संवेदनशीलता !
भाऊच्या उद्यानात, दत्त मंदिरा समोरील बाजूने पाण्याच्या टाकीजवळील बाकावर बसून, मी मंदिरासमोरील कारंज्यांकडे बघत आहे. कारंज्यातून उसळी घेणाऱ्या पाण्यातून निर्माण होणाऱ्या तुषारांमुळे बाहेरच्यापेक्षा वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आहे. हे तुषार खाली येवून पॉंड मधील कमलदलांवर पडत आहेत. सकाळी असते त्यापेक्षा माणसांची वर्दळ कमी आहे.
समोर पौर्तुगीज वास्तूशैलीतील, ‘भाऊचे उद्यान’ या सोनेरी अक्षरांनी सुशोभित भव्य प्रवेशद्वार, त्याच शैलीत निर्माण केलेला उंच खांब व त्यावरील घड्याळ दिसत आहे. घड्याळाचा लहान काटा ७ वर आणि मोठा ६ वर आहे.
ओंकारेश्वर मंदिरातून थोड्या वेळा पूर्वी मी उद्यानात आलो. ट्रॅक वर चालत असतांना, ‘ये कांहा आ गये हम ….’ हे स्वर कानावर पडताच पावले थांबली. पाथ वे वरील स्टँडिंग स्पीकर जवळ जाऊन, ते मी अधिक लक्षपूर्वक ऐकू लागलो. काही क्षणानंतर ‘तुम यही हो …यही कही हो …’ हे अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील शब्द ऐकताच संवेदनांचा झरा वाहू लागला.
आता मी असे थांबू शकतो. पाहिजे तेव्हढा वेळ थांबू शकतो. त्याकरिता मी स्वतंत्र आहे. पूर्वी असे नव्हते.
मुंबईत असताना ‘गॅलेक्सी-गैटी’ मधे ‘सिलसिला’ बघितला होता. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेल्या संवेदना प्रगटल्या आणि आता निर्माण झालेल्या संवेदनांमधे मिसळून गेल्या. त्यातून नवीन संवेदना निर्माण झाल्या. या संवेदना माझ्यात नेमका कोणता भाव निर्माण करीत आहेत याचा मी विचार करू लागलो.
संवेदना कशा निर्माण होतात, त्या कशा निर्माण करता येवू शकतात याचा विचार करत असताना, छत्रपती संभाजी नगर येथे Capacity Building या प्रशिक्षण कार्यक्रमात, प्रशिक्षणार्थींमध्ये संवेदना (Sensation) निर्माण करण्याकरिता, सुदान मधील दुष्काळाची पार्श्वभूमी असलेल्या, मार्च १९९३ मधे न्यूयॉर्क टाइम्स मधे प्रसिद्ध झालेल्या, एका फोटोचा वापर मी केला होता याची मला आठवण झाली.
व्यक्ती संवेदनशील असल्यास तिची कार्यक्षमता वाढते अशी माझी धरणा आहे. अलीकडे, माझ्या भाषणात आणि लेखनात, संवेदनशील हा शब्द मी बऱ्याच वेळा वापरला आहे.
No comments:
Post a Comment