गिरणांजनी तंत्रनिकेतन
१७ जुलै १९८५ मधें मी गिरणांजनी तंत्रनिकेतन, एरोंडोल येथे प्राचार्य म्हणून रुजू झालो. वसंत सहकारी साखर कारखान्याशी संलग्न असलेल्या या तंत्रनिकेतनास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भक्कम आर्थिक पाठींबा होता. कारखान्यावर, कर्नल पाटोळे यांच्या शेजारी C-3 बंगल्यात मी राहायचो. तंत्रनिकेतनचे वर्ग श्री दिगंबरदादा पाटील महाविद्यालयात तर प्रात्यक्षिके कारखान्यावर व्ह्यायची. तंत्र निकेतनाची आर्थिक स्थिती चांगली असली तरी पुरेशी विद्यार्थी संख्या नसल्याने व्यवस्थापन मंडळ चिंतीत होते.
डॉ बी बी चोपणे, तंत्र शिक्षण संचालक झाल्यानंतर त्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम मा प्रल्हादभाऊ पाटील यांच्या हस्ते जेडीसीसी बँक, जळगांव येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तंत्रनिकेतनचे चेअरमन मा मुरलीधर आण्णा पवार यांनी माझ्याशी तंत्र निकेतनाच्या परिस्थिती बाबत चर्चा केली व मला त्याची जबाबदारी सांभाळण्याची सूचना केली. त्यानूसार मी कारखान्यावर, संचालक मंडळा समोर मुलाखती करिता उपस्थित राहिलो. तेथे विविध प्रस्तावांवर चर्चा झाली. माझ्या सोबत प्रा सुनील बढे व प्रा आर एम चौबे होते. महत्वाचे निर्णय घेतांना आम्ही नेहमी सोबत असायचो.
प्राचार्य पदावर रूजू झाल्यावर, चेअरमन व संचालक मंडळाच्या मंजुरीने, काही महत्वपूर्ण निर्णय मी घेतले:
‘सर्व विद्यार्थिनींना फी माफ’
‘तीनही वर्षातील, प्रत्येक शाखेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास फी माफ’
या निर्णयांची वृत्तपत्रांमधून कल्पकतेने जाहिरात देण्यात आली. लोकमतचे स्थानिक पत्रकार श्री बी एन चौधरी यांनी माझी मुलाखत घेवून, त्यावर आधारित, अभ्यासपूर्ण लेख लिहला. या लेखाचे शीर्षक होते ‘ते आले, त्यांनी पाहिले, त्यांनी जिंकले!‘. हा लेख चर्चेचा विषय ठरला.
संस्थेच्या प्रगतीकरिता आणखी एक महत्वाचा निर्णय मी घेतला. संस्थेत कार्यरत असलेल्या तीन डिप्लोमा धारक शिक्षकांना, TTTI, Bhopal यथे TTTC डिप्लोमा प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. त्यानुसार त्यांनी एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांना त्याचा फायदा झाला. येथील पाच अधिव्यात्यांची, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शासकीय तंत्रनिकेतनात अधिव्याखाता म्हणून निवड झाली त्यात यातील दोघे होते.
एक दिवस शिपाई धावत माझ्या केबिनमध्ये आला. मा वसंत दादांचा फोन आहें आसे त्याने सांगितले. ऑफिस मधे एकच फ़ोन असल्याने, मला केबिन बाहेर येऊन फोन घ्यावा लागायचा. मा. वसंत दादा पाटील त्यावेळी राजस्थानचे राज्यपाल होते. राजभवन मधील एका कर्मचाऱ्याच्या मुलाच्या प्रवेशाबाबत अडचण निर्माण झाली होती त्यात लक्ष घालण्या विषयी त्यांनी सांगितले. त्यानुसार मी, तंत्र शिक्षण संचालनायातील श्रीमती चारी यांचेशी चर्चा केली. त्या मा. संचालकांच्या स्वीय सहाय्यक म्हणुन कार्यरत होत्या. विद्यार्थ्यांचे प्रवेश, इलिजिबिलिटी संबंधीच्या कामात त्यांची महत्वाची भुमिका असायची. त्यांच्या सूचनेनुसार सदर विद्यार्थ्यांस अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. त्याची पूर्तता झाल्यानंतर त्याचा प्रवेश नियमित करण्यात आला.
माझ्या वाचनाच्या आवडीमुळे मी विविध पुस्तके आणि मासिके वाचत असे. Limca Book of Records वाचतांना Yongest Principal या शीर्षका खाली २५ वर्षे असे वय नमूद असल्याचे मला आढळले. मी तत्काळ पुस्तकाच्या मागे असलेला फॉर्म भरून आवश्यक त्या कागद पत्रांसह Limca Book कडे पाठविला. वयाच्या २४ व्या वर्षी मी तंत्रनिकेतनाचा प्राचार्य म्हणून कार्यरत असल्याने, ‘Yongest Principal’ म्हणून ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्सने’ नोंद घेतली, पण ‘Polytechnic’ अशी शैक्षणिक संस्थांची वर्गवारी त्यांच्याकडे नसल्याने अधिकृत यादीत नाव समाविष्ट न करता येण्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
प्रा. राम मेघे शिक्षण मंत्री असतांना, दरवर्षी खाजगी तंत्रनिकेतन व अभियांत्रीकी महाविद्यालयांचे संस्था चालक व प्राचार्य यांची कॉन्फरन्स व्हायची. १९८६ च्या, पन्हाळगड कॉन्फरन्स करिता आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेसने कोल्हापूरला जायला निघालो. माझ्यासोबत चोपडा पॉलिटेक्निकचे प्रा देशमुख होते. प्रवासात अकोल्याचे डॅडी देशमुख यांची भेट झाली. ते संस्थचालक होते. तसेच ‘देवकीनंदन गोपाला’ या चित्रपटाचे निर्माते होते. या चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित अनेक रंजक गोष्टी त्यांनी आम्हाला सांगीतल्या. मंदार एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरीचे अध्यक्ष तथा मराठी नाट्य निर्माते, माजी आमदार मा.राजाराम शिंदे, आणि प्रा हेमंत अभ्यंकर यांनी खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोरील समस्या मांडल्या व त्या अनुषंगाने काही मौल्यवान सुचना केल्या. अशा चर्चा सत्रांमधून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महनीय व्यक्तींशी स्नेहपूर्ण संबंध निर्माण झाले. त्याचा पुढे मला अनेक ठिकाणी उपयोग झाला.
मोफत शिक्षणाच्या, आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे, तंत्रनिकेतनात मुला मुलींची संख्या लक्षणीय रित्या वाढली. मध्यप्रदेश, गुजराथ, उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच मराठवाड्यातील दूरच्या गावतील मुले प्रवेश घेण्यासाठी येथे आली. काही दिवसांपूर्वी, पुण्यात, एका कार्यक्रमा निमित्त, १९८५ बॅचचे विद्याधर महाजन भेटले. त्यांनी विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या आपल्या मित्रांबद्दल माहिती दिली.