

प्रशिक्षणाचा कार्यक्रम आम्ही स्वतः विकसित केलेला होता. दीड तासाच्या सेशनची  सुरुवात विषयाशी संबंधित एका लहानशा गोष्टीने व्हायची. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विषयाबद्दल आवड व जिज्ञासा निर्माण होत असे.

 दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांना विषयाची ओळख करून देऊन त्याचे सखोल ज्ञान देण्यात येत असे. तिसऱ्या भागात विद्यार्थ्यांबरोबर विषयाशी संबंधित चर्चा करण्यात येत असे व त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येत असे. शेवटी एक प्रेरणादायी गोष्ट सांगून सेशनची समाप्ती होत असे. 

उदाहरणार्थ वुमन एम्पॉवरमेंट(स्री सशक्तीकरण)हे सेशन असेल तर विद्यार्थ्यांना आम्ही एक कोडे (पझल) घालतो. ते असे:

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर वडील व मुलगा मोटारीतून प्रवास करीत असतांना भीषण अपघात होतो. अपघातात वडील जागच्या जागी मृत्युमुखी पडतात. गंभीरित्या जखमी झालेल्या मुलाला शहरातील प्रथितयश सर्जन कडे उपचाराकरिता नेण्यात येते  तेव्हा, 'मी हे ऑपरेशन करू शकत नाही कारण हा माझा मुलगा आहे. मेडिकल इथिक नुसार डॉक्टर आपल्या रक्ताच्या नातेवाईकांचे ऑपरेशन करू शकत नाही.' असे सांगतात.

असे घडू शकते का?

असे विचारले असता विद्यार्थ्यांकडून गमतीची उत्तरे ऐकायला मिळतात.

प्रथितयश सर्जन मुलाच्या आई होत्या.

एक स्री प्रथितयश सर्जन असू शकते ही अजूनही अनेकांच्या कल्पने पलीकडची गोष्ट आहे. यावरून समाजाचा स्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन समजण्यास मदत होते.

बॅरिअर्स इन कम्युनिकेशन (संवादातील अडथळे) बद्दल माहिती देतांना एक मजेशीर खेळ खेळतो. 

पहिल्या रांगेत बसलेल्या विद्यार्थ्याला कागदावर लिहिलेला एक संदेश वाचून लक्षात ठेवायला सांगतो. 

तो संदेश असा असतो: 'राजस्थान की राजधानी जोधपुर मे सोना बिकता है पचास रुपये किलो.'

विद्यार्थ्याने हा संदेश त्याच्या शेजारच्या विद्यार्थ्याला कानात हळूच सांगायचा. असे प्रत्येक विद्यार्थ्याने करायचे. रांगेतला शेवटचा विद्यार्थी व्यासपीठावर येऊन त्याने काय ऐकले ते सांगतो. शेवटी कागदावर लिहिलेला खरा संदेश पहिला विद्यार्थी व्यासपीठावर येऊन वाचून दाखवतो. पहिल्या आणि शेवटच्या विद्यार्थ्यांच्या संदेशात खूप मोठी तफावत आढळते.

राजस्थानची राजधानी म्हटल्याबरोबर जयपूर हा शब्द आपल्या अंतर्मनातून आपोआप बाहेर येतो. सोन्याचा भाव ५० रुपये किलो एवढा कमी असेल हे अंतर्मन स्वीकारत नाही. ऐकण्यात आपली काहीतरी चूक होत आहे असे त्याला वाटते.

सांगणारा काही वेगळं सांगतो ऐकणारा मात्र वेगळंच ऐकतो.याला कम्युनिकेशन बॅरिअर्स म्हणजे संवादातील अडथळे असे म्हणतात. हा एक महत्त्वाचा विषय आहे. याच्यामुळे आपल्या मित्रांमध्ये किंवा घरामध्ये भांडणे होऊ शकतात. मिलिटरी ऑर्गनायझेशन मध्ये तर अशा प्रकारचे चुकीचे संदेशवहन झाल्यामुळे फार मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून कोणी बोलत असेल तेव्हा नीटपणे लक्ष देऊन आणि कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता ऐकणे गरजेचे आहे.

कठोर परिश्रम करण्याची तयारी, जिद्द, चिकाटी, नाविन्याचा हव्यास ही काही महत्त्वाची उद्योजकांची गुणवैशिष्ट्ये (Traits) आहेत.

ज्या लोकांमध्ये नीड फॉर अचीव्हमेंट (यशस्वी होण्याची तीव्र इच्छा) लहानपणापासून निर्माण होते ते लोक मोठेपणी यशस्वी व्यक्ती बनतात असा सिद्धांत David McClelland याने आपल्या ' The Achieving Society 'या पुस्तकातून मांडलेला आहे. लहानपणी ज्या मुलांना आई-वडीलांनी जवळ घेऊन थोर पुरुषांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या ती मुले मोठेपणी कर्तबगार आणि यशस्वी झालीत हे सिद्ध झालेले आहे. 

विद्यार्थ्यामध्ये उद्योजक बनण्याची तीव्र इच्छाशक्ती आहे का? उद्योजक बनण्यास आवश्यक असणारे कोण कोणते गुण त्याच्यात आहेत याचे मोजमापही आम्ही करतो.

त्याकरिता Who am I?(मी कोण?) टेस्ट आम्ही कंडक्ट करतो. एका शांत वातावरणात विद्यार्थ्याला एक प्रश्नावली दिली जाते. ती तो एक चित्त होऊन भरून देतो. त्याने लिहिलेल्या उत्तरांवरून आम्हाला विद्यार्थ्याचे स्वतःविषयीचे आकलन काय आहे, इतरांनी त्याचे आकलन कसे करावे अशी त्याची अपेक्षा आहे याची माहिती आम्हास मिळते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये प्रशिक्षणाद्वारे उद्योजकता गुण विकसित केले जाऊ शकतात. महाराष्ट्र शासनाच्या Maharashtra Centre for Entrepreneurship Development, Aurangabad व जिल्हा उद्योग केंद्रा (DIC) द्वारे/ मदतीने हे प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबविले जातात.

अशा प्रकारचे एक उद्योजकता जागरूकता शिबीर (Entrepreneurship Awareness Camp) सन २००३ मधे आयोजित करण्यात आले होते. मा. मंत्री सुरेशदादा जैन हे कार्यक्रमाचे उद्घाटक होते.

प्रा. एम.बी. सानप, प्रा. आर.एम.नाफडे, मी स्वतः,  जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर शैलेश राजपूत, MCED चे प्रा. मोकाशी आयटीआयचे  प्राचार्य डी.ए. दळवी (नंतर संचालक), रोटरी क्लबचे गनी मेमन, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा. सीमा जोशी, आय एम आर च्या प्रा. शिल्पा बेंडाळे, प्रा. कुलकर्णी अशा सर्व जणांनी प्रशिक्षण कार्यक्रम राबविला.

शेवटच्या दिवशी दुपारच्या सत्रात पॅनल डिस्कशन हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात  मधुलिका इंडस्ट्रीजचे अरुण बोरोले, श्रद्धा इंडस्ट्रीचे अनिल बोरोले, सुहांस केमिकलचे संदीप काबरा, प्लास्टिक इंडस्ट्रीतील विनोद बियाणी, आशिष इलेक्ट्रिकलचे संजय इंगळे अशा अनेक यशस्वी उद्योजकांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले व उद्योजक बनण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाचे संचलन प्रा.अविनाश झोपे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या केले. आजही अनेक जण मला भेटतात तेव्हा या कार्यक्रमाचा आवर्जून उल्लेख करतात.

प्रा. डॉ. महेंद्र इंगळे

माझे श्रध्दास्थान ओंकारेश्वर मंदिर

 


*माझे श्रद्धास्थान.... ओंकारेश्वर मंदिर!*

मी जळगांवला शिवराम नगर येथे राहतो. शिव...आणि...राम! माझ्या घरापासून शिवमंदिर ... ओंकारेश्वर मंदिर २०० मीटर वर आणि राम मंदिर २००० मीटर अंतरावर आहे. १९७६ मध्ये मी शासकीय तंत्रनिकेतन जळगांव येथे  विद्यार्थी होतो तेव्हापासून नियमितपणे ओंकारेश्वर मंदिरात जातो. 

*ओंकारेश्वर मंदिर* हे माझे श्रद्धास्थान तर मा. भंवरलालजी जैन यांच्या स्मृती प्रित्यर्थ, जळगाव महानगरपालिका व जैन उद्योग समूहाच्या सौजन्याने निर्माण केलेले *'भाऊंचे उद्यान'* हे माझे आवडते ठिकाण. सकाळी ओंकारेश्वर मंदिर व त्यानंतर भाऊच्या उद्यानात फिरायला जाणे असा माझा दैनंदिन कार्यक्रम असतो.

मा.ओंकारदासजी बळीरामजी जोशी यांच्या सुपुत्रांनी ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टला दान केलेल्या २८,४५० स्क्वेअर फुट भूमीवर ओंकारेश्वर मंदिराची निर्मिती करून ८फेब्रुवारी १९७१ रोजी ते योगेश्वर भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी अर्पण करण्यात आले.

अतिशय सुंदर असे हे मंदिर असून येथे कमालीची स्वच्छता असते. मंदिरास तीन प्रवेशद्वारे आहेत. आवारामध्ये वटवृक्ष आणि पिंपळ वृक्ष असून त्यांच्या भोवती ओटा बांधलेला आहे. विशेषतः वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाचे पूजन करण्याकरिता महिला मोठ्या संख्येने येथे येतात. वड आणि पिंपळा व्यतिरिक्त आंबा, निंब, नारळ, निलगिरी, बेल ही झाडे आहेत. मंदिरामध्ये श्री शिवशंकराची पांढऱ्याशुभ्र संगमरवराची, अर्धोन्मिलित नेत्रांनी पद्मासन घालून ध्यानावस्थेत बसलेली लोभस मूर्ती आहे. थोडा वेळ आधिक थांबलो तर ही मूर्ती आपल्याशी बोलू लागेल असे वाटते.  बाहुंवर व गळ्यात खरे वाटावेत असे सर्पराज आहेत. कानांत लखलखणाऱ्या हिऱ्यांची कर्णभूषणे आहेत. जटांमधे सुवर्णाचे बेलपत्र आहे. मूर्तीवर पाच फणा असलेला, सुवर्णाने मढविलेला व हिऱ्याचा मणी धारण केलेल्या सर्पराजाचे छत्र आहे. गळ्यामध्ये मोत्याच्या व फुलांच्या माळा, अंगावर भरजरी रेशमी वस्त्र आहे. मूर्तीच्या मागे भिंतीवर, विविध देखाव्यांचे, दर आठवड्याला बदलणारे सुंदर पडदे असतात. समोर शंकराची पिंड आहे. श्री शिवशंकराचे साकार आणि निराकार रूप येथे बघायला मिळते. 

२५ फेब्रुवारी २०२४ रोजी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून पूर्व दिशेला सिंहद्वाराची निर्मिती करण्यात आली. सिंहद्वार म्हणजे मोक्षद्वार. जगात सद्गुणांची वृद्धी व्हावी याकरिता सिंह हा परमेश्वराचा विशिष्ट अवतार कार्यरत असतो. सिंहद्वाराच्या निर्मितीमुळे मंदिराचे धार्मिक महत्त्व वाढले आहे.

पुरी येथील जगन्नाथ मंदिरास चार प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेला सिंहद्वार म्हणजे मोक्षद्वार. पश्चिमेला इच्छेचे प्रतीक व्याघ्रद्वार. संत आणि विशिष्ट भक्त या दारातून प्रवेश करतात. उत्तरेला ऐश्वर्याचे प्रतीक गजद्वार. ऋषी आणि विशिष्ट भक्त या द्वारातून प्रवेश करतात. दक्षिणेला वीरतेचे प्रतीक अश्वद्वार. युद्धात विजय मिळावा याकरिता आशीर्वाद प्राप्त व्हावेत म्हणून योद्धे व वीर पुरुष या द्वारातून प्रवेश करतात.

मंदिरामध्ये आरती, पूजा पाठ, जप, अभिषेक हे दैनंदिन कार्यक्रम सुरू असतात. गुरुपौर्णिमा, दिवाळीत पाडवा पहाट, महाशिवरात्री, मंदिराचा वर्धापन दिन या दिवशी मंदिरावर नेत्र दीपक रोषणाई असते व दिवसभर कार्यक्रम कार्यक्रम सुरू असतात. उत्तर भारतीय व मराठी श्रावण महिन्यात दररोज अभिषेकाचे कार्यक्रम सुरू असतात.

या परिसरात कॉलेजचे विद्यार्थी राहत असल्याने संध्याकाळच्या वेळेस अनेक विद्यार्थी मंदिरात येत असतात. परिसरातील भाविक स्वेच्छेने मंदिरात आपली सेवा देत असतात.

आता मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्याकरिता राजस्थानातील मकराना येथून कारागीर आलेले आहेत. मंदिरामध्ये शुभ्र संगमरवरी टाइल्स बसविण्यात आल्या आहेत. गुलाबी छटा असलेल्या दगडांनी (मकराना मार्बल) मंदिराच्या तिन्ही दरवाज्यां समोरील दर्शनी भाग, पायऱ्या व खांब सजविण्यात आले आहेत. मंदिराच्या आवारात रंगीत टाईल्स व ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत. मंदिराच्या आवारात विविध कार्यक्रमांच्या आयोजना करिता भव्य सभामंडप निर्माण करण्यात आला आहे. मंदिराच्या आवारात स्थानिक व बाहेरून आलेल्या पुजाऱ्यांना, तसेच पाहुण्यांना राहण्याकरिता सर्व सुविधांनी युक्त अशा दोन मजली इमारतीचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. मंदिराच्या आवारातील सँडस्टोनच्या कमानींवर ब्रिटिश कालीन दिवे बसविण्यात आले आहेत. मंदिराच्या दर्शनी भागात एका बाजूला कारंज्याची निर्मिती करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस कारंज्यावर  रंगीत प्रकाश सोडला जातो तेव्हा नयनरम्य दृश्य दिसते. मंदिराच्या आवारात व कारंज्या समोर बसण्याकरिता सॅण्ड स्टोनची बाके आहेत. थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मंदिराच्या तीनही बाजूला काँक्रीट रस्ते झालेले असून मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही अतिशय स्वच्छ आहे.

मा. जुगल किशोर जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आलेले मंदिर सुशोभीकरणाचे  काम आता अंतिम टप्प्यात आहे. 

*प्रा. डॉ. महेंद्र इंगळे, जळगांव*

Ratan Tata: Value-Centred Leader

  "I admire people who are very successful. But if that success has been achieved through too much ruthlessness, then I may admire that...